आपल्या रोजच्या ठरावीक साच्यातून, थोडक्यात ‘कम्फर्ट झोन’मधून बाहेर पडून कुठे कुठे केलेला प्रवास माणसाला जेवढा अनुभवांनी समृद्ध करतो, तितकाच अंतर्मनाचा प्रवास त्याला स्वत:विषयी, जगण्याविषयी सखोल विचार करण्यास भाग पाडतो. व्यवसायाने पत्रकार असलेल्या, पर्यटन, संस्कृती या विषयावर सातत्याने लेखन करणार्या, कामानिमित्त देशोदेशी फिरलेल्या आणि सध्या बीजिंग इथे वास्तव्यास असलेल्या पल्लवी अय्यर यांनी ‘ट्रॅव्हल्स इन द अदर प्लेस’ या पुस्तकातील आठ निबंधांमधून त्यांच्या अंतर्मनाचा प्रवास मांडला आहे. एका स्त्रीचा आंतरिक प्रवास असेही त्याचे वर्णन करता येईल. पल्लवी अय्यर यांची याव्यतिरिक्त ‘ओरिएंटिंग’, ‘स्मोक ॲण्ड मिरर्स’, ‘पंजाबी पार्मेझान’, ‘जाकार्ता टेल्स’ इत्यादी त्यांच्या कामानिमित्त झालेल्या फिरस्तीसंदर्भातली आठ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्या ‘सबस्टॅक’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘द ग्लोबल जिगसॉ’ या नावाचे जागतिक साप्ताहिक वार्तापत्र लिहितात. त्यात प्रवास तसेच वेगवेगळ्या संस्कृती यावर जास्त भर असतो.
भारतीय आईवडिलांच्या पोटी जन्मलेली, भारतात वाढलेली, जग फिरून बहुश्रुत झालेली लेखिका आपल्या आत डोकावण्याचा अनुभव मांडताना मात्र ‘ट्रॅव्हल्स इन द अदर प्लेस’ असे म्हणते हे लक्षात घेण्यासारखे आहे. वाचकासाठीही तिच्या मनाची ही गुंफा त्याला वेगळ्या जगात घेऊन जाणारी आहे. कारण चीन, बेल्जियम, जपान, इंडोनेशिया आणि स्पेन या देशांमधली कामानिमित्तची लेखिकेची भटकंती, अतिशय समृद्ध अशी भाषाशैली, वेगळे शब्द सहजपणे वापरण्याची हातोटी, लेखनात उतरलेला स्वभावातील मिश्कीलपणा, व्यक्तिगत तसेच व्यापक अनुभवविश्वाचा मेळ घालण्याची अनोखी पद्धत आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दुर्मीळ होत चाललेला निबंध हा लेखनप्रकार यामुळे हे पुस्तक वाचनीय झाले आहे. एखाद्या जंगलात जाताना समोरची पायवाट हळूहळू दिसत जावी तसे लेखिकेचे व्यक्तिमत्त्व या पुस्तकातून उलगडत गेले आहे.
पुस्तकांविषयीच्या पहिल्याच प्रकरणात लहानपणी केलेल्या वाचनाचे, त्यातील जादूई दुनियेचे वर्णन आहे. लहानपणापासून वाचन करणार्या मुलांचे तेव्हाचे त्यांचे असे खास आवडते लेखक असतात. मुलांसाठी जवळपास ६०० पुस्तके लिहिणारी एनिड ब्लायटन ही तिची आवडती लेखिका. ब्लायटनमुळे आपली कल्पनाशक्ती कशी विस्तारली आणि वाचन कसे आपल्या प्रवासाचे साधन झाले याचे वर्णन या प्रकरणात आहे. आपली दोन छोटी मुले कधी एकदा वाचण्याच्या वयाची होतात आणि आपण त्यांची ब्लायटनशी ओळख करून देतो, असे लेखिकेला झालेले असते. पण तिच्या मुलांची तिच्या आवडत्या लेखकांशी गट्टी होत नाही. ती वाचतात, पण त्यांच्या काळातले आणि त्याहीपेक्षा ती स्क्रीनशरण होतात, याचे तिला फार वैषम्य वाटते, याचे वर्णन ती करते.
‘इलनेस’ या प्रकरणात स्तनांच्या कर्करोगाचे निदान झाल्यापासूनचा मानसिक आणि शारीरिक प्रवास मांडला आहे. कर्करोगाशी दोन हात करणे ही वास्तविक तनमनाला झुंजवणारी गोष्ट. पण ती झुंज देतानाही लेखिकेचे मनोधैर्य फक्त शाबूतच राहत नाही, तर ती काहीशा नवलाईनेच त्या प्रक्रियेकडे पाहते आहे, असे जाणवत राहते. त्यामुळेच कॅन्सरच्या उपचारांनंतर लगेचच प्लास्टिक सर्जरी करावी लागणे, त्या उपचारांनंतर केलेल्या नव्या केशरचनेमुळे आजारापणातून आपल्या विश्वात परत आल्यासारखे वाटणे या गोष्टी येतात. ‘हेअर’ या प्रकरणात तेव्हा जेमतेम नऊ वर्षांची असलेल्या लेखिकेला आपल्या शीख मित्राने केस कापल्याचे समजते आणि धक्का बसतो. १९८४ मधील इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या शीख दंगलीचा याला संदर्भ असतो. तरुणपणी स्वत:चे केस कुरळे करण्याचे फसलेले प्रयोग, कॅन्सरच्या उपचारांत केमोथेरपीमुळे केस गळून गेल्यामुळे विग घालावा लागणे, याबद्दल सांगताना लेखिकेने प्रवासाच्या कल्पनेला एक वेगळेच वळण दिले आहे.
‘पेडागॉजी’ प्रकरणात मुलांच्या अभ्यासाबाबत अति-आग्रही असण्याच्या अनुभवांवर लेखिकेने लिहिले आहे. वास्तविक भारतापेक्षा पूर्ण वेगळी शिक्षणपद्धती असलेल्या देशांतील शाळेत तिची मुले शिकतात आणि मुलांना शिकण्याची मोकळीक देणे हा तिथला स्थायिभाव आहे. अशा वेळी भारताची शैक्षणिक पार्श्वभूमी असलेली आई आणि वेगळ्या वातावरणात शिकणारी तिची मुले ही एक प्रकारची जुगलबंदी ठरते. ‘पासपोर्टिझम’ या प्रकरणात पासपोर्ट या एरवी साध्या वाटणार्या घटकाकडे किती वेगळ्या दृष्टीने पाहता येते याचे दर्शन घडते. पासपोर्ट रँकिंगमध्ये भारतीय पासपोर्ट कमकुवत मानला जातो. त्यावर प्रवास करताना येणार्या अडीअडचणी, व्हिसा अर्जाची गुंतागुंतीची प्रक्रिया आणि अनोळखी देशांत इमिग्रेशनमध्ये अडकण्याची सततची भीती यांवर लेखिकेने भाष्य केले आहे.
भाषा माणसांना कशी जोडते, बातमीदारी करताना आलेले माणसांचे अनुभव आणि त्यातून विकसित होत गेलेले स्वत:चे व्यक्तिमत्त्व, बातमीकडे बघण्याचा तिचा भारतीय वाटावा असा दृष्टिकोन आणि तिच्या पाश्चात्त्य सहकार्याचा वेगळा दृष्टिकोन, चीनमधल्या कार्यक्षम सेवा, तिथल्या लोकांची विनोदबुद्धी, अतिशय सुंदर असे ब्रुसेल्स पण तिथे साधा प्लम्बरही सहज मिळू न शकणे, असे अनुभव येतात.
लेखिकेच्या मते आयुष्य हा काळाच्या प्रवासाचा कोलाज आहे. तिचे लिखाण वाचताना याची सतत अनुभूती येत राहते.
ट्रॅव्हल्स इन द अदर प्लेस,लेखक -पल्लवी अय्यर, प्रकाशक- ट्रॅन्क्युबर बुक्स
पृष्ठे- १९३, मूल्य- ५९९ रु.
