बलुचिस्तान हा पाकिस्तानचा आकाराने सर्वांत मोठा प्रांत. नैसर्गिक साधनसंपत्तीच्या बाबतीत सर्वाधिक समृद्ध. पण त्या देशाच्या चारही प्रांतांपैकी सर्वाधिक गरिबीही बलुचिस्तानमध्येच आहे. या विषमतेबरोबर येणारा स्वाभाविक स्थानिक जनक्षोभ तेथे कित्येक दशके मुरलेला आहे. या जनक्षोभाचा अधूनमधून स्फोट होत असतो. तसा तो २६ ऑगस्ट रोजी झाला. त्या दिवशी बलुचिस्तानच्या विविध भागांमध्ये झालेल्या हल्ल्यांमध्ये सत्तरेक जणांचे प्राण गेले. काही स्राोत हा आकडा १००च्या वर असल्याचे दर्शवतात. मुसाखेल जिल्ह्यात एका बसमधून २३ पंजाबी मजुरांना बाहेर खेचण्यात आले आणि त्यांची हत्या करण्यात आली. कलात जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या चौकीवर झालेल्या हल्ल्यात १० सैनिक मारले गेले. बोलन जिल्ह्यात सहा नागरिक आणि पाच सैनिक मारले गेले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना पाकिस्तानी सुरक्षा दलांनी २१ हल्लेखोरांना ठार केल्याचे तेथील सरकारने म्हटले आहे. आणखी काही ठिकाणी हल्ल्यांची खबर येत असून त्या बातम्यांची खातरजमा केली जात आहे. या हल्ल्यांची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) संघटनेने घेतली आहे. ही किंवा तत्सम संघटना बलुचिस्तानमध्ये गेली अनेक वर्षे हल्ले करत आहेत. तरीदेखील परवाच्या हल्ल्यांची व्याप्ती आणि नियोजन पाहून पाकिस्तान सरकार हादरले आहे हे नक्की. आजवर सहसा पाकिस्तानी सरकारी आणि सुरक्षा आस्थापनांना लक्ष्य करणाऱ्या बलुच संघटनांनी आता पंजाबमधील नागरिकांवरही हल्ले सुरू केले आहेत. त्यांना पाकिस्तानी सरकारविषयी काहीही वाटत असले आणि सरकारी अन्यायाविरुद्ध संताप असला, तरी वांशिक संहाराच्या त्यांच्या कृत्यांचे समर्थन कदापि करता येणार नाही. आपल्याकडेही पंजाब किंवा काश्मीर खोऱ्यात दहशतवाद शिगेला असताना काही वेळा अतिरेक्यांनी ‘बाहेर’च्यांची वेचून हत्या केल्याचे प्रकार घडले होते. यातून प्रश्न सुटले नाहीत, उलट चिघळले.

हेही वाचा : लोकमानस: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरील अगतिकता

High Court clarified to file a Public Interest Litigation regarding the pollution of garbage on the beaches of Mumbai print news
अस्वच्छ किनाऱ्यांवरून पालिकेची कानउघाडणी; समुद्रातील ‘प्लास्टिक’ सागरी जीवांवर नाही, तर मानवांवरही दुष्परिणाम
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Footage of the couple in their wedding attire captured them slow dancing in the cramped, dusty shelter while their guests watched on
VIDEO : बंकरच्या बाहेर क्षेपणास्त्रांचा अन् आतमध्ये प्रेमाचा वर्षाव; इस्रायलच्या युद्धजन्य परिस्थितीत नवविवाहित जोडप्याचा डान्स व्हायरल!
Israeli attacks hitting all areas of Lebanon
हेजबोलाचा आणखी एक नेता ठार; इस्रायलचे लेबनॉनवरील हल्ले सुरूच
israeli air force launches attacks on houthi
लेबनॉनमधील हेजबोलानंतर इस्रायलचा हुथी बंडखोरांवर हवाई हल्ला; येमेनमधील होदेदाह बंदराला केलं लक्ष्य!
Israel-Lebanon conflict,
लेबनॉनशी युद्धविरामाची अमेरिकेची सूचना इस्रायलनं फेटाळली; सर्वशक्तिनिशी हेजबोलाशी लढण्याचे लष्कराला आदेश!
pakistan beggars export in saudi
पाकिस्तानातून भिकाऱ्यांची निर्यात; सौदी अरेबिया प्रशासनाचं पित्त खवळलं, काय आहे प्रकरण?
558 people have died in Israel attacks
इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत ५५८ जणांचा मृत्यू; लेबनॉनमध्ये संघर्ष चिघळण्याची भीती

‘बीएलए’ने हत्यासत्रासाठी २६ ऑगस्ट हा दिवस निवडला, कारण त्याच दिवशी २००६ मध्ये बलुचिस्तानचे माजी मुख्यमंत्री आणि बलुच आंदोलनाचे नेते नवाब अकबर बुगटी पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईत मारले गेले होते. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला अशा प्रकारे कारवाईत ठार मारणे हे तेथील फसलेल्या लोकशाहीचे आणि अनियंत्रित लष्करशाहीचेच निदर्शक आहे. अशा धोरणांमुळेच तेथे शाश्वत शांतता कधीही नांदू शकली नाही. या प्रांतात जवळपास दीड कोटी नागरिक राहतात. खनिज तेल, कोळसा, सोने, तांबे, नैसर्गिक वायू आदींनी हा प्रदेश समृद्ध आहे. परंतु प्रांताचे सकल उत्पादन आणि दरडोई सकल उत्पन्न पाकिस्तानच्या सरासरीच्या कितीतरी खाली आहे. गेल्या दशकापासून या ठिकाणी चिनी प्रकल्पांची आखणी केली जात आहे. चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ अंतर्गत मार्गिका या प्रांतातून जाते. ग्वादार हे बंदर विकसित करण्याची मोठी योजना आहे, तेही बलुचिस्तान प्रांतातच आहे. बलुच ही स्वतंत्र सांस्कृतिक ओळख असलेली जमात. पाकिस्तान आणि इराण अशा दोन देशांमध्ये विभागलेली आहे. दोन्हीकडील प्रांतांना बलुचिस्तान असे संबोधले जाते. दोन्ही देशांच्या सरकारांकडून बलुचींचे अस्तित्व नाकारले जाते. यातून संघर्ष हा ठरलेला. या सांस्कृतिक संघर्षाला पाकिस्तानी बलुचिस्तानमध्ये आर्थिक, राजकीय संघर्षाची जोड मिळाली. इस्लामाबादमधील पंजाबी वर्चस्ववादी मानसिकतेची सरकारे आणि चिन्यांचे बलुचिस्तानातील प्रकल्प यांच्या संगमात आपल्या पदरात काहीच पडत नाही, याची जाण प्रबळ झाल्यामुळेच चिनी आणि पंजाबी अशा दोन्हींना हल्ली लक्ष्य केले जाते. पाकिस्तानच्या पश्चिम आणि वायव्य सीमेवरील अनुक्रमे बलुचिस्तान आणि खैबर-पख्तुनख्वा हे दोन्ही प्रांत अशांत आहेत. पण त्यातही अलीकडे बलुचिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्तपात होत आहे. कारण या प्रांतातील नागरिकांच्या मूळ प्रश्नाची उकल सोडवण्याची इच्छाशक्ती आणि संवेदनशीलता पाकिस्तानी सरकारांनी कधीही दाखवलेली नाही. या अशांत परिस्थितीमागे भारत, इराण, अफगाणिस्तान अशा परकीय शक्तींचा हात असल्याचे जाहीर केले की आपली जबाबदारी संपते हे इस्लामाबादमधील सत्ताधीशांचे सूत्र ठरलेले आहे. या अनास्थेचे दुष्परिणाम वेळोवेळी आणि जागोजागी दिसू लागले आहेत. पाकिस्तानचे बलुचिस्तान धोरण कसे वर्षानुवर्षे फसलेले आहे, हे रक्तलांछित वास्तव या हल्ल्यांनी अखोरेखितच होते.