पॅरिसमधल्या फ्रेंच अॅथलेटिक स्पोर्ट्स संस्थेच्या सभेत, नोव्हेंबर १८९२मध्ये भाषणाच्या सुरुवातीलाच पिअर द कुबर्ता जे काही बोलले ते ऐकून उपस्थितांस काय प्रतिक्रिया द्यायची हे क्षणभर कळलेच नाही. थोडी चुळबुळ, थोडी कुजबुज झाली. पण पिअरना म्हणायचे काय ते याचा बोध होत नव्हता. पिअर म्हणाले : ‘‘आता अॅथलेटिक्सबद्दल बोलायचं झालं, तर पुढे काय होईल ते ठाऊक नाही. पण त्याच्या दोन नवीन पैलूंविषयी मला तुमच्यासमोर मत मांडावंच लागेल. यात लोकशाही मूल्य आहे आणि आंतरराष्ट्रीयत्व सामावलेलं आहे. पहिल्या पैलूमुळे याचं भवितव्य सुनिश्चित होईल. सध्याच्या काळात (१८९२!) ज्यात लोकशाही मूल्य नाही ते टिकणारच नाही. दुसऱ्या पैलूविषयी विचाराल तर अनेक कवाडं खुली होतील असा मला विश्वास वाटतो. आपल्याकडील रोव्हर, धावपटू, तलवारबाज बाहेर धाडता येतील. हा भविष्यातला मुक्त व्यापार आहे. युरोपमध्ये शांतता नांदण्याच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं आहे.’’
उपस्थितांना कळो ना कळो, पण पिअर द कुबर्तांना ते काय बोलत होते याची पूर्ण कल्पना होती. आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धांच्या आयोजनाविषयी त्यांच्या डोक्यात इतकी वर्षे जे काही संचित जमले होते त्याची सार्वजनिक वाच्यता त्यांच्याकडून पहिल्यांदाच त्या सभेच्या निमित्ताने झाली. ते धावपटू, तलवारबाज इतर देशांमध्ये पाठवण्याविषयी बोलले. तो काळ त्यांच्या दृष्टीने युद्धोत्तर शांततेचा – १८७०मधील फ्रँको-प्रशियन युद्धाची समाप्ती होऊन दोन दशकनंतरचा- होता. इतर देशांमध्ये सैनिक धाडून रक्तपात घडवण्यापेक्षा खेळाडू पाठवलेले काय वाईट, हे त्यांना अभिप्रेत असावे. हाच धागा पकडून त्या भाषणात ते पुढे सांगतात :
‘‘म्हणूनच मला दुसऱ्या पैलूविषयी मी काय ठरवलं ते सांगायचंय. या माझ्या मोहिमेत तुमच्याकडून सहकार्य मिळेल, जसं ते आतापर्यंत नेहमीच मिळत आलं. परिस्थिती अनुकूल असेल तर मला माझं उदात्त, भव्य स्वप्न साकारण्याची संधी मिळेल. ते स्वप्न आहे… ऑलिम्पिक खेळांच्या पुनर्स्थापनेचं!’’
पिअर उत्स्फूर्तपणे काहीही तयारी न करता ऑलिम्पिकविषयी – म्हणजे आधुनिक ऑलिम्पिकच्या पुनरुज्जीवनाविषयी – बोलून गेले असे त्या वेळी तिथल्या बहुतांना वाटले होते. पण ऑलिम्पिकचा हा किडा त्यांच्या मेंदूत गेली काही वर्षे वळवळत होता. यापूर्वी किमान दोन वेळा – १८८८ आणि जून १८९२ मध्ये – त्यांनी अमेरिकी विद्यापीठांशी सामूहिक क्रीडास्पर्धांबद्दल केलेल्या पत्रव्यवहारात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक खेळांचा उल्लेख केला होता. अशा सामूहिक क्रीडास्पर्धांचा सर्वोत्तम सुंदर आविष्कार म्हणजे ऑलिम्पिक. प्राचीन ग्रीसमध्ये ख्रिास्तपूर्व काळात कित्येक वर्षे ऑलिम्पिया गावात नागरिक मोठ्या संख्येने एकत्र जमायचे ते निव्वळ खेळण्यासाठी. एरवी असे एकत्र येणे लग्नसमारंभ, अंत्यविधी, किंवा युद्धास निघण्यापूर्वी सैनिकी जमवाजमवीच्या निमित्तानेच व्हायचे. पण खेळासाठी कुणी एकत्र यायचे ही कल्पनाच अभूतपूर्व होती. प्राचीन ग्रीसमध्ये हे कित्येक वर्षे सुरू होते, हेही सांस्कृतिक प्रगतीचे लक्षण मानता येईल. किमान पिअर द कुबर्ता यांना तसे वाटायचे. फरक इतकाच की ग्रीसमधील त्या स्पर्धांचे स्वरूप पूर्णपणे स्थानिक असे होते. आसपासच्या गावांतून, क्वचित प्रसंगी प्रांतांमधून मंडळी जमायची. सगळे पुरुषच. बहुतेक सगळे खेळताना नागवेच. पिअरना या संकल्पनेला आधुनिक आणि आंतरराष्ट्रीय स्वरूप द्यायचे होते.
उमरावपुत्र ते शिक्षणतज्ज्ञ
शार्ल पिअर द फ्रेडी बारॉन द कुबर्ता यांचा जन्म १ जानेवारी १८६३ रोजी एका सधन फ्रेंच उमराव कुटुंबात झाला. ते लहानाचे मोठे झाले तो काळ फ्रान्समध्ये मोठ्या उलथापालथीचा होता. फ्रँको प्रशियन युद्ध (१८७०), त्या युद्धात एकत्रित जर्मनीकडून फ्रान्सचा झालेला मानहानीकारक पराभव, फ्रेंच क्रांतिकारकांकडून देशाचा ताबा, मग लोकशाहीवादी सरकारची स्थापना… इतर कोणत्याही देशात युद्धातील पराभवाबद्दल सरकारविषयी नाराजी असते, तशीच परिस्थिती त्या वेळी फ्रान्समध्ये होती. नेपोलियन बोनापार्टचे सोनेरी दिवस अनुभवलेल्या त्या देशामध्ये पराभवाची विविधांगी मीमांसा सुरू होती. बालवय, पौगंडावस्था, प्रौढावस्थेच्या संक्रमणातून जात असताना पिअर हे सारे आकळून घेत होते. काही गोष्टी त्यांच्या मनात स्पष्ट होऊ लागल्या होत्या. उदा.- युद्धाने समस्या सुटत नाहीत… जर्मन जिंकले कारण ते केवळ अधिक शस्त्रसुसज्ज होते म्हणून नव्हे; तर शारीरिक तंदुरुस्तीच्या आघाडीवर फ्रेंचांपेक्षा कितीतरी सरस होते… शारीरिक तंदुरुस्ती निव्वळ मिलिटरी अकादम्यांमध्ये वाढवता येणार नाही. तिला जीवनशैलीचा भाग बनवायचे तर ते खेळांमधून साध्य करण्यासारखे आहे… या शेवटच्या मुद्द्यावर पिअर द कुबर्ता यांनी जीवन समर्पित केले.
उमरावाच्या घरात जन्माला येऊनही स्वत:ची ओळख निर्माण करण्याची सवय त्यांना वडिलांकडून मिळाली. त्यांचे वडील मुळात फ्रान्सच्या राजसत्तेचे समर्थक होते, पण एक चित्रकार म्हणूनही त्यांची स्वतंत्र ओळख होती. पिअर जेझुइट बोर्डिंग स्कूलमध्ये शिकले. हुशार होते. त्या वेळच्या प्रथेप्रमाणे सधन कुटुंबांतील हुशार मुले प्रशासकीय किंवा लष्करी करिअरकडे वळायची. राजदरबार वा सरकारदरबारी वरिष्ठ, वजनदार पद मिळवण्याचा तो राजमार्ग असे. पिअर वेगळ्या वाटेला गेले. ही वाट शिक्षण क्षेत्राची. इतिहास आणि शिक्षण या विषयांमध्ये विशेष रुची आणि गती. त्यांच्या आवडीच्या विषयांच्या अभ्यासानिमित्ताने रोम आणि ग्रीसविषयी वाचनात भरपूर आले होते. त्यातही ऑलिम्पिक खेळांची संकल्पना त्यांना भावली. ही शिदोरी घेऊन जेव्हा ते व्यावसायिक आयुष्यात स्थिरावले त्या वेळी पारंपरिक, पोथीबद्ध शिक्षण संकल्पनांना वेगळे आयाम मिळाले पाहिजेत, हे त्यांनी ठरवून टाकले.
खेळ आणि व्यक्तिमत्त्व विकास
शिक्षणामध्ये शारीरिक शिक्षण म्हणजे खेळांचा वाटा असला पाहिजे हे त्यांना वाटले, त्यामागे प्रेरणा होती इंग्रजांची! वयाच्या विसाव्या वर्षी पिअर इंग्लंडमध्ये गेले नि त्यांनी रग्बी गावातील शिक्षणसंस्थेत (रग्बी स्कूल) विख्यात आधुनिक शिक्षणतज्ज्ञ थॉमस अरनॉल्ड यांनी सुरू केलेल्या शारीरिक शिक्षणाधारित अभ्यासक्रमाचा जवळून अनुभव घेतला. पिअर यांनी रग्बी स्कूलला भेट दिली तेव्हा अरनॉल्ड हयात नव्हते. पण रग्बी स्कूलविषयी पिअर यांचे आकर्षण त्यांनी पूर्वी वाचलेल्या ‘टॉम ब्राउन्स स्कूल डेज’ या कादंबरीतूनही निर्माण झाले होते. त्या कादंबरीत रग्बी स्कूलचा संदर्भ होता. शिक्षणामध्ये खेळाची भूमिका पिअर यांना महत्त्वाची वाटली. कारण नियमाधारित व्यवस्था आणि नैतिकता ही मूल्ये खेळाच्या मैदानावर अधिक सहजपणे घोटवून घेता येतात. ती आत्मसात केलेले विद्यार्थी भविष्यातही या मूल्यांशी एकरूप नि एकनिष्ठ राहतात. हे गृहीतक पडताळून पाहण्याचा प्रयत्न पिअर द कुबर्ता यांनी केला का, त्यासाठी कोणते प्रयोग वा अभ्यासाचा आधार घेतला याचा तपशील उपलब्ध नाही.
ते काही असले, तरी इंग्लंडमध्ये अशा प्रकारच्या प्रयोगांनी ते प्रभावित झाले हे नक्की. फ्रान्समध्येही खेळाचा समावेश शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये केला जावा असा आग्रह ते त्यानंतर धरू लागले. ब्रिटिश साम्राज्य विस्ताराचे कारण कवायती शिस्त आणि खेळातून कमावलेली शारीरिक तंदुरुस्ती हेही असले पाहिजे असे त्यांना वाटे.
ऑलिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय सौहार्द
अर्थात शिक्षण आणि खेळ यांची सांगड घातली जावी याचा ध्यास हा पिअर द कुबर्ता यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग झाला. त्याहीपुढे जाऊन त्यांना खेळ, स्पर्धा आणि निकोप स्पर्धात्मकता या संकल्पना व्यापक म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायच्या होत्या. प्राचीन ऑलिम्पिकविषयी त्यांनी वाचलेले होतेच. इंग्लिश शाळांप्रमाणेच काही अमेरिकी विद्यापीठांमध्येही खेळांना दिले जाणारे महत्त्व त्यांच्या कानावर आले. त्यांनी अमेरिकेतही अशा विद्यापीठांना भेटी दिल्या आणि ते आणखी प्रभावित झाले. ऑलिम्पिकच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवल्या जाव्यात, त्यासाठी खेळ हा रोजच्या जगण्यातला भाग असल्यास शारीरिक तंदुरुस्ती आणि सहभाग याविषयी जाण वाढीस लागेल हेही कळू लागले होते. आंतरराष्ट्रीय सहभाग म्हणजे आंतरसांस्कृतिक देवाण-घेवाण, भिन्न जीवनशैलींचे भान. जागतिक शाश्वत सौहार्दासाठी ते महत्त्वाचे होते. पिअर द कुबर्तांचा निर्धार पक्का होत गेला.
अथेन्स ऑलिम्पिक १८९६ दृष्टिपथात येऊ लागले!
