खेळांविषयीची अनास्था, ‘ऑलिम्पिक’ म्हणजे काही तरी जुनाट ग्रीक काळातले आणि औद्योगिक प्रदर्शनच काय ते आधुनिक, अशा कल्पनांचा जाच विसाव्या शतकातल्या पहिल्याच ऑलिम्पिक स्पर्धेला झाला; तोही पॅरिसमध्ये… म्हणजे ऑलिम्पिक- पुनरुज्जीवनाचे जनक पिअर द कुबर्ता यांच्याच शहरात!
अथेन्समध्ये ग्रीकांच्या आग्रहाखातर १८९६मध्ये पहिलेवहिले आधुनिक ऑलिम्पिक पार पडले. पण या स्पर्धेचे प्रधान प्रणेते ज्या देशातले, त्या फ्रान्समध्ये त्यापुढील म्हणजे १९००मधील ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या, त्यांना ऑलिम्पिक का म्हणायचे इथपासून वाद आहेत. कित्येक क्रीडा इतिहासकार या स्पर्धेस ‘फार्सिकल’ असेच संबोधतात. खरे तर हा एक मोठा विरोधाभास. कारण पिअर द कुबर्ता यांनी ज्या उत्साहाने १९व्या शतकाच्या शेवटच्या २५ वर्षांमध्ये ऑलिम्पिकच्या पुनर्जन्मासाठी कष्ट उपसले, सुरुवातीस स्पर्धा पॅरिसमध्ये भरवावी यासाठी आग्रह धरला ते पाहता खुद्द पॅरिसमध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा भरवली जाणार तेव्हा उदंड उत्साही नि उत्सवी वातावरणच हवे ना?
पण तसे काही घडलेच नाही.
कारण कुबर्तांचा दु:स्वास करणारेही पॅरिसमध्ये मोठ्या संख्येने होते आणि विसावे शतक उजाडेपर्यंत त्यांचा प्रभाव कितीतरी पटीने वाढला होता. या मंडळींना कुबर्ता हे शुद्ध स्वप्नाळू वाटत आणि खेळ वगैरे ‘दुय्यम’ बाबींसाठी वेळ, पैसा, ऊर्जा खर्च करणे ही संकल्पनाच त्यांना मान्य नव्हती. कुबर्तांवर कुरघोडी कशी करायची, तर त्यांना भव्यदिव्य वाटणार्या ऑलिम्पिकला एखाद्या अधिक व्यापक प्रकल्पाशी जोडून दुय्यम स्थान द्यायचे!
त्यामुळे पॅरिसमध्ये १९००मध्ये जागतिक प्रदर्शन भरले, तेव्हा ऑलिम्पिक स्पर्धा हा त्या प्रदर्शनाचा केवळ एक भाग होता. प्रदर्शन सहा महिने चालले, तसे ऑलिम्पिकही जवळपास तितकाच काळ चालले. त्याची कोणतीही जाहिरातबाजी झालेली नव्हती. तेथे पोहोचलेल्या आणि सहभागी झालेल्या कित्येक खेळाडूंना आपण ऑलिम्पिकमध्ये सहभागी आहोत याचा पत्ताच नव्हता. अनेकांना मागाहून कळले, की आपण जेथे हातपाय हलवले, त्याला ऑलिम्पिक असे संबोधले गेले होते! कारण उद्घाटन आणि समारोप वगैरे काहीही नव्हते. प्रदर्शनाच्या आयोजनाची जबाबदारी असलेल्यांकडेच ऑलिम्पिकचीही जबाबदारी होती. त्यांतील बहुतांना स्पर्धात्मक आयोजनाचा काहीही अनुभव नव्हता. त्यामुळे स्पर्धा विस्कळीत होत्या, त्यांचे नियम निश्चित नव्हते.
जत्रेतले ऑलिम्पिक!
‘युनिव्हर्सल एक्स्पोझिशन’ या नावाखाली भरलेल्या त्या प्रदर्शनात यजमानांना फॅशन आणि नवीन तंत्रज्ञानाच्या सादरीकरणात रस होता. फ्रान्सच्या तांत्रिक आणि सांस्कृतिक प्रगतीचे दर्शन मांडायचे होते. त्या जोडीला फावल्या वेळात ऑलिम्पिक. एखाद्या जत्रेत खेळ भरवले जातात तशा स्वरूपातले. कोणते खेळ असावेत, खेळाडू कोण असावेत याविषयी काही रूपरेषा नव्हती. नियम नव्हते. त्यामुळे कुणीही सहभागी व्हायचे नि पदक जिंकून जायचे. यातून अनेक गमतीशीर प्रकार घडले. पिअर द कुबर्ता यांच्या मायदेशीच अशा प्रकारे ऑलिम्पिक या संकल्पनेची ती बालवयात असताना थट्टा मांडली गेली.
पण हे असे का घडले?
अवघ्या काही वर्षांपूर्वीपर्यंत कुबर्ता म्हणतील ती पूर्व दिशा असायची. पण त्यांनी ऑलिम्पिक पुनरुज्जीवित करण्यासाठी ग्रीक, इंग्लिश, अमेरिकन संकल्पना, परंपरांचा आधार घेतला. पॅरिसमधील काही लब्धप्रतिष्ठितांना तो प्रकार आवडला नव्हता. खेळातून तंदुरुस्ती आणि सांस्कृतिक घुसळण, ऑलिम्पिकसारख्या वैश्विक स्पर्धांतून वैश्विक मानवता आणि बंधुता वगैरे संकल्पना भोळसट आणि स्वप्नाळू मानणार्यांची संख्याही पॅरिसमध्ये मोठी होती. औद्योगिक प्रगती, फॅशनमधील प्रयोग, साहित्यनिर्मिती, सिनेमासारख्या नवीन माध्यमाशी ओळख झाल्यामुळे तत्कालीन स्पर्धक महासत्ता ब्रिटन, अमेरिकेच्या तुलनेत स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी युनिव्हर्सल एक्स्पोझिशन या प्रदर्शनाच्या संयोजकांना महत्त्वाचे वाटले.
या प्रदर्शनाच्या निमित्ताने जगभरातील नागरिक पॅरिसमध्ये दाखल होतील, त्यांच्यासमोर ऑलिम्पिकचे महत्त्व अधिक व्यापक आणि ठळक स्वरूपात मांडता येईल, अशी पिअर द कुबर्ता यांची अपेक्षा होती. त्यांना तर या स्पर्धेच्या निमित्ताने प्राचीन ऑलिम्पिया शहराची प्रतिकृती पॅरिसमध्ये उभारायची होती. पण एक्सपोझिशनचे संचालक आल्फ्रेड पिकार्ड यांना हे असे काही करणे हा कालविसंगत खटाटोप वाटला. ऑलिम्पिक ही रूढीवादी परंपरा. एक्स्पोझिशन ही नवयुगाच्या नांदीची जत्रा. खेळाच्या निमित्ताने देशोदेशीचे पाहुणे पॅरिसला येऊन एक्स्पोझिशनला भेट देत असतील तर ठीक. पण मुख्य आकर्षण हे एक्स्पोझिशनच असेल यावर पिकार्ड ठाम होते.
कुबर्ता यांना आणखी एक धक्का दरम्यानच्या काळात बसला होता. प्रदर्शनादरम्यान खेळांच्या संयोजनाचे सर्व हक्क आपल्याकडे असतील, हे ‘युनियन ऑफ द फ्रेंच सोसायटीज ऑफ ॲथलेटिक स्पोर्ट’ या संघटनेने नोव्हेंबर १८९८मध्येच जाहीर करून टाकले. कुबर्ता या संघटनेचे सचिव होते. त्यांनी आयोजनामध्ये सक्रिय सहभागापासून दूर राहावे, असे त्यांना ‘बजावण्यात’ आले. पिकार्ड यांनी खेळांच्या आयोजनातून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीलाच बाजूला केले. कुबर्ता हे त्यावेळी ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष होते. त्याऐवजी पिकार्ड यांनी डानिएल मेरिलाँ यांच्यावर एक्स्पोझिशनमधील क्रीडा स्पर्धांची जबाबदारी सोपवली.
ऑलिम्पिकमधून ‘ऑलिम्पिक’ गायब!
कानामागून येऊन तिखट झालेल्या मेरिलाँ यांनी संपूर्ण वेळापत्रकच उलटेपालटे केले. त्यामुळे मूळ वेळापत्रकानुसार ज्यांनी नियोजन केले होते, त्या बहुतेकांनी माघार घेतली. सन १९०० मध्ये मे ते ऑक्टोबरमध्ये युनिव्हर्सल एक्स्पोझिशनच्या अंतर्गत ऑलिम्पिकच्या नावाखाली जे काही भरवले गेले, त्यांस ‘ऑलिम्पिक’ संबोधण्यास संयोजकच नाखूश होते. या स्पर्धांचा अधिकृत नामोल्लेख ‘इंटरनॅशनल कॉन्टेस्ट्स ऑफ फिजिकल एक्सरसायझेस ॲण्ड ऑफ स्पोर्ट’ असा केला गेला. ऑलिम्पिक असा उल्लेखही अधिकृत पत्रव्यवहारांमध्ये केला गेला नाही. त्या काळच्या वृत्तपत्रांमध्येही इंटरनॅशनल गेम्स, पॅरिस चॅम्पियनशिप, ग्राँप्री ऑफ पॅरिस एक्स्पोझिशन असे उल्लेख आढळतात.
या स्पर्धेतील कित्येक खेळांना ऑलिम्पिक खेळ म्हणून कधीही मान्यता मिळाली नाही. मासेमारी, पाण्याखाली पोहणे, बलूनिंग, अडथळ्यांचे जलतरण अशी काही उदाहरणे देता येतील. हॉट एयर बलूनिंगमध्ये काही दूरवर पोहोचले. एक जण रशियाच्या सीमेवर उतरला, त्याला अटकही झाली होती. विजेता युक्रेनच्या सीमेवर पोहोचला, त्याला पॅरिसमध्ये स्वखर्चाने येऊन बक्षीस घ्यावे लागले. नेमबाजी स्पर्धेत जिवंत कबुतरे वापरली गेली. ॲथलेटिक्स स्पर्धा चिखलाच्या ट्रॅकवर भरवल्या गेल्या, ज्यात मध्ये झाडेही होती. गोळाफेक नि थाळीफेक स्पर्धेमध्ये इतके अरुंद मैदान होती, की काही गोळे नि थाळ्या प्रेक्षकांमध्ये गेल्या. लांब उडी स्पर्धकांना स्वत:च स्पर्धेपूर्वी खड्डा खणावा लागला.
महिलांचा प्रथमच सहभाग हे वैशिष्ट्य वगळल्यास पॅरिस ऑलिम्पिक १९०० म्हणजे खरोखरच एक फार्स होता. कित्येक पाहुणे एक्स्पोझिशनसाठी आले होते, त्यांतील काहींनी हौसेखातर स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्यांतील एक होत्या, मार्गारेट ॲबॉट. त्या त्यांच्या मातोश्रींबरोबर गॉल्फ स्पर्धेत उतरल्या आणि सुवर्णपदक विजेत्या ठरल्या. पण याचा त्यांना पत्ताच नव्हता. अखेर १९५५मध्ये याविषयी एका लेखकाने वाच्यता केली, त्यावेळी मार्गारेट ॲबॉट हयात नव्हत्या!
खेळ अनास्थेचा…
हा सगळा अनास्थेचा खेळ पाहून आधुनिक ऑलिम्पिक चळवळीचे प्रणेते पिअर द कुबर्ता निराश झाले. ‘भविष्यात पुन्हा ऑलिम्पिक स्पर्धा झाल्याच तर तो चमत्कार ठरेल’, असे बोलून गेले. तरीही, या स्पर्धेतून काही धडे जरूर मिळाले. उदा. ऑलिम्पिकमध्ये किमान खेळ, खेळाडू आणि क्रीडांगणे याविषयीचे निर्णयाचे अधिकार ऑलिम्पिक समितीकडेच राहतील, याकडे कटाक्षाने पाहिले गेले.
आणि कुबर्तांना अपेक्षित असलेला ‘चमत्कार’ पुन्हा घडला… तोही त्यांच्याच अखत्यारीत!
पॅरिसमध्येच १९२४मध्ये दुसर्यांदा ऑलिम्पिक भरवले गेले, त्या वेळी आयओसीचे प्रमुख म्हणून सूत्रे कुबर्तांकडेच होती. त्यावेळी त्यांनी कोणतीही सूट स्थानिक मंडळींना दिली नाही. तोवर, एकंदर ऑलिम्पिकबाबतची अनास्थाही हळूहळू दूर होऊ लागली होती.
थोडक्यात, आधुनिक ऑलिम्पिक मालिकेतील दुसरे पॅरिस १९०० ऑलिम्पिक हे आजही त्यातील गमतीशीर किश्श्यांसाठीच ओळखले गेले. पण चळवळीसाठी ती स्पर्धा भवितव्याविषयी गंभीर प्रश्न उपस्थित करणारी ठरली. त्या प्रश्नांचे जंजाळ १९०४ सालात ॲटलांटिक ओलांडून अमेरिकेत भरलेल्या तिसर्या ऑलिम्पिकपर्यंत कायम राहिले.
siddharth.khandekar@expressindia.com
