‘गोविंदपंताला सरंजामी सरदारी प्राप्त झाली नव्हती व तो कोणत्याही प्रांताचा सुभेदार नव्हता, तथापि मातबर मामलतदार म्हणून त्याची अलीकडे बरीच प्रसिद्धी झाली होती. त्याला सरकारात रसद चौदा लाखांची भरावी लागत असून त्याची वार्षिक मिळकत सामान्य नव्हती… तो दहा हजारांची फौज बाळगत असून त्यासाठी पंचवीस लाख रुपये सरकारातून खात असे… इतकेही करून त्याची गणना मामलतदारांतच होत असे. सरदारांत आपली गणना व्हावी, एतत्प्रीत्यर्थ त्याचे सर्व प्रयत्न चालले होते… मख्त्याच्या कमाविशी करून त्याने सरकारचा फायदा करून दाखवला होता. फौज जवळ ठेवून एखाद्या सरदाराप्रमाणे त्याने अंतर्वेदीत अंमल बसवला होता… अंतर्वेदीतील रोहिले सरदार व सुजाउद्दौला यांच्याशी तो चांगला स्नेह ठेवून असे…’ पेशव्यांची व सदाशिवरावभाऊची ज्या गोविंदपंतावर उत्तरेतील अबदालीविरुद्धच्या मोहिमेत मोठी भिस्त होती, त्याच्या जमेच्या बाजूदेखील राजवाड्यांनी आपल्या विवेचनात आवर्जून समाविष्ट केल्या होत्या.
अशा पार्श्वभूमीवर त्यांनी सदाशिवरावभाऊच्या मोहिमेचा विस्तृत आढावा घ्यायला सुरूवात केली. ‘१७६० च्या २८ एप्रिलला सदाशिवराव सीहोरास आला. तेथून त्याने माघोसिंग, बिजेसिंग, कोटेवाले राणाजी वगैरे रजपूत संस्थानिकांना येऊन मिळण्याविषयी पत्रे व वकील पाठवले. हे सर्व संस्थानिक दोन्ही डगरींवर हात ठेवून होते. जिकडे जोर दिसेल, तिकडे जाण्याचा त्यांचा विचार होता. सदाशिवराव जवळ आल्याकारणाने मराठ्यांना येऊन मिळण्यास त्यांनी रुकार दिला; परंतु आतून अबदालीकडे त्यांचा ओढा होता’.
पुढील घटनाक्रमात महत्त्वाच्या ठरणार
हा बारकावा नोंदवून ते पुढे लिहितात, ‘सीहोरच्या आसपासच्या दंगेखोर मवासांचे पारपत्य करून मराठे खेचीवाड्यात पोचले व तेथील अहिरांचे बंड मोडून भाऊने नरवराच्या दिशेने कूच केले… त्याच वेळी अबदाली अंतर्वेदीमध्ये अनुप शहरी होता. त्याने मराठ्यांच्या ताब्यातल्या इटावेकडे जहानखान व नजीबखान यांना पाठवले. शिवाय सुजाउद्दौल्याशी स्नेह करण्याकरताही. गोविंदपंताचा पाराशर दादोजी नामेकरून कोणी पथक्या त्यावेळी अंतर्वेदीत होता. त्याच्या सैन्याचे व यवनांच्या सैन्याचे युद्ध झाले, त्यात सकुराबादचे ठाणे यवनांच्या हाती पडले. त्याच सुमारास बुंदेलखंडातही बंडाळी माजली… तेव्हा गोविंदपंताच्या ताब्यातील प्रांतांमध्ये अधूनमधून होत राहिलेली ही बंडे कायमची मोडून सरकारकिफायत (सरकारला फायदेशीर ठरेल असे) काम करावे, असा सदाशिवभाऊंनी गोविंदपंताला हुकूम केला…’
‘सुजाउद्दौला, मलकाजमानी, अली गोहर व मीरजाफरखान यांच्याशी राजकीय बोलणी करून त्यांना मराठ्यांच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करावा’, असे सदाशिवरावभाऊने गोविंदपंताला पूर्वीच सांगितले होते. हे काम त्याने अर्धेमुर्धेच केले. ‘अलीगोहराला पातशहा करावयाचा व त्याची वजिरी सुजाउद्दौल्याला द्यावयाची, असे वचन दिल्यास सुजा मराठ्यांना मिळण्यास तयार आहे,’ असे गोविंदपंताने सदाशिवभाऊला कळवले. त्याप्रमाणे शामजी रंगनाथला भाऊने सुजाकडे वकिलीसाठी पाठवले, ही माहिती देऊन त्यांनी पुढे लिहिले की, ‘अबदालीचे व सुजाचे पिढीजाद वाकडे होते… तसे सुजाचे नजीबखानाशीही फारसे चांगले कधीच नव्हते. १७५९ च्या नोव्हेंबरमध्ये तो नजीबखानाला जाऊन मिळाला होता, कारण मराठ्यांच्या स्वारीची त्याला भीती वाटत होती. दत्ताजी अंतर्वेदीतून यमुनेच्या बाजूला परतल्याबरोबर सुजा नजीबखानाला सोडून आपल्या प्रांतात परत आला… नजीबला सोडून सुजाला दोनअडीच महिने झाले नाहीत, तोच गोविंदपंताच्या द्वारे मराठ्यांचे बोलणे लागले. ती सुजाशी दृढ व कायमचा स्नेह करण्यास गोविंदपंताला उत्तम संधी होती. नजीबखान व सुजाउद्दौला यांच्यामध्ये गोविंदपंताचा प्रांत होता. गोड बोलून किंवा जरब दाखवून सुजाला मराठ्यांच्या बाजूने वळवून घेण्याचा प्रयत्न समजा यशस्वी होणारा नाही, असे जाणवल्यास म्हणजेच सुजाच्या मनात मराठ्यांना मिळावयाचे नसल्यास निदान अबदालीला तरी त्याने मिळू नये, एवढे तरी काम करावेच करावे म्हणून सदाशिवरावाची गोविंदपंताला इशारत होती.’ ‘आपण वाटेल ते काम करून देऊ म्हणून गोविंदपंताने पुण्यात भाऊला आश्वासने दिली होती, तेव्हा सुजाउद्दौल्याशी स्नेह जुळवून आणण्याचे काम गोविंदपंत निश्चित घडवून आणील, अशी भाऊला आशा वाटत होती…’ राजवाड्यांनी तत्कालीन स्थितीचे असे चित्र रेखाटले.
