दिल्लीत रणरणते ऊन आहे, घराबाहेर रखरखाट आहे. बाकी राजकीय पटलावर शांतता आहे. आत्ताच विधानसभेच्या निवडणुका होऊन गेलेल्या आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठीदेखील हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरण वगैरे काही करण्याची गरज नाही. शिवाय, नव्या मुख्यमंत्र्यांचे शपथविधी झालेले आहेत. नवी सरकारे आपापल्या पद्धतीने कारभार करू लागलेली आहेत. हे सगळे उरकून पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशी गेलेले आहेत. मोदी जाता जाता लोकांना काटकसरीचा सल्ला देऊन गेलेले आहेत. ते परदेशात गेल्यानंतर पश्चिम आशियातील युद्धाची झळ बसणार म्हणजे नेमके काय होणार हे हळूहळू समजायला लागले. त्याची सुरुवात केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीप पुरी यांनी केली. या पुरींनी हळूच टोपीतून कबुतर काढले. हे कबुतर म्हणजे धोक्याची घंटा होती. ते महागाई वाढणार असे स्पष्ट म्हणाले नाहीत. ते कबुतर म्हणजे सरकारी तेल विपणन कंपन्यांबद्दल पुरी म्हणाले, ‘या कंपन्या आता किती तोट्यात राहणार, त्यांनाही जीव आहे की नाही. त्यांनी जगायचं कसं?’ त्यांच्या म्हणण्याचा उद्देश होता की, पेट्रोल-डिझेलची दरवाढ होणारच! इंधन दरवाढ होणार आणि तुम्हाला खिशातून जास्त पैसे काढावे लागणार असे स्पष्ट केंद्रीय मंत्र्यांनी का सांगितले नाही, हे कोडे आहे.
एनडीए सरकारने गेल्या बारा वर्षांमध्ये कुठल्याही समस्येच्या काळात कोणतीही बाब नीट, स्पष्टपणे लोकांना सांगितलेली नाही. करोनाकाळात अचानक टाळेबंदी लागू केली. पंतप्रधान मोदी टीव्हीवर आले. ते म्हणाले की, उद्यापासून टाळेबंदी. मग ती लागूही झाली. त्याबाबत आधी लोकांना विश्वासात घेणे हा प्रकार झाला नाही. या वेळीही पुरींनी अप्रत्यक्षपणेच सांगितले की, इंधन दरवाढ होणार. मग, इतकी महत्त्वाची बाब सांगायची त्यांनी टाळाटाळ का केली, हा प्रश्न आहे. पुरींनी आडून आडून जे सांगितले ती इंधन दरवाढ दोन दिवसांमध्ये झाली. या किमती पुढेही काही काळ वाढत राहू शकतात.
मोदींनी जाहीर सभेमध्ये उपदेश केला की, सोने घेऊ नका, घरात बसून काम करा, फिरायला परदेशात जाऊ नका, खर्च जपून करा… काटकसर करा असे सांगून त्यांनी विषयच सोडून दिला. मग, त्यांचे मंत्री हास्यास्पद काटकसर करू लागले. या मंत्र्यांना तशी सवय नाही, ते लवाजम्याशिवाय वावरू शकत नाहीत. त्यांची काटकसर महिनाभरही टिकणार नाही हे लोकांनाही कळते. असे असेल तर लोकांच्या डोळ्यादेखत खोटेपणा करून देशाची आर्थिक बचत कशी होणार, याचे उत्तर मंत्र्यांनी दिलेले नाही. काही मंत्र्यांनी ईव्ही गाड्या वापरायला सुरुवात केली आहे. पण या गाड्यांचे चार्जिंग कशावर करणार? त्यासाठी पुन्हा डिझेलच वापरणार. विजेवर चार्जिंग करायची सुविधा किती आहे? पुन्हा विजेचे उत्पादन कोळशावरच होते. यापूर्वी, मोदींनी स्वच्छतेची हाक दिल्यावर मंत्री स्वच्छतेचा आव कसे आणत होते ते लोकांनी पाहिले. त्या नाटकीपणाचा मंत्र्यांची काटकसर हा दुसरा अंक आहे, असे म्हणता येऊ शकते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचंड संवेदनशील आहेत, ते भावनिक झाले की, त्यांचे मन ते टीव्हीवर येऊनही लोकांसमोर उघडे करतात. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वाढीव तीन दिवसांमध्ये विरोधकांनी घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर करून त्यांच्या भावना दुखावल्या होत्या. मोदींनी त्या वेळी देशाला उद्देशून टीव्हीवरून भाषण केले होते. त्यांनी तमाम महिला मतदारांची माफी मागितली होती. ते म्हणाले होते की, विरोधकांच्या नाकर्तेपणामुळे महिलांना आरक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे. पण, त्यांनी घटनादुरुस्ती विधेयक महिला आरक्षणाचे नव्हते ही बाब सांगितलीच नाही. काहीही असले तरी मोदींना जे विषय महत्त्वाचे वाटतात त्याबद्दल ते थेट लोकांशी टीव्हीवर येऊन संवाद साधतात. मग, त्यांनी देशाला आर्थिक ताण सहन करावा लागणार आहे ही अत्यंत महत्त्वाची बाब लोकांना टीव्हीवर येऊन का नाही सांगितली, हा मुद्दा उपस्थित होतो. एखाद्या ठिकाणच्या जाहीर सभेत भाषण करणे आणि देशासमोर उभ्या राहिलेल्या समस्येविषयी गांभीर्याने राष्ट्राला उद्देेशून-सर्व नागरिकांना- माहिती देऊन सरकार काय करणार आहे याबाबत आश्वस्त करणे या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पश्चिम आशियातील युद्धाची परिस्थिती काय आहे, या युद्धाचे पुढे काय होऊ शकते, इराणशी आपण कशा रीतीने संवाद साधत आहोत, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आपली सर्व तेलवाहू जहाजे सुरक्षित बाहेर काढली जात आहेत का, कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत नेमकी काय परिस्थिती आहे, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कितपत वाढू शकतील, त्याचे आपल्या देशावर काय परिणाम होतील. आपल्याला कितपत इंधन दरवाढ करावी लागू शकते, एलपीजी व इतर इंधन पुरवठा अबाधित ठेवण्यासाठी देश काय उपाय करत आहे, इंधन दरवाढ झाली तर महागाई वाढेल, त्याचे प्रमाण कितपत असेल, खरोखरच करोना काळातल्यासारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल का, करोनाकाळात टाळेबंदी होती, तशी होणार आहे का, अन्नधान्याची टंचाई जाणवेल का, तशी होऊ नये यासाठी केंद्र सरकार काय उपाय करत आहे, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. या प्रश्नांचे निरसन केले असते तर मोदींवरील लोकांचा विश्वास कदाचित वाढलाच असता. लोकांच्या मनातील गोष्ट ओळखून त्यांना आश्वस्त करण्यासाठी सध्या केंद्र सरकारकडे मोदींशिवाय दुसरा नेता नाही. त्यामुळे मोदींनी टीव्हीवर येऊन देशाला उद्देशून भाषण का केले नाही, असा प्रश्न विचारता येऊ शकतो.
मोदींनी जाहीर सभेमध्ये लोकांना सल्ला दिल्याने अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. त्यातून लोकांच्या मनातील शंकांमध्ये वाढ झालेली दिसली. त्यांना खरोखरच करोनाकाळ परत येईल अशी भीती वाटू लागली आहे. अन्नधान्यांची टंचाई होईल, त्यापेक्षा सहा महिने पुरेल इतके अन्नधान्य, इतर सामान भरून ठेवले पाहिजे असा विचार मध्यमवर्गीयांच्या घरांत केला जाऊ लागला आहे. त्यात देशभर अनेक पेट्रोल पंपांवर, सीएनजी पंपावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. डिझेल संपल्यामुळे पेट्रोल पंपावर लोकांमध्ये हाणामार्या होऊ लागल्या आहेत. अशा घटनांमुळे शंकांमध्ये भर पडली आहे. लोकांच्या मनातील भीती वाढत असताना फक्त एकदा वरिष्ठ नेत्याकडून लोकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला गेला. मोदींनी लोकांना काटकसरीचा उपदेश केल्यानंतर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार गटाच्या बैठकीनंतर स्वत: राजनाथ यांनी ‘एक्स’वर संदेश दिला की, ‘लोकांनी घाबरण्याचे कारण नाही. शांत राहा, देशात तुटवडा होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेत आहे!…’
मोदींच्या सरकारमध्ये इतके सगळे स्वत:ला चाणक्य म्हणवणारे नेते-मंत्री शांत बसून आहेत, त्यांनी लोकांना उद्देशून काहीही सांगितलेले नाही. त्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यांच्याकडे निवडणुका जिंकून देण्याचे कदाचित कौशल्य असू शकेल; पण आपत्तीच्या काळात लोकांचा भरवसा ते मिळवू शकत नाहीत, असे चित्र त्यांच्या संवादाच्या अभावामुळे निर्माण झाले आहे. देशाची आर्थिक परिस्थिती बदलू शकते ही बाब लोकांना स्पष्टपणे सांगितली गेली नाही. परदेशी लोकांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक काढून घेतली अशा आर्थिक किचकट गोष्टी नाही सांगितल्या तरी चालतात. पण, लोकांच्या दैनंदिन घडामोडींशी निगडित महागाई आदी गोष्टींची कल्पना लोकांना मोदी सरकारने दिली नाही ही वस्तुस्थिती आहे. मोदींचे मंत्री सायकलवरून जातात याचेच कौतुक होत असल्याचे लोकांनी पाहिले.
महिलांना आवाहन करण्यासाठी टीव्हीवर भाषण देणारे पंतप्रधान मोदी देशापुढे आर्थिक संकट येऊन ठेपले आहे, असे स्पष्ट सांगायला टीव्हीवर का आले नाहीत, याचे कदाचित एकमेव कारण असू शकते. मोदींनी इतक्या वर्षांमध्ये एकही पत्रकार परिषद घेतली नाही त्याचेही कारण तेच आहे. ते काही पत्रकारांना मुलाखती देतात; पण पत्रकारांनी काय विचारायचे किंवा विचारू नये, याच्या सूचना दिलेल्या असतात असे सांगितले जाते. या मुलाखती ‘ठरवून’ झालेल्या असतात. शिवाय, या मुलाखती म्हणजे पत्रकार परिषद नव्हे. मनमोकळी पत्रकार परिषद असो किंवा समस्या आणि संकटाची जबाबदारी घेऊन लोकांना विश्वास घेणे असो. मोदींनी या दोन्ही गोष्टी टाळलेल्या आहेत. संसदेतही मोदी फारसे उपस्थित राहात नाहीत. ते चर्चांमध्ये सहभागी होत नाहीत. या सगळ्यामागे त्यांच्या जनमानसांतील प्रतिमेला धक्का लागेल असे त्यांना वाटत असावे. लोकांना नेहमीच प्रतिमा भावते, वलय असलेला नेता ‘संकट आले आहे,’ असे सांगू लागला तर त्या प्रतिमेला तडा जाण्याचा धोका असू शकतो हे नाकारता येत नाही. म्हणून कदाचित मोदी संकटसमयी जाहीर सभांमधून लोकांना उपदेश करून विषय संपवत असावेत असे दिसते. वस्तुस्थिती काहीही असली तरी मोदींवर टीका करण्याची संधी विरोधी पक्षीयांना मिळू शकते, हे खरे.
mahesh.sarlashkar@expressindia.com
