scorecardresearch

बुकबातमी : बंगलोर लिटफेस्टमध्ये नवोदितांना व्यासपीठ

लिटमार्ट’च्याच धर्तीवर यंदा ‘स्क्रीनलिट’ हा नवा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

बुकबातमी : बंगलोर लिटफेस्टमध्ये नवोदितांना व्यासपीठ
बंगलोर लिटफेस्ट ३ आणि ४ डिसेंबरला होत आहे (संग्रहित छायाचित्र) photo source : loksatta photo

जया डोंगरे

यंदाचा बंगलोर लिटफेस्ट ३ आणि ४ डिसेंबरला होत आहे. नेहमीप्रमाणेच विविध कार्यक्रम आणि चर्चासत्रांतून २५० हून अधिक लेखकांचे विचार ऐकण्याची आणि त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी वाचनप्रेमींना मिळणार आहे.

महोत्सवाचे यंदाचे वैशिष्टय़ म्हणजे यात ‘लिटमार्ट’ हा उपक्रम पुन्हा सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत नवोदित लेखक आपल्या कल्पना प्रकाशकांसमोर मांडू शकतील. ‘लिटमार्ट’च्याच धर्तीवर यंदा ‘स्क्रीनलिट’ हा नवा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात पटकथाकार अलंकृता श्रीवास्तव, चित्रपट निर्माते नतेश हेगडे आणि दिग्दर्शक कमल केएम यांच्यासमोर नवोदित पटकथाकार आपल्या कल्पना सादर करू शकतील. यातील १५ कल्पना चित्रपटनिर्मितीसाठी संबंधितांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणर आहे.

महोत्सवात आयोजित विविध कार्यक्रमांतून दामोदर मावजो, पिको अय्यर, रामचंद्र गुहा, विरप्पा मोइली यांच्यासह अनेक प्रथितयश तसेच नवोदित लेखकांचे विचार ऐकण्याची संधी मिळेल. ३ डिसेंबरला ‘रेत समाधी से टुम्ब ऑफ सँड तक’ या सत्रात (१०.३०) अनुकृती उपाध्याय आणि अरुनवा सिन्हा गीतांजली श्री यांच्याशी संवाद साधणार आहेत. ‘सेक्रेड गेम्स’ या कादंबरीचे लेखक विक्रम चंद्रा यांच्याशी अनिरुद्ध कनिसेटी संवाद साधतील (१०.३०). ‘एक्सपरिमेंट्स विथ लिव्हिंग’ या सत्रात (११.१५) मल्लिका साराभाई आणि रामजी चंद्रन चर्चा करतील. ‘पर्यावरणस्नेही भविष्यकाळ’ या विषयावर शेखर पाठक, उल्हास कारंत आणि महेश रंगराजन विचार मांडतील (१२.१५). ‘ह्युमन्स ऑफ कोविड’ या सत्रात (१.००) बरखा दत्त यांचे विचार ऐकण्याची संधी मिळेल. ‘समाज सरकार बाजार’ या सत्रात (३.००) रोहिणी निलेकणी आणि मनु पिल्लाई यांची चर्चा ऐकता येईल. ‘एज ऑफ ट्रान्सलेशन’ (३.१५) या सत्रात अनुरव सिन्हा, संगीता श्रीनिवासन, आणि उदयन मित्रा विचार मांडतील.

४ डिसेंबर रोजी ‘स्टोरीज आय मस्ट टेल’ या सत्रात (१०.००) कार्तिका व्ही. के. कबीर बेदी यांच्याशी संवाद साधतील. ‘मॅजिक ऑफ द लॉस्ट स्टोरी’ या सत्रात (११.४५) सुधा मूर्ती यांच्याशी मनु पिल्लाई चर्चा करतील. ‘इन सॅशिएबल’ या सत्रात (२.४५) शोभा डे यांची मते आणि अनुभव ऐकता येतील. ‘धिस इज माय स्टोरी’ या सत्रात मनज्जमा जोगती यांचा प्रवास जाणून घेता येणार आहे.

महोत्सवात बालकांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. चिल्ड्रन, लिटरेचर, फन (सीएलएफ) या विभागात कथाकथन, कठपुतळय़ांचे खेळ, संगीत, विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘विशिंग ट्री’ (अमर चित्रकथा), ‘बिल्ड अ स्टोरी’, ‘वर्डस यंगेस्ट हिस्टॉरियन’ असे काही विशेष कार्यक्रम होणार आहेत.

याव्यतिरिक्त कन्नड साहित्य, बंगळूरुचे बदलते रूप, अनुवादित साहित्य, इतिहास, चरित्र, प्रवास, महिलांचे बदलते सामाजिक स्थान, खाद्यसंस्कृती, संगीत, चित्रपट, अविवाहितांचे प्रश्न, वृद्धांसमोरील आव्हाने अशा विविध विषयांवर विचारमंथन केले जाणार आहे. दिवंगत अभिनेता पुनित राजकुमार याच्या स्मरणार्थ महोत्सव स्थळांना त्याच्या स्मृतींशी संबंधित नावे देण्यात आली आहेत. कोविडकाळात दोन वर्षे हा महोत्सव ऑफलाइन आणि ऑनलाइन असा मिश्र स्वरूपात झाला. यंदा मात्र सर्व कार्यक्रम ऑफलाइन होणार असल्यामुळे साहित्यिकांना प्रत्यक्ष भेटण्याचा आनंद रसिकांना मिळणार आहे. महोत्सव शेशाद्रीपुरम येथील द ललित अशोकामध्ये होणार असून नोंदणीसाठी आणि कार्यक्रमांचे वेळापत्रक पाहण्यासाठी  bangaloreliteraturefestival. org  या संकेतस्थळाला भेट द्यावी.

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 02:48 IST

संबंधित बातम्या