एके काळी अफगाणिस्तानला अस्थिर करण्यासाठी मदरशातील युवकांची फौज उभी करून तिला ‘तालिबान’ म्हणवून त्या देशात धाडणार्‍या पाकिस्तानला आता त्याच संघटनेच्या राजवटीविरुद्ध युद्ध छेडावे लागत आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानदरम्यान २७ फेब्रुवारी रोजी सुरू झालेली धुमश्चक्री संपणार कधी याविषयी अनिश्चितता आहे. जगाचे लक्ष पश्चिम आशियातील युद्धभडक्याकडे वळल्यामुळे या विषयावर फार मंथन होताना दिसत नाही.

अफगाणिस्तानच्या तुलनेत खूपच अधिक शक्तिशाली अशी पाकिस्तानची सैन्यदले असून, काबूल व कंदाहार शहरांवर हवाई हल्ले करण्यापर्यंत पाकिस्तानची मजल गेली. पाकिस्तानचे डझनावरी सैनिक या धुमश्चक्रीत मारले गेले, तसेच सीमेवर अनेक ठिकाणी तालिबानकडून छुपे हल्ले सुरूच आहेत. याचे कारण समोरासमोरील युद्धात पारंपरिक असमतोलाने यशाची हमी मिळतेच असे नाही. रशिया-युक्रेन, इस्रायल-हमास युद्धांमध्ये हे अलीकडेच दिसून आले. त्यामुळे तालिबानच्या मर्मस्थळांवर हल्ले करून त्या देशाला जेरीस आणण्याचे पाकिस्तानचे मनसुबे त्वरित यशस्वी होण्यासारखे नाहीत. कारण तालिबान राजवटीकडे अमेरिकी फौजांनी त्या देशात सोडून दिलेली शस्त्रास्त्रे आहेत.

गनिमी काव्याने फिदायीन वा छुपे हल्ले करण्यात माहीर असलेले हजारो बंडखोर आहेत. किती सैन्यबळ वापरून तालिबान राजवट नमू शकेल, याचा अंदाज पाकिस्तानला आलेला नाही. तशात बलुचिस्तान वा खैबर पख्तुनख्वा प्रांतात गेल्या काही आठवड्यांत वारंवार दिसून आलेली बाब म्हणजे, दहशतवाद प्रतिबंधक मोहिमांमध्ये पाकिस्तानी लष्कर कुचकामी, कचखाऊ सिद्ध झाले आहे. अमेरिकी वा चिनी विध्वंसक शस्त्रास्त्रांच्या आधारावर बेटकुळ्या फुगवणे वेगळे नि प्रत्यक्ष युद्धसदृश कारवाईसाठी सिद्ध होणे वेगळे. आता अफगाणिस्तानसह असलेल्या २६०० कि.मी. सीमेवर प्रत्येक चौकी, ठाण्यावर पहारा द्यावा लागणार आहे. ही सीमा अतिसच्छिद्र असल्यामुळे मोठ्या संख्येने अफगाण हल्लेखोर पाकिस्तानात झिरपत राहणार; तेथील लष्करी राजवट आणि तथाकथित लोकनियुक्त सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न करतच राहणार हे स्पष्ट आहे. कारण काबूल-कंदाहारला लक्ष्य करून, स्वत:च खुले युद्ध जाहीर करून पाकिस्तानने अफगाणिस्तानला ‘स्वबचावार्थ’ हल्ले करण्याची संधी दिली आहे. हे हल्ले पाकिस्तानसारखे आधुनिक शस्त्रसज्ज नसले, तरी त्यांचे उपद्रवमूल्य कमी नाही. दुसरे म्हणजे, पारंपरिक हल्ल्यांना काहीएक मुदत असते. ते कधीतरी थांबवावे लागतात, कारण त्यांची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. ताज्या संघर्षाची दखल चीन, कतार यांनी घेऊन मध्यस्थीचा प्रस्ताव मांडला. प्रत्युत्तरादाखल अफगाण बाजूने सुरू झालेल्या छुप्या हल्ल्यांची दखल तितक्या प्रमाणात घेतली जात नाही. पण पाकिस्तानची मनुष्यहानी होतेच आहे.

या धुमश्चक्रीच्या मुळाशी आहे तेहरीके तालिबान पाकिस्तान (टीटीपी) संघटना. तिचे अफगाणिस्तानात बस्तान, पण वावर पाकिस्तानात. पाकिस्तानातील सरकार आणि लष्करी राजवट उलथवून लावणे नि तेथे शरिया सत्ता स्थापन करणे हा या संघटनेचा उद्देश. तिच्या धर्मांधतेसमोर आणि हिंसकपणापुढे पाकिस्तानातील एकाहून एक नामचीन दहशतवादी पाकिटमार वाटावेत अशी या संघटनेची (कु)ख्याती. दहा वर्षांपूर्वी पेशावरमध्ये लष्कर संचालित शाळेवर हल्ला करून तेथील सव्वाशेहून अधिक निष्पाप चिमुकल्या विद्यार्थ्यांचे जीव घेणारी हीच ती संघटना. सुरुवातीस तिच्यामागे भारत असल्याचे दावे पाकिस्तानी शासक करत. आता त्यांचे कर्तेकरविते अफगाणिस्तान असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे. पाकिस्तानच्या निमलष्करी दलांची टीटीपीचे हल्ले थोपवताना दमछाक होत आहे. त्यामुळे त्यांच्या तळांवर आणि त्या बरोबरीने तालिबानच्या प्रमुख ठिकाणांवर हवाई हल्ले करण्याचा मार्ग अनुसरला गेला. अफगाणिस्तानातील कोणतीही लष्करी कारवाई आजवर यशस्वी होऊ शकलेली नाही या इतिहासाचा बहुधा पाकिस्तानला विसर पडलेला दिसतो.

भारताच्या दृष्टीने अफगाण परिस्थिती पुन्हा नाजूक वळणावर गेली आहे. अद्याप त्या देशाशी आपले थेट राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले नसल्याने मदत करता येत नाही. पण ते दृष्टिपथात असताना पाकिस्तानकडून हल्ले सुरू झाले आहेत. जे चाबहार बंदर डोळ्यासमोर ठेवून आपण अफगाणिस्तानशी संबंध वाढवायचे ठरवले, तो इराणमधील प्रदेशच आता इस्रायली ,अमेरिकी हल्ल्यांचे लक्ष्य ठरत आहे. सातत्याने बदलत जाणार्‍या या भूसामरिक परिस्थितीमध्ये आपण प्रत्येक वेळी कालवक्राच्या मागे का राहतो, याविषयी विचार येथील धोरणकर्त्यांनीही करण्याची गरज आहे.