राजवाडे यांच्या अभिलेखसंशोधनाचा आढावा घेताना ज्या शिलालेखाची आवर्जून सविस्तर दखल घेतलीच पाहिजे असा अभिलेख म्हणजे पाटण येथील शक ११२८मधील (इसवी सन १२०६ मधला) मराठी शिलालेख होय. खरे म्हणजे महाराष्ट्रातील एक विख्यात प्राच्यविद्यापंडित डॉ. भाऊ दाजी लाड ह्यांनी तो शिलालेख इ.स. १८६४ मध्येच प्रकाशात आणला होता, तथापि त्या शिलालेखातील मराठी मजकूर नीट वाचता न आल्यामुळे बर्‍याच चुका झाल्या आहेत, हे अभ्यासकांच्या लक्षात आले होते. ‘एपिग्राफिया इंडिका’च्या पहिल्या खंडामध्ये त्याची दोन छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. त्यावरून दुसरे जर्मन विद्वान डॉ. लोरेन्झ फ्रान्झ किलहॉर्न (Dr. Lorenz Franz Kielhorn) यांनी काही दुरुस्त्या करून तो पुन्हा छापला होता. तरीदेखील त्या शिलालेखाचे समाधानकारक वाचन झालेले नाही, असे वाटल्यावरून राजवाड्यांनी ती जबाबदारी स्वयंप्रेरणेने स्वीकारली आणि १९०६ साली धुळ्याच्या ‘प्रभात’मधून आपला प्रदीर्घ लेख त्यांनी प्रसिद्ध केला.

शिलालेखाची पार्श्वभूमी व प्राथमिक माहिती देत त्यांनी लिहिले, ‘खानदेशांतल्या चाळीसगांव तालुक्यांत डोंगरखपाटींत पाटण नांवाचे एक उद्ध्वस्त शहर आहे. शालिवाहनाच्या अकराव्या व बाराव्या शतकांत निकुंभनामक राजांची ती राजधानी होती. शहराची लांबी दोन मैल व रुंदी दीड मैल असावी. शहरालगत एक प्रचंड डोंगरी किल्ला असून ते तीन बाजूंनी डोंगरांनी वेढलेले होते. शहर डोंगराच्या खपाटींत व माचीवर वसले असल्याकारणाने, त्याच्यामधून अनेक ओढे वाहत होते. पैकी एक ओढा सर्वांत मोठा असून, त्याच्या कांठी प्रसिद्ध महाराष्ट्रीय ज्योतिषी जो भास्कराचार्य त्याचा नातू जो चांगदेव त्याने आपल्या आजाचे ग्रंथ पढण्याकरितां एक मठ शके ११२८च्या पूर्वी केव्हातरी बांधला असावा. ११२८मध्ये पाटणास हेमाडिदेव नावाचा निकुंभ राजा राज्य करीत होता. त्याने त्या मठाच्या योगक्षेमाकरितां जे उत्पन्न करून दिले, त्याचा निर्देश प्रस्तुत शिलालेखांत केला आहे. शिलालेख सरासरी अडीच फूट रुंद व दीड फूट उंच आहे. पुढे आणखी काही लिहावयाचे राहिले नसावे, असे मजकुराच्या पूर्णतेवरून वाटते…शिलालेखाच्या २६ ओळींपैकी सबंध २१ ओळी व २२व्या ओळीतली पहिली पाच अक्षरे इतका मजकूर संस्कृतमध्ये आहे. पुढे २६व्या ओळीच्या शेवटपर्यंतचा मजकूर मराठीत आहे. त्या मराठी मजकुराशीच सध्या आपल्याला कर्तव्य आहे…’

आपला मर्यादित हेतू स्पष्ट करताना राजवाड्यांनी त्यामागचे कारण सांगितले, ते महत्त्वाचे होते. जेमतेम काही ओळींच्या मराठी मजकुराचा अर्थ व अन्वयार्थ लावायला आपण का प्रवृत्त झालो, ते स्पष्ट व्हावे म्हणून त्यांनी लिहिले, ‘डॉ. भाऊ दाजीला हा मराठी भाग नीट वाचता आला नाही. मजकूर मराठी- जुना मराठी- आहे, हे त्याला कळले होते; परंतु अक्षरे नीट न लागल्यामुळे व ज्ञानेश्वरकालीन मराठी भाषेशी परिचय जसा असावा तसा नसल्यामुळे, त्याला अर्थ कळला नाही व शब्द नीट तोडता आले नाहीत. कीलहार्नने भाऊ दाजीपेक्षा मजकूर बराच नीट वाचला, परंतु जुन्या मराठीशी परिचय नसल्यामुळे शब्द तोडण्यात त्याच्याकडून काही चुका झाल्या आहेत, शिवाय काही अक्षरेहि त्याला नीट लागली नाहीत. भाषा बिलकूल येत नसता कोणताहि शिलालेख वाचण्यांत पुराण्यांत पुराणाक्षरवाचनपटुत्वाची खरोखरच परीक्षा होण्याचा प्रसंग येतो. भाऊ दाजी व कीलहार्न ह्या दोघांनी शिलालेखाचा हा मराठी भाग कसा वाचला, ते या दोघांनी केलेले उतारे खाली देऊन दाखवितो व मी प्रत्यक्ष शिळेवरून घेतलेला उतारा तुलनेकरिता शेवटी देतो…’

नंतर भाऊ दाजींनी वाचलेल्या मजकुराचा सलग एका परिच्छेदाचा उतारा तसेच किलहॉर्नचा सहा ओळींगणिक परिच्छेद पाडलेला अधिक व्यवस्थित उतारा राजवाड्यांनी दिला आणि पाठोपाठ फेब्रुवारी १९०६त स्वत: केलेला उताराही दिला… तो अधिक नीटनेटका असल्याचे सहज स्पष्ट होत होते.