आसपासचेच किंवा देशातीलच संघ जमवायचे आणि त्या स्पर्धेला नाव मात्र ‘ऑलिम्पिक’ द्यायचे, हा प्रकार १८५० ते १८७५ या काळात वारंवार घडला तो कसा? आणि ‘ऑलिम्पिक’ची आंतरराष्ट्रीय संकल्पना जोपासून ती प्रत्यक्षातही आणणारे पिअर द कुबर्ता यांनी या काळात केले काय?
आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धांचे प्रणेते मानले गेलेले पिअर द कुबर्ता फ्रान्समध्ये ही संकल्पना रुजवण्यात तितकेसे यशस्वी ठरत नव्हते. तरी परिस्थिती अगदीच निराशादायी नव्हती. ग्रीक आणि रोमन काळात ज्या पद्धतीने नगर राष्ट्रांमध्ये (सिटी स्टेट्स) प्रदीर्घ काळ लढाया व्हायच्या, परंतु चार वर्षांतून एकदा ऑलिम्पिया गावात क्रीडास्पर्धांसाठी मंडळी एकत्र जमून औटघटका वैर विसरून रमायची, ते मॉडेल म्हणून कुबर्तांना भावले होते. पण हीच संकल्पना आंतरराष्ट्रीय स्तरावर राबवायची तर, तिथे एकाच्या इच्छाशक्तीने काहीच साधण्यासारखे नव्हते. पिअर हे जाणून होते. यासंदर्भात फ्रान्सबाहेरील दोन ‘ऑलिम्पिक’ स्पर्धांनी त्यांचे लक्ष वेधून घेतले. एक होती इंग्लंडमधली आणि दुसरी – आधुनिक ऑलिम्पिकच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची – ग्रीसमधली.
झपास ऑलिम्पिक
फ्रान्समध्ये एखाद्याला प्राचीन ग्रीक ऑलिम्पिकची प्रेरणा मिळू शकते, तशी ती आधुनिक ग्रीसमध्येही अनेकांना मिळाली असेलच. यांतील एक नाव होते इव्हानजेलिस झपास. या धनाढ्य गृहस्थांनी ग्रीसमध्ये ‘ऑलिम्पिक’ स्पर्धा तीन वेळा भरवून दाखवल्या. त्यांचे स्वरूप अर्थातच स्थानिक होते. या स्पर्धांची चर्चा कुबर्ता यांच्या वाचनात, कानावर आलेलीच होती. सन १८५९, १८७० आणि १८७५ अशी तीन वर्षे या ‘ऑलिम्पिक’ स्पर्धा भरवल्या गेल्या. झपास यांतील नंतरच्या दोन स्पर्धा पाहण्यासाठी हयात नव्हते. तरी तिन्ही स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी पैसा आणि पुढाकार त्यांचाच होता. ऑटोमन साम्राज्यापासून ग्रीसने स्वातंत्र्य मिळावले आणि नंतरच्या ग्रीसमध्ये उठलेल्या सांस्कृतिक पुनरुज्जीवनाच्या लाटेमध्ये प्राचीन ऑलिम्पिकचा संदर्भ वारंवार दिला जाऊ लागला.
झपास यांनी ग्रीसच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. त्या वेळी ग्रीसमधील प्रसिद्ध कवी पॅनागियोतिस सुत्सॉस याने नवस्वतंत्र ग्रीस राष्ट्रामध्ये ऑलिम्पिक खेळांच्या पुनरुज्जीवनाची संकल्पना मुख्य प्रवाहात प्रथम मांडल्याचे सांगितले जाते. त्यावर, पुराणातली जुनी मढी उकरण्यापेक्षा ग्रीसने आधुनिक प्रकारे राष्ट्रउभारणीवर भर द्यावा अशी प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केली. ग्रीसच्या स्वातंत्र्यलढ्यात ऑटोमन-इजिप्त आघाडीच्या विरोधात ब्रिटन, रशिया आणि फ्रान्सने निर्णायक मदत केली होती. त्या देशांप्रमाणे औद्योगिक, लष्करी सामर्थ्य वाढवायचे की भूतकाळातच रमायचे असा प्रश्न उपस्थित करणारेही होतेच. खुद्द झपास यांना मात्र ऑलिम्पिकची संकल्पना फारच भावली. ग्रीक युद्धानंतर या झपास यांनी शेती आणि जमीन व्यवहारात नशीब काढले. बक्कळ संपत्ती जमवली. पण ऑलिम्पिकचे विचार डोक्यातून गेले नाहीत.
अथेन्समधील ऐतिहासिक पॅनाथेनॅयिक स्टेडियमच्या अवशेषांचे उत्खनन करून, त्यांची पुनर्बांधणी करून नवे स्टेडियम उभारायचे आणि तेथे ऑलिम्पिक स्पर्धा दर चार वर्षांनी भरवायच्या असा प्रस्ताव झपास यांनी ग्रीसचा तत्कालीन राजा ओटो यास पाठवला. तो लगेच मंजूर झाला नाही. ऑलिम्पिक विरोधकांनी राजावर खेळाप्रमाणेच कृषी आणि औद्योगिक प्रदर्शनेही त्याच ठिकाणी भरवावीत अशी गळ घातली. अखेर तडजोडीतून दोन्ही एकाच ठिकाणी भरवायचे ठरले नि ऑलिम्पिक स्पर्धेचा मार्ग मोकळा झाला. यासाठी लागणारा संपूर्ण निधी इव्हानजेलिस झपास आणि त्यांचे नातेवाईक कॉन्स्टंटिनोस यांनी पुरवला. नोव्हेंबर १८५९मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेस सुरुवात झाली. खेळाडू ग्रीसमधीलच होते. किंवा ऑटोमन साम्राज्यातील आसपासच्या प्रदेशातले ग्रीक वंशातले होते. त्यांना खेळाडू असे संबोधले गेले, तरी बहुतेक सगळेच हवशे-नवशे. कामगार, फुकटे रिकामटेकडे, पोलीस, भिकारी असे बरेच. धावणे, भालाफेक, थाळीफेक, कुस्ती, खांबावर चढाई, लांब उडी असे प्राचीन ऑलिम्पिकमधील प्रकारच सादर झाले.
सर्वसामान्य अथेन्सवासी मोठ्या संख्येने ही गंमत बघायला आले; पण त्यांना काही पाहता यावे अशी सोयच केली गेली नव्हते. राजा आणि त्याचे दरबारी, काही धनाढ्य व्यक्ती यांना मोक्याच्या जागा दिल्या गेल्या. प्रचंड थंडीमुळे खेळाडू आणि प्रेक्षकही कुडकुडत होते. तरीदेखील ही संकल्पना सरकारी पातळीवर स्वीकारली गेली. झपास यांचे आर्थिक पाठबळ हेही एक कारण होतेच. ते १८६५मध्ये निवर्तले. पण तोपर्यंत पॅनाथेनॅयिक स्टेडियमचे उत्खनन सुरू झाले होते. जर्मन पुरातत्त्वशास्त्रज्ञ अर्न्स्ट कर्टियस यांच्या पुढाकाराने हे काम यशस्वीरीत्या पार पडले. पुरातन स्टेडियमचा जणू जीर्णोद्धार झाला.
अखेर १८७०मध्ये दुसर्यांदा अथेन्समध्ये ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या, त्या वेळी रीतसर स्टेडियम होते आणि स्पर्धेचे आयोजनही अधिक नेटके झाले. उद्घाटनाला ३० हजार नागरिकांनी गर्दी केली. यामुळे ऑलिम्पिक संकल्पना आता सर्वसामान्यांमध्येही स्वीकारली जाऊ लागली. पुढे पॅनाथेनॅयिक स्टेडियममध्येच १८९६ मध्ये पहिल्या जगन्मान्य आधुनिक ऑलिम्पिकची सुरुवात झाली. संकल्पनेचा पाठपुरावा पिअर द कुबर्ता यांनी केला हे मान्यच. पण अथेन्समध्ये त्यासाठीचा पायाभूत ढाचा आणि मुख्य म्हणजे व्यापक स्वीकारार्हता मिळवून देण्याचे योगदान नि:संशय इव्हानजेलिस यांचेच!
वेनलॉक ऑलिम्पिक
झपास ऑलिम्पिकच्याही आधी इंग्लंडमध्ये त्या स्वरूपाची स्पर्धा स्थानिक पातळीवर भरवली जात असे. मच वेनलॉक या गावात भरवल्या जाणार्या त्या स्पर्धेचे प्रणेते होते डॉ. विल्यम पेनी ब्रूक्स. अतिशय बहुआयामी असे हे व्यक्तिमत्त्व. ते सर्जन होते, शिक्षणतज्ज्ञ होते, वनस्पतीशास्त्रज्ञ होते. पण खेळांच्या सामूहिक आविष्काराविषयी आणि त्याच्या फायद्यांविषयी त्यांच्या मनात पक्की गृहीतके होती. त्यांच्या गावात विशेषत: कामगारवर्गासाठी सामूहिक उपक्रम सुरू करण्यावर त्यांनी भर दिला. यात ॲथलेटिक्स आणि मैदानी सांघिक खेळांचा समावेश करण्यात आला होता. सांघिक खेळांमध्ये होते फुटबॉल आणि क्रिकेट! वेनलॉक ऑलिम्पिक गेम्स ऑक्टोबर १८५०मध्ये भरवले गेले. ही स्पर्धा दोन दिवसांची होती आणि ब्रूक्स ती पुढील अनेक वर्षे सातत्याने भरवत राहिले.
प्राचीन किंवा नंतरच्या आधुनिक ऑलिम्पिकप्रमाणे ती दर चार वर्षांनी वगैरे भरत नसे. ब्रूक्स यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी पहिल्या झपास ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम धावपटूसाठी (तत्कालीन) १० पौंडांची रक्कम बक्षिसादाखल पाठवून दिली होती. वेनलॉक ऑलिम्पिक गेम्स या बिरुदातून ‘ऑलिम्पिक’ हा ग्रीक संस्कृतीशी साधर्म्य दर्शवणारा शब्द वगळावा अशी सूचना ब्रूक्स यांना करण्यात आली. या खेळांचे निखळ ब्रिटिश स्वरूप कायम राहावे आणि नावही सुसंगत असावे असा एक विचार होता. ती सूचना ब्रूक्स यांनी मानली नाही. पिअर द कुबर्ता झपास यांना भेटले नाहीत. पण ते ब्रूक्स यांना आवर्जून भेटले. पिअर यांच्यासाठी खास ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन ब्रूक्स यांनी करून दाखवले. त्यामुळे पिअर प्रभावित झाले. अथेन्सचे ऐतिहासिक महत्त्व म्हणून पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धा तेथे घ्याव्यात, याविषयी पिअर यांच्या मनात संदेह नव्हता. पण ब्रूक्स यांच्या प्रयोगांमुळे ते अधिक प्रभावित झाले हे मात्र नक्की.
पॅरिसमध्ये शिक्कामोर्तब
झपास आणि वेनलॉक स्पर्धा सर्वार्थाने स्थानिक होत्या. पिअर द कुबर्तांना त्यास आंतरराष्ट्रीय परिमाण आणि ओळख द्यायची होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडूंना एकत्र आणून, आंतरसांस्कृतिक देवाणघेवाण आणि त्यातून सौहार्दपूर्ण सहअस्तित्वाचे आंतरराष्ट्रीय अभिसरण त्यांना अपेक्षित होते. सोरबाँ विद्यापीठात त्यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक पुनरुज्जीवन परिषदेचे आयोजन केले. या व्यक्तिमत्त्वाविषयी एव्हाना युरोप आणि अमेरिकेमध्ये बर्यापैकी वाचले-ऐकले गेले होते. त्यामुळे १८९४ मधील त्या परिषदेस ५८ फ्रेंच आणि २० परदेशी प्रतिनिधी उपस्थित होते. ऑलिम्पिक संकल्पनेचे पुनरुज्जीवन करणे, याअंतर्गत अथेन्स येथे १८९६मध्ये पहिल्या आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धा भरवणे आणि यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना करणे असे महत्त्वाचे निर्णय त्या परिषदेत घेतले गेले. फ्रान्स, ब्रिटन आणि ग्रीस या तीन देशांमध्ये वेगवेगळ्या प्रेरणांनी मिळून आधुनिक ऑलिम्पिकची पायाभरणी केली, तरी पिअर द कुबर्ता यांनी ती संकल्पना आंतरराष्ट्रीय पातळीवर नेली. siddharth.khandekar@expressindia.com

