बाकीच्यांचे जाऊ द्या, पण पंकजाताईंसारख्या हुशार व ‘तर्कसंगत’ बोलणार्या राजकारणी तुम्हाला शोधूनही सापडणार नाहीत. ‘अयोध्येत जे घडले त्यात सरकारचा काय दोष? दोष द्यायचाच असेल तर तो चोरांना द्या’ हे त्यांचे विधान याचीच साक्ष देणारे. सरकार नेहमी श्रेयाचे धनी होत असते, अपश्रेयाचे नाही. या तत्त्वाची आठवण त्यांनी सार्या देशाला पुन्हा एकदा करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच! मग अपश्रेयाचे धनी कोण असा प्रश्न कुणाला विचारायचाच असेल तर जरूर विचारा. त्याचेही उत्तर ताईंकडे तयार आहे. सत्तेत नसलेले विरोधक हेच अपश्रेयाचे धनी. असा वेगळा विचार करण्याची क्षमता आजकाल फारच कमी नेत्यांमध्ये उरली, त्यातल्या ताई एक.
चोरीची जबाबदारी चोरांवर ढकलून दिली की मग ती चोरी झाली कशी? कवाडे, कुलूप बरोबर लावले नव्हते का? देखरेखीसाठी ठेवलेला माणूस काय करत होता यासारख्या प्रश्नांची ब्याद टळते. ताईंनी नेमके हेच ओळखले व देशभर गाजणार्या चोरीचा निकाल एका वाक्यात लावून टाकला. त्यांचे हे विद्वत्तापूर्ण वाक्य ऐकून इतके दिवस ताईंना मंत्रीपदापासून दूर ठेवल्याचा पश्चात्ताप पक्षालाही होत असेल. तशा ताई नेहमीच अशी खमकी वक्तव्ये करत आल्यात आजवर.
देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्यावर जनतेच्या मनातली मुख्यमंत्री मीच असे विधान करतानाही त्यांनी पक्ष वा तो चालवणार्या सरकारमधील धुरीणांना अजिबात दोष दिला नाही. नंतर याच वाक्याची चोरी शिंदे सेनेने केली पण त्या पक्षातील नेत्यांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न ताईंनी कधी केला नाही. जोवर पक्ष वा त्याकडून चालवले जाणारे सरकार अडचणीत येत नाही तोवर चोरीचा बागुलबुवा उभा करायचा नाही, हे तत्त्व कसोशीने पाळणार्या ताई एकमेव.
मध्यंतरी त्यांच्या भावाच्या ‘आका’मुळे बीड गाजले. सार्यांच्या नजरा तेव्हा ताईंकडे होत्या पण त्या एकच वाक्य म्हणाल्या. ‘कुठे आहे रे तो उजवा हात?’ बस्स. चोर कोण हे यातून स्पष्ट झाले. उगीच संदर्भासहित स्पष्टीकरण देण्याचा त्यांचा स्वभाव नाही. असे काही बोलले की त्याला फाटे फोडण्याची संधी माध्यमांना मिळते. ती का द्यायची असा विचार त्या सतत करत असतात. त्यांना नेमकी व चपखल वाक्ये सुचतात ती यातून. अगदी अलीकडेच त्या पालकमंत्री या नात्याने जालन्यात बोलावलेल्या बैठकीतून स्वत:च निघून गेल्या. पक्षाच्याच काही लोकप्रतिनिधींनी निरर्थक बडबड केली म्हणून. तरीही त्यांनी पक्षाला दोष दिला नाही.
बडबडणार्या नेत्यांनासुद्धा नाही. चोरी व बडबड यातला फरक जेवढा ताईंना कळतो तेवढा कुणालाच कळत नाही. कुठेही काही गैर घडत असेल तर त्याला व्यक्ती दोषी असते, सरकार वा पक्ष नाही यावर त्यांची ठाम श्रद्धा. पक्ष कधीच चुकत नाही व सरकार तर नाहीच नाही या तत्त्वावर त्यांना कमालीचा भरवसा आहे. संपूर्ण जगात कुठेही काही घडले तर तिथल्या सरकारला जबाबदार धरण्याची वृत्ती अलीकडे फार वाढत चाललेली. याबद्दल त्या कायम चिंता व्यक्त करत असतात पण खासगीत. काही नतद्रष्ट त्यांच्या या भूमिकेचा संबंध मोठ्या महत्प्रयासाने मिळालेले मंत्रीपद जाऊ नये याच्याशी जोडतात. ताई अशांकडे अजिबात लक्ष देत नाहीत, उलट या अशा वक्तव्यांतून पक्षीय पर्यावरण कसे चांगले राहते यावर त्या भाष्य करत असतात. या चोरांना मंदिरात नेमले कुणी असले फालतू प्रश्न त्यांना कधीच पडत नाहीत.
