‘प्रथम स्वराज्याची शुद्ध कल्पना उत्पन्न झाली, तत्साधनार्थ मराठ्यांचे पुढारपण शिवाजी, राजाराम, शाहू व अनुषंगाने बाळाजी विश्वनाथ यांनी केले. या चार पुरुषांच्या प्रयत्नाने ज्याला स्वराज्य म्हणून प्रथम संज्ञा दिली गेली, तो सर्व प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात आला. स्वराज्याचे साधन केल्यावर मराठ्यांच्या वाढत्या पराक्रमाला स्वराज्यांतर्गत प्रदेश संकुचित भासू लागला व तो उफाड्याने स्वराज्याच्या मर्यादेच्या बाहेर पसरू लागला.

सार्वभौमत्वाची कल्पना त्यावेळी अवश्य होऊन तिचा स्पष्ट उच्चार बाजीरावाने शाहूपुढे करून दाखवला. तेव्हापासून हिंदुपदबादशाहीची प्रस्तावना झाली (सुरुवात झाली)’, अशा शब्दांत राजवाड्यांनी तोपर्यंतच्या विवेचनाची संक्षिप्त उजळणी केली. १६४६ ते १७६० पर्यंतच्या विविध घटनांचाही आढावा घेऊन १७६१ सालच्या वादळी घटनाक्रमाकडे आपल्या विवेचनाचा ओघ वळवण्यापूर्वी त्या घटनाक्रमामुळे नेमका काय बदल घडला, याचे अत्यंत वस्तुनिष्ठ चित्र त्यांनी वाचकांसमोर ठेवले.

राजवाड्यांनी ते चित्र रेखाटताना लिहिले, ‘मराठ्यांनी पेशव्यांच्या पुढारपणाखाली समुद्रवलयांकित पृथ्वीचे सार्वभौमत्व मिळवण्याचा मुहूर्त जवळ आणला खरा; परंतु १७६१ साली अबदालीशी युद्ध होऊन मराठ्यांचा कधीही झाला नव्हता असा पराभव पानिपत येथे झाला… त्याही गंडांतरातून निभावून थोड्याच कालावधीत त्यांनी आपली पूर्वीची सत्ता बहुतेक कायम केली; परंतु पूर्वीची भट्टी जी यावेळी बिघडली, ती पुन्हा कधी नीट सावरता आली नाही.

पश्चिमोत्तरेकडील मुलतान, लाहोर, ठठ्ठा, भकर; पूर्वोत्तरेकडील प्रयाग, अयोध्या व बंगाला; दक्षिणेकडील श्रीरंगपट्टण व रामेश्वर आणि पूर्वेकडील तेलंगण व पूर्वसमुद्र हे प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात पुढे कधीच आले नाहीत… १७६०पर्यंत मराठ्यांचे पाऊल एकसारखे पुढे पडत चालले होते, ते १७६१पासून यमुना व तुंगभद्रा या दोन नद्यांच्या आत आले. हे जे आत पाऊल आले, तीच पानिपत येथील पराभव केवढा भयंकर होता, याची साक्ष आहे… आता आपल्याला या पराभवाचाच विचार करावयाचा आहे.’

स्वराज्यप्राप्तीच्या प्रेरणेने इतिहासाची साधने शोधण्याच्या आणि ती संकलित, संपादित व प्रकाशित करून आपल्या समाजामध्ये स्वाभिमानाचे बीजारोपण करण्याच्या प्रयत्नात गुंतलेल्या राजवाड्यांनी आपल्या पहिल्याच खंडाच्या प्रस्तावनेत पूर्वजांच्या गौरवास्पद कामगिरीचा उल्लेख केला होताच, पण त्यापेक्षाही त्यांनी पराभवाच्या कारणमीमांसेला

प्राधान्य द्यायचे ठरवले, ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. पराक्रमाच्या स्मरणरंजनातून प्रेरणा मिळवणे योग्य असले, तरीही ते पुरेसे नाही; पराभवाची कठोर चिकित्सा करून आवश्यक ते धडे गिरवणे आणि रणांगणावर विजयी होण्यासाठी आवश्यक ते ‘शहाणपण’ आत्मसात करणेही आवश्यक आहे, हेच त्यांनी आपल्या कृतीतून सांगितले.

‘पानिपत येथील पराभवाची अनेकांनी वेगवेगळी कारणे कल्पिली आहेत. ग्रंथोग्रंथी लिहिलेल्या मुख्य कारणांचा येथे निर्देश करतो आणि त्यांच्यापैकी खरी कारणे कोणती, याचा उलगडा या ग्रंथात (आणि इतरत्र) छापलेल्या ऐतिहासिक पत्रांच्या साहाय्याने होईल तितका करून दाखवतो’, असे म्हणून राजवाडे यांनी पुढे जवळजवळ ४०-५० पाने जे साधार विवेचन केले, त्यामुळे त्यांच्या तीक्ष्ण चिकित्सक बुद्धीचा आणि ऐतिहासिक साधनांचा अन्वयार्थ लावण्याच्या विलक्षण क्षमतेचा प्रत्यय आल्यावाचून राहिला नाही.

पानिपतच्या पराभवाची सांगितली गेलेली १८ विविध कारणे नोंदवताना राजवाड्यांनी लिहिले, ‘पेशव्यांनी छत्रपतींची सत्ता संपुष्टात आणल्यामुळे स्वामिद्रोहाच्या पापाने पेशव्यांचा क्षय झाला;’ ‘छत्रपतींची सत्ता संपुष्टात आणल्यामुळे सरदारांची मने पेशव्यांविषयी कलुषित झाली;’ ‘मराठ्यांच्या राज्यव्यवस्थेत सत्तेचे केंद्रीभवन झालेले नव्हते, त्यामुळे निरनिराळ्या सरदारांना आपापली सत्ता स्वतंत्रपणे स्थापण्याची दुरिच्छा झाली;’ ‘जातिभेदामुळे मराठ्यांची एकी होण्याचा कधीच संभव नव्हता व काही अघटित कारणांनी काही वेळ एकी झालीच, तर ती लयास जाऊन व जाती-जातींत मत्सर उत्पन्न होऊन सर्वत्र बेबंदशाही माजण्याचा संभव होता. तोच प्रकार १७६१च्या अगोदर थोडाबहुत होऊन पानिपत येथे मराठ्यांचा मोड झाला;’ ‘भरतखंडात सर्व हिंदू लोकांत राष्ट्रीयत्वाची कल्पना पसरली नव्हती;’ ‘ब्राह्मणांच्या पोटजातींत भेद झाला होता’…

वगैरे वगैरे.

anand47.hardikar@gmail.com