पानिपतच्या तिसर्‍या लढाईशी संबंधित ऐतिहासिक साधनांचा संग्रह संपादित आणि प्रकाशित करताना राजवाड्यांच्या ध्यानीमनीसुद्धा ‘पाकिस्तान’च्या संकल्पनेचा समावेश होण्याची सुतराम शक्यता नव्हती; परंतु शेजवलकरांनी मात्र ‘पानिपत १७६१’ या आपल्या ग्रंथाच्या मूळ प्रस्तावनेत चक्क त्या दोन बाबींचा संबंध उलगडून दाखवला होता. त्यांनी लिहिले होते, ‘पेशव्यांनी शिवछत्रपतींचे ध्येय एका बाजूस ठेवून मुसलमान दिल्लीपतीच्या छत्राखाली एका हिंदू-मुसलमान राज्याची कल्पना धरून ते साकार करण्यासाठी कंबर कसली. पण नजिबाने इस्लामची खोटी आरोळी ठोकून अब्दालीच्या मदतीने मराठ्यांचा पराभव केला…’ पुढे त्यांनी त्या घटनाक्रमाची विसाव्या शतकातील पाकिस्ताननिर्मितीशी कशी तुलना केली हा तपशील आपल्या या लेखमालेच्या कक्षेत समाविष्ट होऊ शकत नाही. जिज्ञासूंनी शेजवलकरांचा मूळ ग्रंथच त्यासाठी वाचायला हवा.

तथापि ‘मराठ्यांनी उत्तरेत जायला नको होते’, असे ठासून प्रतिपादन करणार्‍या शेजवलकरांनी विवेचनाच्या ओघात ‘मुख्यत: धर्माच्या रक्षणासाठी व देशाच्या स्वातंत्र्यासाठी मराठ्यांनी क्षत्रियकर्म अंगीकारले होते’, असे लिहिले. राजवाडे यांच्या प्रतिपादनाचा अर्कच शेजवलकरांनी आपल्या पुस्तकाच्या अत्यंत परिणामकारक पद्धतीने केलेल्या समारोपात आढळला, ही बाब अभ्यासकांच्या नजरेतून सुटली नाही.  शेजवलकरांनी आपल्या ग्रंथाच्या उपसंहारात एक आठवण सांगितली आहे. पूर्व बंगालमधून नागपूर येथे शिक्षक परिषदेला आलेल्या एका बंगाली शिक्षकाने म्हणे भोसले कुटुंबप्रमुखाला विचारले की, ‘तुम्ही गंगा ओलांडून आमच्या पूर्व बंगालमध्ये येण्याचा आळस का केलात, ते सांगा. तुमच्या त्या न येण्यामुळेच तेथील मुसलमान मस्त राहून त्यांनी आता आम्हांस आमचा देश सोडण्यास लावले आहे.’ म्हणजे मराठे तेथे जाते, तर आजचा प्रसंग (=पूर्व पाकिस्तानातून निर्वासित होऊन भारतात येण्याचा) त्यांच्यावर आला नसता.

याचा स्पष्ट अर्थ हाच की, मराठे नर्मदेच्या उत्तरेस गेले, हे ठीक झाले!  शेजवलकरांनी ग्रंथाचा समारोप करताना जे लिहिले, ते या दृष्टीने खूप महत्त्वाचे होते. ‘आपला सध्याचा भारत ज्या प्रदेशांचा बनला आहे, ते प्रदेश मराठ्यांनी आपल्या खंडणीखाली आणलेले आहेत; याउलट जो प्रदेश आता पाकिस्तानकडे गेला आहे, त्यात मराठ्यांचे पाऊल पडले नव्हते, असे दिसून येते. याची जाणीव भाजलेल्या लोकांना आता अकल्पितपणे होताना आढळते. मराठे जेथे जेथे गेले, तेथील दबलेल्या हिंदूंची मुसलमानांच्या भीतीतून त्यांनी सुटका केली. हे एक प्रकारचे नैतिक पुनरुत्थानच होते. बंगाली इतिहासकार मराठ्यांच्या स्वार्‍यांचे वास्तविक रहस्य न ओळखता मराठ्यांनी आमच्या वंगभूमीत अनर्थ घडवला. अशी केवढीही हाकाटी करोत; पण त्यांनी विसरू नये की, जो बंगाल रघूजी भोसल्यांच्या व भास्कर राम कोल्हटकरांच्या शिलेदारांनी लुटला, तेवढाच आज स्वतंत्र भारतात सामील झाला आहे!… मराठ्यांनी सर्व हिंदुस्थान तुडवले असेल, लुटले असेल, दुसर्‍याही अनेक चुका केल्या असतील; पण त्यांनी पाचशे वर्षांच्या इस्लामी वरवंट्याखाली चुरडलेल्या हिंदू प्रजेस आपल्या वर्तनाने ताठ उभे राहण्यास उदाहरण घालून दिले. हिंदुस्थानातील मुसलमानी राज्ययंत्र त्यांनी इतके खिळखिळे केले होते की, कोणत्याही प्रदेशात तेथील प्रजेने बंड करून उठून मुसलमान सुभेदारास हाकून द्यावे व स्वत:चे राज्य स्थापावे. या कामात त्यांस मराठ्यांची मदत आपोआप मिळाली असती आणि हीच शिवछत्रपतीनिर्मित मराठी राज्याची इतिकर्तव्यता होती! इतर प्रांतातील लोकांत हे लोण जाऊन पोहोचू शकले नाही, हीच मराठ्यांच्या इतिहासातील खरीखरी शोककथा होय, पानिपताचा पराभव नव्हे!’ 

‘मराठेशाहीबद्दलचे ऐतिहासिक सत्य हे राजवाडे व शेजवलकर या दोघांच्या विचारांच्या मध्यावर कोठेतरी आहे’, हे प्रा.माधवराव कंटक यांचे भाष्य यथोचित म्हटले पाहिजे, असे वाटते.

– आनंद हर्डीकर

 anand47.hardikar@gmail.com