लाहोरहून उत्तर प्रदेशातील रामपूर येथे वयाच्या सातव्या-आठव्या वर्षी स्थलांतर. एकविसाव्या वर्षी भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) म्हणून दाखल. कवितेची आवड विशीच्याही आधीपासूनच, पण वयाच्या ३६व्या वर्षी पहिला काव्यसंग्रह प्रकाशित; सदतिसाव्या वर्षी उत्तर प्रदेशचा राज्य साहित्य पुरस्कार. मग पोलीस सेवेतून गुप्तचर सेवेत; वयाच्या ४७ व्या वर्षी केंद्रीय ‘साहित्य अकादमी’चा पुरस्कार. मध्येच पंतप्रधान चरणसिंह यांचे विशेष सहायक म्हणून नेमणूक, त्याआधी व नंतरही गुप्तचर सेवेत बढत्या आणि निवृत्तीनंतर सरकारी मेहेरनजर स्वीकारणे टाळूनही तीन वर्षे केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य. वयाच्या ८०व्या वर्षी ‘इंटरनॅशनल डब्लिन लिटररी अॅवॉर्ड’, त्याआधी कविता व कथांची ११ पुस्तके प्रकाशित, त्यापैकी काहींचे एकंदर पाच युरोपीय भाषांत अनुवाद, काव्यसंपदेविषयी इतर अभ्यासकांनी लिहिलेले तीन ग्रंथ प्रकाशित- हे झाले केकी दारूवाला यांच्या जीवनप्रवासाचे केवळ बाह्यवर्णन. अंतर्यामी ते कवीच होते. शुक्रवारी (२७ सप्टेंबर) त्यांच्या निधनाची बातमी आल्यावर काही थोडे जण ‘सचोटीचा, कार्यक्षम पोलीस अधिकारी गेला’ असे म्हणालेही असतील; पण भारतीय इंग्रजी कवितेच्या एका युगाचा दुवा निखळल्याची खंत सर्वदूर होती आणि राहील.
हेही वाचा >>> व्यक्तिवेध: मधुरा जसराज
हे भारतीय- इंग्रजी कवितेचे युग वसाहतोत्तर काळाच्या सुरुवातीचे. त्यात निस्सीम इझीकेल, आर. पार्थसारथी, ए. के. रामानुजन, जयंत महापात्र, महाभारताचे इंग्रजीत पुनर्सर्जन करणारे पी. लाल (पुरुषोत्तम लाल) अशी मंडळी होती. त्यापुढले देशकालनिष्ठ कवितेचे युग घडवले ते अरुण कोलटकर, अरविंद कृष्ण मेहरोत्रा, आदिल जस्सावाला यांच्यासारख्यांनी. दारूवाला हे वयाने कोलटकरांचे समकालीनच पण सुरुवातीच्या काळातली दारूवालांची कविता स्वत:ची वाट शोधू पाहणारी असली तरी बंडखोर नव्हती. कोलटकरांची ‘जेजुरी’ आणि दारूवालांचा ‘क्रॉसिंग ऑफ रिव्हर’ हा बनारसबद्दलचा संग्रह, दोन्ही सन १९७६ मध्ये प्रकाशित झाले. पण जेजुरी देवाला, माणसांना आणि परिसराला रांगडेपणाने भिडते; तर केकी दारूवाला ‘प्रेतांचा आणि अन्न शिजवण्याचा अग्नी एकमेकांशेजारीच पेटवणाऱ्या’ किंवा ‘तोफेगत धडाडत गटारनाले विसर्जित होऊनही नदीचा पवित्रपणा निपचित’ असणाऱ्या गंगेबद्दल, बनारसबद्दल एक प्रकारचा विस्मय वाचकांपर्यंत पोहोचवू पाहातात. हा विस्मयही ‘दान्ते इथे हरला असता- याला स्वर्ग म्हणावे की नरक’ अशा अभ्यस्त पाश्चात्त्य संस्कारांची साय असलेला आहे. तरीही दारूवाला महत्त्वाचे, कारण त्यांनी कुतूहलाचा दिवा तेवता ठेवला. म्हणूनच निवृत्तीनंतर त्यांची कविता मोकळी झाली. करोनाकाळातली ‘अँजेलिक ऑर्डर्स’ ही तर भारताच्या सद्या राजकारणाची लक्तरे मांडणारी कविता… अर्थात, त्याआधीच (२०१५) ते ‘पुरस्कार वापसी गँग’मध्ये सहभागी झाले होते!