इंडियन एज्युकेशन सोसायटी, दादर, मुंबई संस्थेने १९९१ मध्ये ‘प्रगत संशोधन केंद्रा’ची स्थापना केली. यामार्फत त्यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री यांची ‘शंकराचार्यांचे तत्त्वज्ञान व कार्य’ विषय केंद्रित करून तीन सलग व्याख्याने योजली होती. त्यांचे विषय होते- १) शंकराचार्य : चरित्र साधन व स्तोत्रे, २) अद्वैतवादी शंकराचार्य, ३) मायावाद बौद्धमत आणि केवलाद्वैतवाद. ही व्याख्याने पुढे १९९७ मध्ये तर्कतीर्थांची कन्या प्रा. डॉ. अरुंधती खंडकर यांनी संपादित करून श्रीविद्या प्रकाशन, पुणेमार्फत ‘आद्या शंकराचार्य : जीवन आणि विचार’ शीर्षक ग्रंथाद्वारे प्रकाशात आणली. मूळ ध्वनिमुद्रित भाषणांचे हे श्रुतलेखन होय. या तिन्ही व्याख्यानांचे अध्यक्ष प्रा. मे. पुं. रेगे होते. ते अध्यक्ष असले तरी आधी प्रास्ताविकपर उपन्यास करीत, मग तर्कतीर्थ बोलत. ही व्याख्याने त्यावेळी किंग जॉर्ज हायस्कूल, दादरमध्ये आयोजिली होती. व्याख्यानानंतर श्रोते प्रश्न विचारत व तर्कतीर्थ उत्तरे देत. मग व्याख्यान संपत असे.
पहिल्या ‘शंकराचार्य : चरित्र साधने आणि स्तोत्रे’ शीर्षक व्याख्यानात तर्कतीर्थांनी आद्या शंकराचार्यांवर लिहिल्या गेलेल्या विविध चरित्र ग्रंथ आणि स्तोत्रांची माहिती दिली आहे. त्यानुसार आद्या शंकराचार्यांवर इ.स. ६५० ते ७२० या ७० वर्षांच्या कालखंडात ‘शंकरविजय’, ‘शंकराभ्युदय’सारखी मूळ चरित्रे लिहिली गेली. आजवर (१९९१) त्यांची संस्कृत भाषेत २२ चरित्रे उपलब्ध आहेत. व्यासाचल, तिरुमल दीक्षित, राजचुडामणी दीक्षित, माधवाचार्य, आनंदगिरी प्रभृती पंडितांनी लिहिलेली ही चरित्रे ‘विजय’, ‘दिग्विजय’, ‘अभ्युदय’सदृश शीर्षकांची आहेत. त्या शीर्षकांतून आद्या शंकराचार्यांनी घडवून आणलेला हिंदू धर्माचा विजय, उदय अधोरेखित होतो. आद्या शंकराचार्य हे हिंदू धर्मातील अद्वैतवादी तत्त्वज्ञानाचे प्रणेते म्हणून सर्वपरिचित आहेत. बौद्ध धर्म प्रसार हा जसा संचार, प्रवासातून विस्तारला, तसेच कार्य हिंदू धर्मासंदर्भात आद्या शंकराचार्यांनी केलेले दिसते. मी केलेल्या काश्मीर ते कन्याकुमारी या प्रवासात शंकराचार्य मठ, पीठे सर्वत्र पाहिली आहेत. अनेक परकीय आक्रमणानंतरही हिंदू धर्म टिकून राहिला याचे श्रेय शंकराचार्य स्थापित धर्मव्यवस्थेस दिले जाते व दिले गेलेही पाहिजे.
‘अद्वैतवादी शंकराचार्य’ शीर्षक दुसऱ्या व्याख्यानात तर्कतीर्थांनी अद्वैतवादी तत्त्वज्ञानाचा ऊहापोह केला आहे. महात्मा गौतम बुद्धांनी चार आर्य सत्ये विशद केली होती. दु:ख, दु:ख कारणे, त्यांच्या निराकरणाचे उपाय आणि अंतिमत: जीवन नैतिक गुणांच्या आधारे परमशांत करणे- असे त्या आर्य सत्यांचे स्वरूप होते. जगातील अधिकांश धर्मदर्शने एका अर्थाने दु:खदर्शनेच आहेत. यासंदर्भात जिज्ञासूंनी तर्कतीर्थलिखित ‘आनंदमीमांसा’ (१९२८) प्रबंध वाचला पाहिजे. आद्या शंकराचार्यांनी आपल्या तत्त्वज्ञानात आनंद हेच विश्वकारण विशद केले आहे. ईश्वर स्वरूपाबाबत त्यांनी ते चैतन्यस्वरूप वा आनंदमय असल्याचे स्पष्ट केले आहे.
तिसऱ्या व्याख्यानात एका अर्थाने बौद्धमत आणि अद्वैतवाद यांची चर्चा असून, मायावाद आणि केवलाद्वैतवाद यांचे स्पष्टीकरण आहे. बुद्धाने वर्णिलेला शून्यवाद हा जीवनविन्मुख आहे, तर शंकराचार्यांचा अद्वैतवाद जीवनसन्मुख आहे. बुद्धाचा सर्वास्तिवाद, शून्यवाद, विज्ञानवाद परस्परविरोधी विचार असल्याचे शंकरार्यांनी स्पष्ट केले आहे. जैनमत आणि बौद्धमत हे बद्ध, मुक्त व नित्य अशा वर्गांमध्ये जीवांचे चित्रण करतात. ते स्वीकारार्ह नसल्याचे आद्या शंकराचार्यांनी म्हटले आहे. केवलाद्वैतवादाची सारी भिस्त मायेवर असल्याचेही त्यांनी दाखवून दिले आहे. आद्या शंकराचार्यांनी मोठ्या कष्टाने मिळविलेली धर्मप्रतिष्ठा त्यांच्यानंतर आलेल्या शंकराचार्यांना सांभाळता न आल्याची खंतही तर्कतीर्थांनी आपल्या या व्याख्यानातून मांडली आहे.
या ग्रंथाची समीक्षा डॉ. मु. श्री. कानडे यांनी ‘रविवार सकाळ’च्या २७ जून, १९९९च्या अंकात केली आहे. त्यात डॉ. कानडे यांनी म्हटले आहे की, ‘‘शंकराचार्यांचे जीवन, त्यांची प्रचंड साहित्य संपदा, त्यांचा बौद्ध व जैनांशी झालेला वैचारिक संघर्ष आणि त्यांच्या तात्त्विक विचारांचा उत्तरकालीन विचारवंतांवर पडलेला प्रभाव या तीन प्रमुख घटकांचा या पुस्तकात परामर्श घेतला आहे. या तीनही विषयांची सांगोपांग चर्चा करण्यासाठी तीन स्वतंत्र ग्रंथांची आवश्यकता होती. हे पुस्तक केवळ साधारण शंभर पानांचे असल्याने तर्कतीर्थांचे सर्व विचार अगदी सूत्ररूपाने येणे अपरिहार्य होते.’’
– डॉ. सुनीलकुमार लवटे
drsklawate@gmail.com