पॅरिस ऑलिम्पिक १९२४ मध्ये आणखीही काही बदल प्रथमच दिसून आले. सहभागी खेळाडू आणि त्यांच्या सहायकांसाठी स्वतंत्र राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था व्हावी, यासाठी ऑलिम्पिक व्हिलेजची निर्मिती करण्यात आली. रेडिओ वार्तांकन आणि समालोचनही याच ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच करण्यात आले…
बेल्जियममध्ये अँटवर्प येथे १९२० मध्ये झालेल्या युद्धोत्तर ऑलिम्पिकच्या नेटक्या संयोजनामुळे ऑलिम्पिक समितीला उभारी मिळाली होती. युद्धजर्जर असूनही बेल्जियमने ऑलिम्पिक भरवून दाखवले, याचे ऑलिम्पिक समिती प्रमुख पिअर दा कुबर्ता यांना विलक्षण कौतुक वाटले. त्या ऑलिम्पिकमध्येच सुपरिचित ऑलिम्पिक ध्वज पहिल्यांदा फडकवला गेला. तसेच खेळाडूंना ऑलिम्पिक शपथही पहिल्यांदा दिली गेली.
ऑलिम्पिकची स्वत:ची अशी ओळख, आकृतिबंद तयार होत होता. पहिल्या महायुद्धाने स्पर्धेत खंड पडला, तरी ही स्पर्धा युरोप आणि अमेरिकेत बर्यापैकी सवयीची बनू लागली होती. युद्धे पुढेही येणार होती. त्यामुळे खंडही पडणार होता. पण ऑलिम्पिक थांबणार नव्हते. थांबवले जाणार नव्हते. ऑलिम्पिक समितीला स्पर्धेविषयी आशा वाटणे साहजिक होते. पण सहभागींचा, सरकारांचा, सर्वसामान्यांचा ऑलिम्पिककडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागला होता आणि ही बाब या चळवळीच्या शाश्वततेची साक्ष पटवू लागली होती. या सकारात्मक जाणिवेतूनच १९२१ मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची बैठक झाली. अजेंडा अर्थातच होता, पुढील ऑलिम्पिक शहर निश्चित करण्याचा.
स्वित्झर्लंडमधील लूसान येथे झालेली ती बैठक ऐतिहासिक ठरली. कारण एक नव्हे, तर दोन ऑलिम्पिकसाठी शहरांची निवड झाली. ऑलिम्पिक १९२४ पॅरिसमध्ये, तर ऑलिम्पिक १९२८ नेदरलँड्समधील ॲमस्टरडॅम येथे भरवण्याचे ठरले. पॅरिससमोर अनेक स्पर्धक शहरे होती. ॲमस्टरडॅम, लॉस एंजलिस, प्राग, बार्सिलोना आणि रोम यांनीही इच्छा दाखवली होती. पण पॅरिसने बाजी मारली आणि यात कुबर्ता यांची भूमिका अर्थातच निर्णायक ठरली. पॅरिसला त्यानंतर ऑलिम्पिक भरवण्याची संधी १०० वर्षांनी मिळाली. विशेष म्हणजे त्याही वेळी लिमा येथे २०१७मध्ये झालेल्या आयओसीच्या बैठकीत पॅरिस २०२४ आणि लॉस एंजलिस २०२८ अशा दोन शहरांमध्ये ऑलिम्पिक आयोजित करण्याचा निर्णय एकाच वेळी झाला.
ऑलिम्पिकचे ‘बोधवाक्य’
अँटवर्प १९२० ने ऑलिम्पिकला ध्वजरूपी दृश्य ओळख दिली, पॅरिस १९२४ ने या चळवळीला बोधवाक्य प्रदान केले. ऑलिम्पिक स्पर्धांची संकल्पना गर्भावस्थेत असताना, म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात पिअर दा कुबर्तांनी ऑलिम्पिकची ओळख म्हणून एका बोधवाक्याचा प्रस्ताव मांडला. ते बोधवाक्य होते (लॅटिनमध्ये) कीटीऊस, आल्टिऊस, फोर्टिऊस… म्हणजे अधिक वेगवान (कीटीऊस), अधिक उंच (आल्टिऊस), अधिक शक्तिमान (फोर्टिऊस). आधुनिक काळात या बोधवाक्याचे इंग्रजी, फ्रेंच, इटालियन उच्चार वेगवेगळे आहेत. त्यावरून वादही होत असतात. पण बोधवाक्याच्या अर्थावरून कोणी वाद घातल्याचे उदाहरण नाही. कुबर्ता यांनी त्यांचे मित्र हेन्री डिडॉन यांच्याकडून ते घेतल्याची नोंद आढळते.
हेन्री डिडॉन हे धर्मगुरू होते, तरी त्यांना खेळांमध्येही रस होता. पॅरिस ऑलिम्पिक १९२४ मध्ये स्पर्धेचे अधिकृत बोधवाक्य म्हणून ‘कीटीऊस, आल्टिऊस, फोर्टिऊस’ स्वीकारण्यात आले. कुबर्तांच्या मते, या शब्दांमध्ये आव्हान, आर्जव आणि सौंदर्य यांचा मिलाफ आढळतो. गतिमानता आणि प्रगती हा मानवी उत्क्रांतीचा स्थायीभाव आहे. ऑलिम्पिकच्या मैदानावर त्याचा आविष्कार घडला पाहिजे, असे कुबर्तांना वाटायचे.
सुरुवातीच्या स्पर्धांमध्ये निव्वळ सहभागाला प्राधान्य असायचे, कारण स्पर्धेच्या यशस्वितेची ती पहिली पायरी होती. परंतु १९२४ मध्ये भरवले गेलेले ऑलिम्पिक हे सातवे ऑलिम्पिक होते. तेदेखील पॅरिस म्हणजे कुबर्तांच्या देशात, कुबर्तांच्या नगरीत. तिचे काही एक स्वतंत्र आणि चिरंतन वैशिष्ट्य असावे ही त्यांची इच्छा बोधवाक्याच्या स्वीकाराने फलद्रुप झाली. पंचरंगी वर्तुळांचा तो सफेद झेंडा ही ऑलिम्पिकची दृश्य ओळख, पण बोधवाक्य ही ऑलिम्पिकची वैचारिक ओळख. आता निव्वळ सहभाग महत्त्वाचा नव्हता. आता स्पर्धेत उतरायचे होते विजयासाठी, पदकांसाठी, विक्रमांसाठीही.
वेगवान, उंच, शक्तिमान… अधिकतम, अधिकतम, अधिकतम!
पुढे २०२१ मध्ये ऑलिम्पिक समितीने बारीकशी दुरुस्ती सुचवली आणि स्वीकारली. त्यामुळे तेच नवे बोधवाक्य बनल… ‘कीटीऊस, आल्टिऊस, फोर्टिऊस – कम्युनिटेर’! म्हणजे अधिक वेगवान (कीटीऊस), अधिक उंच (आल्टिऊस), अधिक शक्तिमान (फोर्टिऊस) – एकत्रितपणे (कम्युनिटेर)! तरीदेखील मूळ बोधवाक्याची खुमारी अधिक आहे.
ऑलिम्पिक व्हिलेज आणि बरेच काही…
पॅरिस ऑलिम्पिक १९२४ मध्ये आणखीही काही बदल प्रथमच दिसून आले. सहभागी खेळाडू आणि त्यांच्या सहायकांसाठी स्वतंत्र राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था व्हावी, यासाठी ऑलिम्पिक व्हिलेजची निर्मिती करण्यात आली. सहभागींची संख्या वाढू लागली, तसा यजमान शहरातील नागरी सुविधांवर ताण वाढू लागल्याचे दिसून येत होते. हे होऊ नये यासाठी खेळाडूंच्या निवासासाठी आणि भोजनासाठी स्वतंत्र आसरास्थळ असावे, अशी सूचना पिअर द कुबर्ता अनेक ऑलिम्पिक बैठकांमध्ये मांडत आले होते.
पॅरिसमधील आयोजकांनी ही विनंती मान्य केली. पॅरिसच्या वेशीबाहेर उत्तरेला लाकडी कॉटेजेसचे संकुल उभारण्यात आले. ते ठरले इतिहासातले पहिले ऑलिम्पिक व्हिलेज! आजच्या जमान्यातील संकुलाच्या तुलनेत ते अगदीच प्राथमिक स्वरूपाचे होते. पण त्या काळी त्याचे नावीन्य होते. बाथरूम, कॅफेटेरिया, पोस्ट ऑफिस, हेयरड्रेसर अशा सुविधा पुरवण्यात आल्या. पुढे बहुतेक स्पर्धांमध्ये संबंधित शहराची केवळ क्रीडा संकुले उभारण्याची नव्हे, तर ऑलिम्पिक व्हिलेज उभारण्याची क्षमताही जोखली जाऊ लागली.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्या वेळेपर्यंतचे सर्वाधिक देश आणि खेळाडू सहभागी झाले. एकूण ४४ देशांचे तीन हजारांहून अधिक खेळाडू पॅरिसला आले. इतक्या संख्येने आलेल्या पाहुण्यांसाठी ऑलिम्पिक व्हिलेजची संकल्पना योग्य वेळी जन्माला आली असेच म्हणावे लागेल.
ऑलिम्पिकच्या भव्यतेला साजेसा समारोप सोहळा आणि समारोपाची संचलने यांचा जन्मही पॅरिस १९२४ स्पर्धेतच झाला. याखेरीज ५० मीटर्स लांबीचा आणि मार्गिका निर्धारित केलेले स्विमिंग पूलही प्रथम या स्पर्धेत दिसून आले. सुरुवातीच्या स्पर्धांमध्ये अनेक रंजक, तरी विचित्र क्रीडा प्रकार दिसून यायचे. त्यांतील मोजकेच या स्पर्धेतही आढळले. पण मूलभूत ऑलिम्पिक खेळ म्हणून ओळखल्या गेलेल्या ॲथलेटिक्स, जलतरण, जिमनॅस्टिक्स या क्रीडा प्रकारांना प्राधान्य याच स्पर्धेतून मिळू लागले.
ऑलिम्पिक वार्तांकनाची क्रांती
या स्पर्धेच्या निमित्ताने प्रथमच सुमारे एक हजार निमंत्रित पत्रकार वार्तांकनाच्या निमित्ताने पॅरिसमध्ये दाखल झाले. हाही विक्रमच. ऑलिम्पिक स्पर्धांच्या वार्तांकनाची जबाबदारी त्यांच्यावर होती. पण केवळ क्रीडा स्पर्धांच्याच बातम्या दिल्या जाव्यात ही सक्ती नव्हती. पण स्पर्धांची छायाचित्रे आणि चलचित्रे यांच्यावर ऑलिम्पिक समितीची मालकी असेल हे मात्र निर्धारित करण्यात आले.
याशिवाय आणखी एक क्रांतिकारक घटना घडली. ती होती रेडिओ वार्तांकन आणि समालोचनाची. रेडिओच्या माध्यमातून या स्पर्धेच्या प्रसिद्धीची क्षितिजे आणखी विस्तारली. हा टप्पा महत्त्वाचा होता. म्हणजे खेळाडू वाढले, त्यांची स्वतंत्र निवास सोय करण्याची जाणीव जन्माला आली, स्पर्धेचे वार्तांकन करणारे पत्रकार वाढले आणि रेडिओलहरींनी ती जगभर पोहोचवली. ऑलिम्पिकच्या जडणघडणीत म्हणूनच लंडन १९०८, स्टॉकहोम १९१२, अँटवर्प १९२० आणि पॅरिस १९२४ या स्पर्धांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
प्रतिष्ठाहनन ते प्रतिष्ठासंवर्धन
पॅरिस १९०० हे ऑलिम्पिक सर्वार्थाने विस्मरणीय ठरले होते. कोणीच फारसा उत्साह दाखवला नव्हता, नि अधिक महत्त्व त्यावेळी समांतर भरवल्या गेलेल्या प्रदर्शनाला दिले गेले. ऑलिम्पिक चळवळीचे प्रणेते पिअर दा कुबर्ता यांच्यासाठी ते विशेष नामुष्कीजनक ठरले, कारण घरच्या मैदानावर ऑलिम्पिक संकल्पनेचेच मातेरे झालेले त्यांना पाहावे लागले. तरी हार न मानता ते प्रयत्न करत राहिले.
दरम्यानच्या काळात सेंट लुईसमधील तितकेच निरुत्साही ऑलिम्पिक, ग्रीसने रेटलेले समांतर ऑलिम्पिक आणि पहिले महायुद्ध अशी आव्हाने समोर येत गेली. तरीदेखील ऑलिम्पिक चळवळ विशाल जनमानसात रुजवण्याचा त्यांचा निर्धार कमी झाला नाही. पॅरिसमध्ये २४ वर्षांनी झालेले दुसरे ऑलिम्पिक त्यांच्या प्रयत्नांचा, विश्वासाचा, निर्धाराचा परमबिंदू ठरले. ते यशस्वी करून, ऑलिम्पिकला संरचनात्मक आणि वैचारिक ओळख मिळवून देऊन कुबर्ता समाधान पावले. ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष या नात्याने त्यांचे हे अखेरचे ऑलिम्पिक ठरले. पण ऑलिम्पिकच्या अस्तित्वावर त्यांची छाप चिरंतन कोरली गेली.
siddharth.khandekar@expressindia.com
