‘टेट्राक्लोरोडायबेन्झो- पी- डायॉक्सिन’ (टीसीडीडी) हे कुठल्याशा रासायनिक घटकाचे नाव असावे, एवढेच अनेकांना अंदाजाने कळले असेल. हाच अतिघातक रासायनिक पदार्थ व्हिएतनाम-युद्धात अमेरिकेने ‘एजंट ऑरेंज’मध्ये वापरला. एजंट ऑरेंजचा वापर इतका अमानुष होता की, त्यामुळे केवळ जिवंत असलेल्यांचेच नव्हे तर पुढल्या काळात जन्माला येणाऱ्या जिवांचेसुद्धा नुकसान झाले. चिवटपणे लढणाऱ्या व्हिएतनामींची पुढली पिढी नासवण्याचा प्रयत्न अमेरिकेने केला. यातून आपल्या देशाला सावरले पाहिजे, अशी खूणगाठ बांधूनच ‘एजंट ऑरेंज’चा परिणाम झालेल्या अर्भकांना धडपणे जगता यावे, यासाठी औषधोपचार शोधण्याचे काम न्गुएन थी न्गोक फुआंग यांच्यासह अनेक डॉक्टर करू लागले…. पण न्गुएन थी न्गोक फुआंग यांची झुंज सातत्यपूर्ण आणि यशस्वीही ठरली. या व्हिएतनामी डॉक्टर फुआंग यांचा समावेश यंदा ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कारा’च्या मानकऱ्यांत झाला आहे.
मानपत्र, मानचिन्ह आणि ५० हजार डॉलर अशा स्वरूपाचे मॅगसेसे पुरस्कार मनिला (फिलिपाइन्स) येथून जाहीर होतात, त्यांत दरवर्षी सार्वजनिक आरोग्य व त्या क्षेत्रातील संस्था-उभारणीचे काम करणाऱ्यांचाही समावेश असतो. या प्रकारातील पुरस्कार गेल्या वर्षी गुवाहाटीचे डॉ. रवी कण्णन यांना (व्यक्तिवेध : ४ सप्टेंबर २०२३) जाहीर झाला होता. यंदाच्या मानकरी डॉ. फुआंग या १९४४ मध्ये जन्मल्या; म्हणजे कळत्या वयात – वयाच्या दहाव्या ते एकतिसाव्या वर्षापर्यंत त्यांनी स्वदेशात पाहिले ते युद्ध आणि युद्धच. तेही मायदेशातून कुठेही बाहेर न जाता. सायगाव (आता हो चि मिन्ह सिटी) येथील वैद्याकीय महाविद्यालयातून त्यांनी वैद्याकीय पदवी शिक्षण घेतले, तिथल्याच विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणही घेतले आणि १९७२ पासून याच विद्यापीठात अध्यापनकार्यही सुरू केले. मधल्या काळात प्रेम, विवाह आदी टप्पेही आले… पण १९७६ नंतरच्या काळात मात्र ‘एजंट ऑरेंज’शी झुंज देणे हेच त्यांनी आपले जीवितकार्य मानले. इतके की, त्यासाठी संसाराची किंमतही त्यांनी मोजली. कर्तबगार स्त्रीपुढे नेहमीच आव्हाने अधिक असतात, पण इथे अधिकच मोठी कसोटी होती. नवऱ्याला फ्रान्समध्ये चांगल्या पगाराची नोकरी चालून आली होती. ‘मी इथेच, माझे काम करत राहाणार’ असे डॉ. फुआंग यांनी स्पष्ट सांगितले आणि विषय संपला.
हेही वाचा : कलाकारण : दिसण्यावरची दहशत
हे काम करताना त्यांना वैद्याकीय विद्यापीठातच शिकवत असल्याचा उपयोगही झाला. पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांना, विशेषत: दक्षिण व्हिएतनाममध्ये – जिथे ‘एजंट ऑरेंज’चे हल्ले अधिक प्रमाणात झाले होते तिथल्या कानाकोपऱ्यांत पाठवून डॉ. फुआंग वैद्याकीय विदा तयार करू शकल्या. उपचारांची गरज कोणाला आहे, हे नेमके शोधू शकल्या आणि काय करावे लागेल हे सरकारला पटवू शकल्या. व्हिएतनामी कायदेमंडळाच्या सदस्यही झाल्या. पण त्यांचे लक्ष वैद्याकीय कामावर राहिले. चारच, पण महत्त्वाचे शोधनिबंध त्यांच्या नावावर आहेत. प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोगविज्ञान, तसेच अंत:स्रावशास्त्र यांचा अभ्यास त्यांनी ‘एजंट ऑरेंज आणि प्रजननावरील परिणाम’ याच्या अभ्यासासाठी मूलत: केला. सुरुवातीला जर्मनी आदी देशांतून, तर पुढे अमेरिकेतूनसुद्धा त्यांनी हो चि मिन्ह वैद्याकीय विद्यापीठाशी वैज्ञानिक आदानप्रदान सुरू केले. आज वयाच्या सत्तरीला पोहोचलेल्या डॉ. फुआंग याच विद्यापीठाच्या मानद अध्यक्ष आहेत. त्या परदेशी जातात, तेव्हा एजंट ऑरेंजचे दुष्परिणाम या विषयावर डोळे उघडणारी व्याख्याने देतात. ही व्याख्याने त्यांनी अमेरिकेतही दिलेली आहेत.