दिल्लीवाला
काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी-वाड्रांच्या भाषणांकडं आता सत्ताधारी पक्षाचं लक्ष वेधलं जाऊ लागलेलं आहे. त्यांच्याकडं संवादाची शैली आहे, राहुल गांधी थेट आव्हान देतात, आरोप करतात, मोदी-शहांचं नाव घेऊन सत्ताधार्यांना कोंडीत पकडतात. त्यामुळं त्यांच्या भाषणाला अधिक गोंधळ होतो. राहुल गांधी काय बोलणार हे ऐकण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लोकसभेत येऊन बसतात. त्यातून ‘मी आव्हान स्वीकारतो’, असा संदेशही शहांना द्यायचा असतो. यावेळी राहुल गांधींनी शहांवर इतके आरोप केले पण, ते ऐकायला शहा लोकसभेत नव्हते. महत्त्वाच्या चर्चांना लोकसभेत अमित शहा उपस्थित नाहीत असं क्वचितच होतं. प्रियंकांच्या भाषणाच्या वेळीही गोंधळ होतो, कोणत्या मुद्द्यावर गोंधळ होणार याचा अचूक अंदाज घेऊन त्या बोलत असतात. सत्ताधारी बाकांवरून आरडाओरडा होणार हे गृहीत धरून त्या आधीच बोलायचं थांबतात. स्वत:हूनच, ‘तुम्ही बोला, मी ऐकते’, असं सांगतात.
नीट परीक्षांच्या संदर्भात बोलतानाही प्रियंकांचं भाषण खुसखुशीत झालं. पण, नवनियुक्त केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींवर प्रियंकांनी टीका केली तेव्हा सत्ताधारी संतप्त झालेले होते. आरोपांचे पुरावे द्या, ते प्रमाणित करा वगैरे मागणी होत होती. खरं तर लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला अडचणीत आले होते. प्रियंकांनी केलेल्या आरोपांचा मुद्दा त्यांना वाढवायचा नव्हता असं दिसत होतं. प्रियंकांनी आरोप प्रमाणित करण्याच्या भानगडीत पडू नये आणि सत्ताधार्यांनी मुद्दा सोडून द्यावा असं त्यांच्या चेहर्यावरून दिसत होतं. पण, मुद्दा वाढत गेला, त्यावेळी राहुल गांधींही होते, त्यांनी बाहेर जाऊन ‘एक्स’वर प्रियंका गांधींच्या आरोपांना पाठिंबा दिला आणि त्यानंतर लगेच समाजमाध्यमांवरून जोशींनी त्यावेळी केलेलं वादग्रस्त विधान व्हायरल झालं. भाऊ-बहीण एकमेकांच्या मदतीला असं नेहमी धावून येतात! प्रियंका गांधी लोकांना आपलंसं करून घेतात हे अनेकदा दिसलेलं आहे. लोकसभाध्यक्ष ओम बिर्लांनाही त्यांनी हसायला भाग पाडलं हे विशेष. लोकसभेत वाद सुरू असताना त्या बिर्लांना अचानक म्हणाल्या की, तुम्ही माझ्यावर आज नाराज झालेले दिसता… त्यावर बिर्ला काहीच बोलले नाहीत. भाषण संपल्यानंतरही प्रियंकांनी बिर्लांना, तुम्ही हसायला हवं… थोडं हसा… असं म्हणाल्या. प्रियंकांच्या या संवादशैलीमुळं बिर्लांनाही हसू आवरलं नाही. ठीक ठीक असं म्हणत बिर्लांनी भाषणासाठी दुसर्या सदस्याचं नाव पुकारलं!
आणि विद्वान खूश झाले!
भाजपमध्ये एक विद्वान खासदार नेते आहेत, ते टीव्हींवरील अनेक चर्चांमध्ये सहभागी होतात. आपण प्रगाढ पंडित असल्याचं ते विनाकारणच दाखवत असतात. राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंनी मनुस्मृतीचा विषय काढला. हा विषय सत्ताधार्यांच्या आवडीचा. ते विद्वान खूश झालेले दिसले, त्यांनी लगेच आरडाओरडा सुरू केला. खरगेंनी पहिल्यांदा त्यांच्याकडं लक्ष दिलं नाही, त्यांनी मनुस्मृतीतील एका परिच्छेदाचा इंग्रजी अनुवाद वाचून दाखवला. त्याचा भावार्थ सांगितला. गोंधळ सुरू झाला, हे पाहून भाजपचे विद्वान प्रचंड अस्वस्थ झाले. तेवढ्यात सभागृहाचे नेते जे. पी. नड्डा यांनी या विद्वानांना बोलवून घेतलं. नड्डांशी बोलून ते आपल्या आसनावर आले आणि त्यांनी कुठल्या तरी पुस्तकाचं नाव घेऊन दोन-चार पानांचा आकडा उच्चारला आणि विरोध करायला सुरुवात केली. ना त्या पुस्तकाकडं कोणी लक्ष दिलं, ना त्या पानांकडं. आवाज टिपेला नेऊन ते बोलले तोपर्यंत विरोधक आक्रमक झाले. त्यात विद्वानांचा आवाज विरून गेला. मग ते खाली बसले. तोपर्यंत गिरिराज सिंह उठले आणि त्यांनी ओरडाआरडा केला. मग खरगे संतापले आणि त्यांच्या खास शैलीत गिरिराज यांना फटकारलं. खरगेंसमोर कोणी टिकत नाही, ते संतापले की समोरच्या व्यक्तीला गप्प बसण्याशिवाय पर्याय नसतो. गिरिराजही गप्प झाले. विद्वानांचा आवाज बंद झाला. हा सगळा गोंधळ सुरू असताना खरगे शांतपणे खाली बसले होते, त्यांनी ना विद्वानाकडं बघितलं ना उत्तर दिलं. अखेर त्यांनी त्यांच्या सदस्यांना शांत बसायला सांगितलं आणि नंतर उरलेलं भाषण पूर्ण केलं. खरगेंचं भाषण झाल्यावर विद्वानही सभागृहातून निघून गेले!
अचूक बाण…
लोकसभेत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे सरकारच्या वतीने किल्ला लढवताना दिसले. ना मोदी, ना शहा, ना कोणी इतर वरिष्ठ मंत्री… सत्ताधार्यांचं नेतृत्व फक्त राजनाथ करत होते. त्यांच्या मागं सगळी शाऊटिंग ब्रिगेड. राहुल गांधींना मोदी आणि शहा यांना एकाचवेळी लक्ष्य करायचं होतं. सुरुवात ‘इडियट’पासून झाली. काही क्षण भाजपच्या सदस्यांना काय करावं कळेना. राहुल गांधींनी मोदींचं नाव घेतलेलं नव्हतं. बिर्लांचीही अडचण झाली. कोणाचं नाव तर घेतलेलं नाही मग, राहुल गांधींना अडवणार कसं? त्यांनी राहुल गांधींना बोलू दिलं. इडियट शब्दाचा मारा इतक्या वेळा लागला की भाजपला सहन होईना, ते उसळले. तरीही बिर्ला शांत. नाइलाजाने हस्तक्षेप करून त्यांनी राहुल गांधींना थांबवलं. आरडाओरडा सुरूच होता. भाजपचे खासदार अनुराग ठाकूर, निशिकांत दुबे अस्वस्थ झाले होते. ते प्रत्युत्तर द्यायला आतुर होते. तेवढ्यात केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह आणि इतरांनी गोंधळ सुरू केला. राहुल गांधी रुसून खाली बसले. ते बोलायलाच तयार होईनात. भाजपच्या खासदारांना शांत करा मग, मी बोलतो, असं ते म्हणत होते. अखेर राजनाथ मध्ये पडले, त्यांनी सत्ताधार्यांना खाली बसवलं. पण, त्यांना हे पटलं नाही. अनुराग ठाकुरांनी निशिकांत दुबेंकडं बघून, हे काय चाललं आहे, असे हातवारे केले. मग, दुबेंनी राजनाथ यांच्याकडं बोट दाखवलं. राजनाथ नको म्हणताहेत तर कशाला… खाली बसू, असं त्यांनी हातवारे करून प्रत्युत्तर दिलं. पण, अमित शहांचा राहुल गांधींनी उल्लेख केल्यावर सत्ताधार्यांचा संयम सुटला, त्यांनी, माफी मागा, माफी मागा, अशा आरोळ्या ठोकायला सुरुवात केली. राजनाथ याचंही काही चालेना. ते केवळ समोर सुरू असलेला तमाशा बघत शांत बसून होते. शहांवर हल्लाबोल झाल्यानं सत्ताधार्यांच्या बाकांवर अस्वस्थता पसरली होती. काही मिनिटं गोंधळ सुरू होता, तेवढ्यात शहांचे खास दूत अनिल बलुनी सभागृहात चिठ्ठी घेऊन आले. त्यांनी ती केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांना दिली. मग, गोंधळ टिपेला गेला. राजनाथ यांनी निशिकांत दुबेंना बोलावून घेतलं आणि ‘पॉइंट ऑफ ऑर्डर’द्वारे राहुल गांधींविरोधात आक्षेप घ्यायला सांगितलं. सत्ताधारी असे डावपेच करत असल्याचं बघून काँग्रेसच्या सदस्यांनाही चेव चढला. ते राहुल गांधींना येऊन सल्ला देत होते. प्रियंका गांधींनी राहुल गांधींच्या कानात काही तरी सांगितलं. तिकडून महुआ मोईत्रा आल्या, त्यांनी एक चिठ्ठी राहुल गांधींच्या हातात दिली. काही तरी सल्ला दिला. दुसर्या बाजूने प्रणिती शिंदे आल्या, त्या प्रियंका गांधींना काही तरी सांगत होत्या. काँग्रेसवाले राहुल गांधींच्या भोवती गोळा झाले होते. हे सगळं होईपर्यंत अधूनमधून बिर्ला हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत होते पण, कोणीच ऐकायला तयार नव्हतं. मग, सभागृह तहकूब झालं आणि त्याबरोबर राहुल गांधींचं भाषणही संपलं. पण, त्यांना पुढं बोलण्याची गरजच उरलेली नव्हती. त्यांना जे साध्य करायचं होतं ते अवघ्या काही मिनिटांत झालेलं होतं. राहुल गांधींचा बाण अचूक लागला होता, परिणामही तितकाच प्रभावी ठरला होता.
ही प्रेरणा कुणाकडून?
संसदेच्या आवारात विरोधक जी नाट्यमय निदर्शनं करत आहेत, त्यांची प्रेरणा त्यांनी जेन झींकडून घेतली की काय, हे कळत नाही. आजवर निदर्शनांचा ठरलेला पॅटर्न होता. मकरद्वारासमोर घोषणाबाजी करायची किंवा दोन-चार पावलांचा मोर्चा काढायचा. मध्यंतरी काँग्रेसने गॅस सिलिंडरच्या किमती महागल्यानंतर संसदेच्या आवारात आंदोलन केलं होतं, ते लक्षवेधी होतं. राहुल गांधी वगैरे मकरद्वाराच्या पायर्यांवर चहा पीत बसले होते. संसदेच्या दारात बसून केंद्र सरकारची टिंगल केली जात असल्याची टीका भाजपने केली होती. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जींनी राज्यसभेचे तत्कालीन सभापती जगदीप धनखड यांची नक्कल केली होती. बॅनर्जींची स्टँड-अप कॉमेडी चर्चेचा विषय ठरली होती. ही कॉमेडी धनखडांनी मनावर घेतली नाही. असो. मुद्दा हा की, यावेळी विरोधकांना केंद्र सरकारविरोधात आवाज उठवण्याच्या वेगवेगळ्या युक्त्या-क्लृप्त्या सुचलेल्या पाहायला मिळाल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या विरोधात मोठमोठे फलक घेऊन काँग्रेस सदस्य दररोज घोषणाबाजी करत आहेत. काँग्रेसचे काही सदस्य हातात फलक धरून जोरदार घोषणाबाजी करत होते, त्यामधले एक मराठी खासदार एनडीएतील मराठी खासदारांना भिडले. एनडीएतील मराठी खासदार या काँग्रेसच्या मराठी खासदाराच्या मागे धावले. त्यांना काँग्रेसवाल्यांच्या हातून फलक हिसकावून घ्यायचा होता. जितका ते प्रयत्न करत होते तितका फलक त्यांच्या हातातून निसटून जात होता. काँग्रेसचे मराठी खासदार फलक फिरवत असल्याने एनडीएच्या खासदारांना चकवण्यात ते यशस्वी होत होते. शेवटी एनडीएच्या दोन खासदारांनी फलक हिसकावण्याचा प्रयत्नच सोडून दिला. काँग्रेसच्या सदस्यांनी अमित शहांना लक्ष्य केलं असलं तरी समाजवादी पक्षाचं लक्ष उत्तर प्रदेश असल्यानं त्यांनी राम मंदिराच्या देणगी अपहाराचा मुद्दा बाजूला होऊ दिलेला नाही. लोकसभेतही काँग्रेसचे सदस्य शहांच्या विरोधात घोषणाबाजी करत असताना सपचे सदस्य ‘चंदा चोर, गद्दी छोड’ अशा घोषणा देत होते. सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेश अचूकपणे अजेंड्यावर ठेवलेलं आहे. शुक्रवारी संसदेच्या आवारात खासदार पप्पू यादव पुजारी बनून आले होते. ही कल्पना यादव यांचीच होती पण, सपच्या सदस्यांनी ज्या पद्धतीने त्या नाटुकल्यामध्ये आपापली भूमिका केली ते पाहून येत्या आठवड्यातील नवी कल्पना काय असेल याची उत्सुकता आहे.
