scorecardresearch

Premium

चांदनी चौकातून : नवी यात्रा, नवा फंडा

राहुल गांधी आता निजामुद्दीन भागात राहायला गेले आहेत. माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं घर त्यांनी भाडय़ानं घेतलेलं आहे.

political activity in last week
हरियाणाच्या शेतांमध्ये धानपेरणी.

दिल्लीवाला

‘भारत जोडो’ यात्रेच्या यशानंतर काँग्रेससाठी पदयात्रा, बसयात्रा अशा वेगवेगळय़ा यात्रा हे लोकांमध्ये मिसळण्याचं हमखास प्रारूप झालेलं दिसतंय. सध्या काँग्रेसच्या मुख्यालयात वर्दळ दिसू लागली आहे, कारण राज्या-राज्यांतील वरिष्ठ नेत्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या नेत्यांना एकजुटीचे आवाहन करत आहेत, तर राहुल गांधी या नेत्यांना राज्यभर यात्रा काढण्याची सूचना करत आहेत. कर्नाटकमध्ये ‘भारत जोडो’ यात्रेने सुमारे १५ दिवस प्रवास केला, तिथे काँग्रेसला यश मिळालं तर अन्य राज्यांमध्येही मिळेल असं राहुल गांधींचं म्हणणं आहे. महाराष्ट्रात जिल्ह्या-जिल्ह्यात पदयात्रा आणि नंतर ज्येष्ठ नेत्यांची बसयात्रा काढली जाणार आहे. हेच सूत्र कदाचित अन्य राज्यांतही राबवलं जाऊ शकेल. राहुल गांधींनी आपल्या राज्यातील यात्रेमध्ये सहभागी व्हावं असं नेत्यांना वाटत असलं, तरी त्याबाबत अजून निर्णय घेण्यात आलेला नाही. राहुल गांधी पूर्व-पश्चिम यात्राही काढणार असल्याचं सांगितलं गेलं होतं, पण त्या आघाडीवर अजून हालचाल झालेली दिसत नाही! ‘भारत जोडो’ यात्रेनंतर लोकांशी संवाद साधण्याचे अनोखे फंडे राहुल गांधींचा चमू शोधून काढत आहे. कधी दिल्लीच्या बाजारांमध्ये फेरफटका, गॅरेजमध्ये मॅकॅनिकशी लग्नाच्या गप्पा, कधी हरियाणाच्या शेतांमध्ये धानपेरणी.. आता राहुल गांधींचा नवा कल्पक संवाद कसा असेल याची कार्यकर्त्यांना उत्सुकता असेल. राहुल गांधींची प्रतिमा बदलण्याचाच नव्हे तर नवी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने होत असल्याचं दिसतं. काही दिवसांपूर्वी ज्या शेतकऱ्यांशी गप्पा मारल्या, त्यांना दिल्लीतील नव्या घरात जेवणाचं आमंत्रण दिलं होतं. राहुल गांधी आता निजामुद्दीन भागात राहायला गेले आहेत. माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं घर त्यांनी भाडय़ानं घेतलेलं आहे. खासदारकी गेल्यामुळं तुघलक रोडवरील सरकारी निवासस्थान त्यांना सोडावं लागलं. मग, ते आई सोनिया गांधींच्या दहा जनपथवरील घरी राहात होते. आता त्यांनी नवं घर शोधलेलं आहे. निजामुद्दीन-पूर्वचा हा भाग अत्यंत पॉश, बंगलेवाल्यांचा आहे. याच भागात काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेराही राहतात. खेरा यांनी दीक्षित यांचे सचिव म्हणून काम केलेलं आहे. खेरांची प्रगती झाली. आता तर गांधी कुटुंबातील सदस्यच खेरांच्या घराजवळ राहायला आले आहेत.

Vinod Tawde Nitish Kumar
राजकीय गदारोळात विनोद तावडे बिहारमध्ये दाखल, भाजपा नितीश कुमारांना समर्थन देणार?
ajit pawar latest news in marathi, parth pawar gajanan marne marathi news
गुंड गजानन मारणे, पार्थ पवार भेटीवर अजित पवार म्हणाले, “अतिशय चुकीची…”
mamata banerjee on ram mandir
भाजपा महिला विरोधी; प्रभू रामाचा जयजयकार करताना सीता मातेचा विसर, ममता बॅनर्जींची टीका
ram lalla, pran pratishtha, balasaheb thackeray, anand dighe, cm eknath shinde
“कोण पहात असेल, नसेल…बाळासाहेब, दिघेसाहेब हा सोहळा पहात आहेत”… मुख्यमंत्र्यांचे उद्गार

मर्जीतल्या गटाचं वेगळं अस्तित्व

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुफळी झाल्यानंतर दिल्लीतही लोकांनी आपापले हितसंबंध जपले, काहींनी मूळ राष्ट्रवादीसोबत राहणं पसंत केलं. त्यांच्या आक्रमकतेला वैतागून काहींनी गट बदलला. ते अजित पवारांच्या गटात सामील झाले. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असल्यानं जुन्या कॅिनग रोडवर अधिकृत कार्यालय देण्यात आलं होतं. प्रत्येक राष्ट्रीय पक्षाला दिल्लीत कार्यालय दिलेलं असतं. आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावला असल्यानं अधिकृत कार्यालय हातातून जाण्याची शक्यता आहे. अजून तरी ते शरद पवारांच्या गटाच्या ताब्यात असलं, तरी ते कायम राहील की नाही हे मोदी-शहांच्या मर्जीवर अवलंबून असेल. पूर्वाश्रमीचे काँग्रेसनेते गुलाम नबी आझाद ना खासदार आहेत, ना त्यांच्याकडं कुठली सरकारी जबाबदारी तरीही ते सरकारी निवासस्थानाचा लाभ घेत आहेत. त्यांच्यावर भाजपची मर्जी असल्याचं सांगितलं जातं. ज्यांच्यावर भाजपची मेहेरनजर त्यांना दिल्लीच्या ल्युटन्स भागात राहायची सुविधा मिळू शकते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर अशीच मेहरनजर असेल तर त्यांचं कार्यालय कायमही राहू शकेल. अन्यथा नजिकच्या काळात त्यांना गाशा गुंडाळावा लागेल. या कार्यालयाचा आधार असलेल्या काहींनी गट बदलून अजित पवारांच्या राष्ट्रवादीची धुरा खांद्यावर घेतली आहे. सध्या नव्या राष्ट्रवादीचं दिल्लीतील कामकाज प्रफुल पटेल यांच्या रकाबगंज गुरुव्दारा परिसरातील सरकारी निवासस्थानातून केलं जातंय. या गटावर भाजपची मर्जी निर्माण झाली असल्यानं त्यांच्या नव्या कार्यालयासाठी तातडीने तरतूदही करण्यात आली आहे. नॉर्थ अ‍ॅव्हेन्यू भागात पुढच्या काही दिवसांमध्ये हे कार्यालय सुरू होईल. इथून केंद्रीय निवडणूक आयोगातील लढाई लढणं सोपं जाऊ शकतं. नव्या राष्ट्रवादीनं प्राथमिक नोंदणीची प्रतिज्ञापत्रं जमा करण्याचं काम सुरू केलं असून आत्तापर्यंत साडेतीन लाख प्रतिज्ञापत्रं जमा झाली असून आठ-दहा लाखांचं उद्दिष्ट गाठण्याचं ठरवलेलं असल्याचं सांगतात. या गटानं १० राज्यांतील जुन्या प्रदेशाध्यक्षांना आणि तिथल्या कार्यकारिणी समितीला डच्चू दिला आहे. या कारवाईच्या अधिकृततेवर निवडणूक आयोग निर्णय घेईल. पण, राष्ट्रवादीच्या नव्या गटानं दिल्लीत वेगळं अस्तित्व निर्माण करण्यासाठी पावलं उचलली आहेत.

उपरवाला मेहेरबान..

काँग्रेसमध्ये राहुल गांधींच्या नजिक असलेल्या एखाद्या नेत्याबद्दल नाराजी असू शकते आणि त्यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडल्याचं समर्थन करताना छगन भुजबळ म्हणाले होते की, शरद पवारांभोवती बडवे असतात, ते काम करू देत नाहीत. काँग्रेसमध्येही तसंच झालेलं असू शकतं. त्यामुळं एखाद्या नेत्याबद्दल नाराजी पसरली असेल तर, फार विशेष घडलं असं नव्हे, पण त्या नेत्याच्या वागणुकीवरून कोणी पक्षश्रेष्ठींपर्यंत तक्रार केली असेल तर खरोखरच काहीतरी गंभीर झालेलं असू शकतं. संबंधित नेत्याविरोधात कुणीतरी तक्रार करणं हेच धाडस म्हणायला हवं. सध्या तरी काँग्रेस पक्षाचा समन्वय अशाच एका नेत्याच्या हातात आहे. संघटनेतील निर्णयाची अंलबजावणी तोच करतो, इतर नेत्यांशी संपर्क साधतो. इतर नेत्यांनाही त्याच्याशिवाय हायकमांडपर्यंत पोहोचता येत नाही. या नेत्याचं एकमेव लक्ष्य असतं राहुल गांधींचे हितसंबंध जपणं. त्याच्या या उद्दिष्टामध्ये काही गैर असल्याचं दिसत नाही. कोणताही नेता हायकमांडच्या हिताच्या गोष्टी करणारच. पण, कामकाजाच्या पद्धतीमध्ये त्याचा स्वत:चा अहंकार अडथळा निर्माण करत असेल तर समस्या वाढत जाते. या नेत्याच्या मूडवर दिवसाचं काम अवलंबून असतं असं म्हणतात. कधी तो अचानक रागावतो, फोनवर बोलतानाही अरेरावी करतो, आदल्या दिवशीची सूचना दिसऱ्या दिवशी बदलतो. या नेत्याच्या लहरीपणावर किती दिवस काम करणार असा प्रश्न विचारला जात आहे. काँग्रेसमध्ये राहुल गांधी हे सत्तास्थान आधीपासूनच होतं, त्यांच्याभोवती या नेत्यासह अनेक जणांचं वर्तुळ आहे. पण, नव्या रचनेमध्ये खरगे पक्षाध्यक्ष असल्यानं त्यांना डावलून या वर्तुळाला काही करता येत नाही. खरगेंचा खमकेपणा या वर्तुळाला पुरून उरलेला आहे. त्यामुळं या नेत्यालाही काही करता येत नाही. मंत्री निर्णय घेतो पण, अंमलबजावणी सरकारी अधिकाऱ्याच्या अडेलतट्टूपणामुळं लांबणीवर पडते तसं काहीसं काँग्रेसमध्येही होऊ लागलं असल्याचं म्हणतात. कळीच्या क्षणी घोळ घालणाऱ्या एका प्रभारीला हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, पण या नेत्याने त्याला विरोध केला. अखेर थेट सोनिया गांधींशी संवाद साधून खरगेंच्या निर्णयाची परस्पर अंमलबजावणी केली गेली. कर्नाटक जिंकल्यामुळं या नेत्याच्या पदावर दुसऱ्या एका राहुल गांधी निष्ठावानाने दावा केला आहे, पण जोपर्यंत राहुल गांधींची मर्जी आहे तोपर्यंत या नेत्याला अभय मिळेल हे नक्की!

एक व्यक्ती, दोन राज्यं भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांच्याकडं पक्षानं आणखी एक महत्त्वाची जबाबदारी सोपवलेली आहे. जावडेकरांकडील मंत्रीपद गेलं असलं, तरी त्यांना केरळचं प्रभारी केलेलं होतंच, आता त्यांच्याकडं तेलंगणाच्या निवडणुकीची जबाबदारीही दिली आहे. कर्नाटकात पराभव झाल्यामुळं भाजपची दक्षिणेकडील दारं बंद झाली आहेत. ही दारं किलकिली करायची असतील तर तेलंगणामधील विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगली कामगिरी करावी लागेल. त्यामुळं भाजपसाठी कळीच्या काळात जावडेकरांना तेलंगणाचे निवडणूक प्रभारी करण्यात आलं आहे. जावडेकर पक्षासाठी नेहमी उत्साहानं काम करताना दिसतात. निवडणूक प्रभारी झाल्या-झाल्या जावडेकरांनी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष जी. किशन रेड्डी आणि सहप्रभारी सुनील बन्सल यांच्याशी संपर्क साधला. दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणाचा दौरा करणार असल्यानं जावडेकरांनी लगेच हैदराबादही गाठलं. आता त्यांनी तेलंगणात रीतसर निवडणुकीचं काम सुरू केलं आहे. मी दोन दिवस राहून प्राथमिक आढावा घेणार असून मग आखणी करेन असं त्यांनी सांगितलं होतं. जावडेकर दिल्लीत तुघलक लेनमध्ये राहतात. त्यांचा बंगला अगदी लागून नसला तरी राहुल गांधी त्यांचे शेजारी होते असं म्हणता येईल. आता मात्र जावडेकरांनी हा शेजारी गमावला आहे. पण, तसेही जावडेकर दिल्लीत कमी आणि केरळमध्ये जास्त असतात. महिन्यातील १०-१२ दिवस ते केरळमध्ये पक्षबांधणीच्या कामात व्यग्र असतात. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तेलंगणाची निवडणूक होईपर्यंत जावडेकरांना थिरुवनंतपूरम आणि हैदराबादच्या फेऱ्या कराव्या लागणार आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Political activity in last week political implications for last week latest news on the national zws

First published on: 16-07-2023 at 04:55 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×