ऐतिहासिक साधनांच्या पहिल्या खंडाची प्रस्तावना पानिपतच्या लढाईतील मराठ्यांच्या पराभवाची मीमांसा अध्र्यावर सोडून राजवाड्यांनी आटोपती घ्यायला सुरुवात केली खरी; परंतु तसे करण्यापूर्वीही काही महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दलचे महत्त्वपूर्ण विवेचन त्यांनी केलेच. आजही ते बहुतांशी आपल्या विचारांना चालना देणारे ठरू शकते म्हणून त्याचा थोडक्यात आढावा घेऊ या.

‘अबदालीच्या सैन्यातले बहुतेक सर्व अफगाणी सैनिक (=गिलजे) धिप्पाड आणि जाडजूड शरीराचे (अर्बुज) होते, त्यांच्या तशा शरीरांपुढे मराठ्यांच्या लहान वामनमूर्तींचा टिकाव लागला नाही’, असा एक आक्षेप घेतला जात असे, त्याचे निराकरण करताना राजवाड्यांची भाषा कशी धारदार झाली होती, हे पाहण्यासारखे आहे. त्यांनी लिहिले, ‘गिलज्यांच्या लांबी-रुंदीपेक्षा मराठ्यांच्या शरीराचे क्षेत्रफळ कदाचित लहान असेल, परंतु लढाईत या क्षेत्रफळावरच मोठी भिस्त असते, असे नाही.

जर्मन, फ्रांक या रानटी लोकांच्या लांबी-रुंदीपेक्षा सीझराच्या रोमन सैनिकांची उंची व रुंदी कमी असे; परंतु प्रतिस्पर्धी लोकांच्या पाव, अर्धा फूट उंचीचा वचपा रोमन सैनिक भयंकर रीतीने भरून काढीत, हे प्रसिद्ध आहे. तोच प्रकार मराठ्यांचा होता… कर्नाटकातील राठ व धिप्पाड शेतकरी व ढिसूळ शीख; मथुरा-वृंदावनातील गलेलठ्ठ बैरागी; पंजाबातील उंच, धिप्पाड शीख; रजपुतान्यातील रुंद छाताडाचे व भरगच्च मासाचे राठोड या सर्वांना लहान्या परंतु काटक मराठ्यांनी वेळोवेळी चीत केले आहे. त्या मराठ्यांना अर्बुज गिलज्यांचे किंवा पृथ्वीच्या पाठीवरील कोणत्याही मनुष्याचे भय मागे कधी वाटले नाही व पुढे कधी वाटणार नाही.

१४ जानेवारी १७६१च्या लढाईत मराठ्यांचा पराजय झाला म्हणून जर गिलज्यांच्या धिप्पाडपणाचे पोवाडे गावयाचे असतील, तर २३ नोव्हेंबर व ७ डिसेंबर १७६०च्या लढायांत मराठ्यांचा जय झाला म्हणून गिलज्यांच्या धिप्पाडपणाचे क्षुल्लकत्वही वर्णन करणे जरूर आहे. तात्पर्य, शरीराच्या लहान-मोठेपणाचा परिणाम पानिपतच्या लढाईत काहीच झाला नाही…’

अर्थात मराठे पानिपतच्या लढाईत हरले, तरीही त्यांचीच बाजू सर्वार्थाने वरचढ ठरली, असा बिनबुडाचा अभिनिवेशी दावा राजवाड्यांनी कधीच केला नाही. ‘त्या लढाईचे परिणाम काय झाले?’ असा प्रश्न स्वत:च उपस्थित करून त्यांनी त्याचे भलेमोठे लांबलचक उत्तरही दिले. काही काही परिणाम एकेका वाक्यात त्यांनी नोंदवले, तर काहींचे जरा विस्तृत स्पष्टीकरणही दिले.

‘प्रथम मराठ्यांचे पाऊल आत आले… नजीबखानाला आपला प्रांत व दिल्लीचे काही वेळ पुढारीपण मिळाले… होळकराची पेशव्यांची धोतरे बडवण्याची भीती नाहीशी झाली… सुजाउद्दौल्याला अयोध्या, काशी, प्रयाग वगैरे प्रांतांत मराठ्यांचा उपद्रव पुन्हा झाला नाही… रोहिलेसुद्धा मराठ्यांच्या कचाट्यातून सुटले… दिल्लीच्या पातशहाचे दैन्य दुणावले… सलाबतजंगाचा प्रधान निजामअली याला गेलेला प्रांत मिळवण्याचा हुरूप आला… मराठ्यांच्या ताब्यात श्रीरंगपट्टण जावयाचे राहून हैदरअलीला तेथे आपली सत्ता स्थापिता आली… सातारची व कोल्हापूरची गादी जोडण्याचे काम तहकूब झाले…’ अशा सुमारे १६-१७ परिणामांची नोंद केल्यानंतर राजवाड्यांनी पानिपतच्या त्या तिसर्या लढाईचे काही परिणाम थोड्या विस्ताराने स्पष्ट केले. त्यात सगळ्यांत महत्त्वाची बाब होती अबदालीबद्दलची. त्यांनी लिहिले, ‘अबदालीला त्या मोहिमेपासून काहीएक फायदा झाला नाही.

जर त्याच्या अंगी काही सामर्थ्य राहिले असते, तर तो बाबराप्रमाणे हिंदुस्थानात राहता; परंतु पानिपतची लढाई झाल्यानंतर त्याने तडक विलायतेचा रस्ता धरला. तो दिल्लीचा पातशहाही झाला नाही. त्याला पंजाबातील प्रांतही मिळाला नाही व त्याला म्हणण्यासारखी लूटही मिळाली नाही. एवंच अबदालीने हिंदुस्थानात येऊन काहीच साधले नाही. मग त्याने हा खटाटोप कशाकरिता केला? स्वार्थ त्याने कोणता साधला? परमार्थ त्याला कोणता लाधला’

राजवाड्यांनी उपस्थित केलेल्या व काहीशा अनुत्तरितच ठेवलेल्या या दुहेरी प्रश्नाच्या भोवती त्यानंतरच्याही अनेक मान्यवर इतिहासकारांचे संशोधन घोटाळत राहिले किंवा केंद्रित झाले, असे म्हटले, तर ते मुळीच वावगे ठरणार नाही.

anand47.hardikar@gmail.com