– आनंद हर्डीकर

मराठी भाषेच्या काव्यवैभवाची थोरवी वि.का. राजवाडे यांच्या – आणि अन्य अनेक मराठी तरुणांच्याही – मनावर बिंबवण्याचे काम अप्रत्यक्ष पद्धतीने पार पाडणारे प्रभावी वाङ्मयसेवक म्हणून परशुराम बल्लाळ ऊर्फ परशुरामपंत तात्या गोडबोले यांचा अगदी संक्षिप्त परिचय या टप्प्यावरच करून घेणे योग्य ठरेल.

मराठेशाहीच्या अखेरच्या पर्वात, १७९९ साली जन्मलेल्या परशुरामाने वाईला शिक्षण घेऊन झाल्यावर पुढे पुण्यात येऊन जोगांच्या पेढीवर कारकुनी करत असतानाच मराठी काव्याचा अभ्यास आरंभला. त्याचा त्या क्षेत्रातला व्यासंग वाढला. पुढे योगायोगाने त्यांचा परिचय मेजर थॉमस कँडी यांच्याशी झाला. कँडी जेव्हा मराठी ट्रान्स्लेटरच्या पदावर रुजू झाला, तेव्हा त्याला साहजिकच स्थानिक तज्ज्ञाच्या मदतीची गरज भासली. त्याने परशुराम गोडबोले यांची आपला खास पंडित म्हणून नेमणूक केली. ते त्या पदावर अखेरपर्यंत काम करत राहिले. संस्कृत ‘पंडिती’ कोश तयार करणार्‍या संपादक मंडळातले त्यांचे काम खूप नावाजले गेले; तसेच ‘वेणीसंहार’, ‘शाकुंतल’, ‘मृच्छकटिक’, ‘नागानंद’ व ‘पार्वतीपरिणय’ या संस्कृत नाटकांचे त्यांनी केलेले अनुवाददेखील प्रशंसेला पात्र ठरले.

त्यापेक्षाही अधिक लोकप्रिय व परिणामकारक ठरलेले परशुरामपंत गोडबोेले यांचे काम म्हणजे ‘नवनीत’ या शीर्षकाखाली त्यांनी संकलित केेलेले मराठी संत-पंत-तंत कवींच्या काव्यातील वेचे. ‘नवनीत’ अर्थात ‘महाराष्ट्र भाषेंतील कवितांचे वेंचे’ या पुस्तकाची पहिली आवृत्ती १८५४ साली शिळाछापावर पुणे पाठशाळेतील छापखान्यात मुद्रित केली होती. त्याच्या प्रस्तावनेत आपला हेतू स्पष्ट करताना तात्यांनी लिहिले होते, ‘कोणतीही भाषा सुधारण्यास व मनाची शक्ती वाढवण्यास कविता हे एक मोठे साधन आहे. सांप्रत सर्व विद्या शिकवण्याचे प्रयत्न चालले आहेत; त्यात कविता शिकवण्याचे साधन कमी आहे. ते अवश्य असले पाहिजे, असे बहुतांचे मत आहे. तोच उद्देश हे पुस्तक रचण्याचा आहे.’

हेतू स्पष्ट केल्यावर परशुरामपंत तात्यांनी प्रस्तावनेत पुढे अगदी थोडक्यात पण त्यांनी संकलित केलेल्या काव्याच्या बहुविधतेची माहिती दिली होती. त्यांनी म्हटले होते, ‘महाराष्ट्र देशात जी मराठी भाषा चालत आहे, तिला प्राकृत भाषा म्हणतात. या प्राकृत भाषेत कविता करणारे मुकुंदराज, ज्ञानेश्वर, एकनाथ, मुक्तेश्वर, वामनपंडित, रामदास, तुकाराम, मोरोपंत, अमृतराय इत्यादिक बहुत होऊन गेले. त्यांनी पुष्कळ प्रकारच्या कविता केल्या आहेत. ज्याला मराठी भाषेचे ज्ञान चांगले असावे, अशी इच्छा असेल, त्याने प्राचीन व अर्वाचीन कवींचे प्राकृत ग्रंथ पुष्कळ वाचणे आवश्यक आहे. साधारणपणे गद्यात लिहिलेल्या विषयांपेक्षा कवितेत वर्णिलेला विषय वाचणार्यांस गोड लागतो; कारण की कवितेत भक्ती आदि भाव व करुणशृंगारादि रस असतात, तसेच उपमादिक अनेक अर्थालंकार व अनुप्रास-यमकादि शब्दालंकार असतात. त्यामुळे वाचणार्‍यांचे मनोरंजन होते…’

आणि प्रस्तावनेच्या शेेवटच्या भागात आपल्या पुस्तकाची शिफारस करताना तात्यांनी म्हटले होते की, ‘मराठी भाषेत कविताग्रंथ पुष्कळ व मोठाले आहेत. त्यात छंद व चालीही अनेक प्रकारच्या आहेत. त्यांची गोडी लागून तिकडे तरुणांच्या मनाची प्रवृत्ती व्हावी ह्याकरता मराठीतल्या बहुतेक कवितांतील थोडे थोडे वेचे घेऊन हे एक लहानसे पुस्तक तयार केले आहे. हे मन लावून वाचले असता कवितांचे प्रकार, त्यातील चमत्कार व रस वगैरे सर्व थोडक्यात समजतील. ह्या लहान पुस्तकाचा अभ्यास चांगला झाला असता (मूळ) मोठाले ग्रंथ पाहण्यास मार्ग सुलभ होईल.’

जरी परशुरामपंत गोडबोले यांनी आपले पुस्तक लहान असल्याचे म्हटले असले, तरी ते चांगलेच जाडजूड जवळजवळ पाचशे पानांचे होते. विशेष म्हणजे ‘नवनीत’ या पुस्तकाची भूमिका कायम ठेवून पुढे इंग्रज शिक्षणाधिकार्यांच्या आदेशावरून समाविष्ट वेच्यांमध्ये अनेकदा फेरबदल करून नवनव्या आवृत्त्या काढल्या गेल्या. शंभर वर्षांच्या अवधीत १८ आवृत्त्या निघाल्या. अठरावी शतसांवत्सरिक आवृत्ती प्रा.अनंत काकबा प्रियोळकर यांनी १९५४ मध्ये सुधारून वाढवली (६१८ पुष्ठे) आणि पुढे ती मुंबई राज्य शिक्षणखात्याने १९५७ साली प्रकाशित केली.

राजवाडे यांच्या प्रेरणाकेंद्रांबद्दलची ही माहिती घेतल्यावर पुढील लेखांकापासून पुन्हा एकदा राजवाडे यांच्या आयुष्याचा मागोवा घेत जाऊ या.