कलेच्या विकासासाठी जेवढा कलाकार महत्त्वाचा, तेवढाच उत्सुक रसिकही. पण या दोन घटकांना एकमेकांशी जोडण्यासाठी एक दुवा लागतो. अशा दुव्याचे योगदानही तेवढेच महत्त्वाचे. पीटर नेगींच्या निधनाने एक दुवा नुकताच निखळला.

अमेरिकेतील कनेक्टिकटमध्ये जन्मलेल्या नेगींनी ‘पार्सन्स स्कूल ऑफ डिझाइन’मध्ये कलाशिक्षण घेतले. १९८० च्या दशकात ॲलन बेल्चर यांच्यासह त्यांनी न्यूयॉर्कच्या ईस्ट व्हिलेजमध्ये ‘गॅलरी नेचर मॉर्टे’ची स्थापना केली. १९९२ मध्ये भारतात येऊन याच गॅलरीतर्फे अधूनमधून प्रदर्शने मांडणारे नेगी १९९७ पर्यंत नवी दिल्लीत चांगलेच रुळले.

‘लोकायत’ संस्थेच्या घुमटाकार सभागृहवजा इमारतीत नेचर मॉर्टेची प्रदर्शने भरत. मृणालिनी मुखर्जी, रणबीर कलेका यांसारख्या अनेक कलावंतांना मोठ्या आकाराच्या आणि अनवट प्रकारच्या कलाकृती करण्यास प्रोत्साहन मिळाले ते इथून! म्हणजे असे की, मुखर्जी यांनी ११ ते १२ फूट उंचीची सुतळीशिल्पे केली ती दुरून/ जवळून पाहण्यास वाव लोकायतच्या घुमटाखाली मिळाला, मुखर्जींनीच सिरॅमिकचे तुकडे जोडून गूढतेचा, भयाणपणाचा अनुभव देणारी शिल्पे केली तेव्हाही नेगींनी – ही कोण विकत घेणार असा हिशेब न मांडता, उलट ही शिल्पे अधिक भयोत्कट दिसतील अशी प्रकाशयोजना केली! रणबीर कलेका यांनी कॅनव्हासवरच व्हीडिओ प्रक्षेपण करण्याचा चक्रावणारा प्रयोग केला, त्यास नेगींनी साथ दिली.

व्हीडिओ मांडणशिल्पे (इन्स्टॉलेशन) तर या गॅलरीत अनेक झाली. दुसरीकडे, आपल्या स्वत:च्या कलाकृतींतून नेगी यांनी कलेच्या कॉर्पोरेटीकरणावर टीका केली.

ते स्वत:ला कलावंत न म्हणवता संप्रेषक (कम्युनिकेटर) अशी स्वत:ची ओळख करून देत. त्यांच्या १९८० च्या दशकातल्या कलाकृतींमध्ये कॉर्पोरेट लोगो आणि कला इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमधील चित्रांचा वापर होता, तर १९९० च्या दशकाअखेरीस मुंबईच्या गॅलरी केमोल्डमधील प्रदर्शनात भारतातील खुर्च्यांच्या प्रतिमांतून सांस्कृतिक आत्मीकरणापासून ते एकसाची कॉर्पोरेटीकरणापर्यंतच्या मुद्द्यांचा सूचक निर्देश होता. त्यांनी या प्रतिमांची पृष्ठभूमी म्हणून सिंधी (अर्थात उर्दू लिपीतल्या, पण हिंदूंसाठीच्या) पंचांगाच्या छापील पानांचा वापर केला होता.

‘नेचर मॉर्टे’ गॅलरीने लवकरच दिल्लीतील नीती बाग भागात स्थलांतर केले. इथूनच सुबोध गुप्ता, भारती खेर, एल. एन. तल्लूर यांसारखे कलाकार पुढे आले, दिल्लीतील अनिता दुबे, बेंगळूरुच्या एन. पुष्पमाला, मुंबईचे जितीश व रीना कलाट तसेच मनीष नाई आता या गॅलरीकडे आहेत. जागतिक लिलावगृहांनी भारतीय कलाकारांची दखल घेण्यापूर्वीच इथल्या प्रतिभेला प्रोत्साहन देणार्‍यांपैकी नेगी हे महत्त्वाचे.

दक्षिण आशियातील तरुणांच्या दृश्यकला प्रयोगांना प्रोत्साहन देणार्‍या ‘खोज’ या संस्थेचे ते पाठीराखे होते. गॅलरी-चालक म्हणून नेगी यांनी चौकटीबाहेरच्या कलाकारांची आणि प्रेक्षकांची गाठ घालून दिली. स्वत: नेगी अनेक चर्चासत्रांत सहभागी होऊन सडेतोड भूमिका मांडत. पण मग जगन्नाथ पांडासारख्या- अलंकरणाकडे झुकलेल्या कलावंताला नेगींचे प्रोत्साहन कसे, असा प्रश्न अनेकांना पडे; त्याचे उत्तर दूरान्वयाने मिळाले.

ते असे की, पांडा यांच्या कलाकृती संग्राहकप्रिय झाल्यानंतरच्या काळातच ओडिशातून दिल्लीत स्थलांतर करणार्‍या कलावंतांना वाव मिळू लागला! अलीकडे मुंबईतही ‘नेचर मॉर्टे’ची शाखा निघाली, पण जणू निवृत्त होऊन, या गॅलरीची सूत्रे इतरांहाती सोपवून नेगी पुन्हा नव्या कलावंतांकडे लक्ष देऊ लागले होते! त्यांचे योगदान कलाविश्वाच्या कायम स्मरणात राहील.