राज्यसभेची उमेदवारी नाकारल्याने व्यथित झालेल्या नवनीतभाभींनी नवीन सुरुवात म्हणजे नव्या विचाराचा मनोदय व्यक्त करताच सारे उमरावतीकर स्तब्ध झाले. तसे हे शहरच मुळात सभ्य व सुसंस्कृतांचे. अंबापेठ ही त्यांची राजधानी. भाभींच्या या वक्तव्यामुळे इथे स्मशानशांतता पसरली होती. अनेक बुद्धिवंतांच्या चेहर्‍यावर आश्चर्यमिश्रित भाव होते. कारण एकच. भाभी विचार करू शकतात हे आधी का कळले नाही? कळले असते तर त्यांच्या पराभवाला हातभार लावलाच नसता.

भाभी मूळच्या अभिनेत्री. मेळघाटातले आदिवासी असोत की आणखी कुणी. नाचून-गाऊन त्या आनंद व्यक्त करतात. भलेही जहाल वक्तव्याने का असेना पण त्यांनी या शहराची ओळख संपूर्ण देशभरात निर्माण केली. या दोन्ही गोष्टींचे अप्रूप या शहरातील समंजसांना कधी वाटले नाही. मात्र, त्या विचारी आहेत हे म्हटल्यावर सारेच सुन्न झाले. आता काहीही करून भाभींची माफी मागायलाच हवी असे म्हणत सुसंस्कृत व बुद्धिमानांचा एक गट दादासाहेब खापर्डे बगिचा परिसरातून थेट भाभींच्या घराकडे निघाला.

तिथे जाऊन बघतात तर माध्यमे, विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची तोबा गर्दी उसळलेली. या गटाने कशीबशी दालनात जागा मिळवली तेव्हा भाभी रामदास आठवलेंशी बोलत होत्या. मी अनेकांना पक्षात येण्याची ऑफर देत असतो. एका वक्तव्यामुळे तुम्ही वेगळेपण सिद्ध केल्यामुळे आता आमच्या पक्षात या. राज्यसभा कशी मिळवायची ते माझ्यावर सोडा असे आठवले म्हणाल्याचे भाभींनी सर्वांना सांगितले. तेवढ्यात त्यांना दिल्लीहून काँग्रेसच्या हायकमांडचा फोन आला. तुम्ही विचार करता म्हणजे विचारी आहात हे सिद्ध झाल्याने आमच्या पक्षात यायला काही हरकत नाही.

लोकसभेत निवडून आणू. यशोमतींना कसे शांत करायचे ते बघू या शब्दात निमंत्रण दिले गेले. फोन ठेवून त्या गर्दीशी संवाद साधत असतानाच साहाय्यकाने पुन्हा त्यांच्या कानाजवळ फोन धरला. पलीकडे एकनाथराव होते. ते विचार करणे वगैरे सोडा. भाजपने दुखावलेल्या प्रत्येकाला आमच्या पक्षात येण्याचा नैसर्गिक हक्क आहे. तेव्हा तुम्ही या, पुनर्वसन कसे करायचे ते मी बघेन. हे बोलणे संपताच तिसरा फोन आला. प्रफुल्ल पटेल होते. काही विचारबिचार करू नका. तुमचे आधीचे चिन्ह ‘पाना’ आठवा. तेव्हा कशी मदत केली याचे स्मरण करून आमच्याकडे या. पक्षात आता महिलाराज सुरू झाले आहे. तुमची नक्की कदर केली जाईल.

थोडा वेळ लोकांशी बोलल्यावर फोन पुन्हा वाजला. आदित्य ठाकरे पलीकडे होते. आम्हालाही विचारी नेत्यांची गरज आहेच तेव्हा मागचा पुढचा विचार न करता थेट मातोश्रीवर या. ते हनुमान चालीसा प्रकरण विसरायला मी व पप्पा तयार आहोत. जो कमळाविषयी असंतुष्ट तो मशालीला प्रिय हे कायम ध्यानात असू द्या. मग थोड्याच वेळात सुप्रियाताईंनी ‘काय नवनीत कशी आहेस’ म्हणत फोन केला. मी सर्व महिला नेत्यांची मोट बांधतेय. त्यात तुम्ही सामील व्हा. पुरुषप्रधान राजकारणाला आपणच टक्कर देऊ शकतो. मते नसताना राज्यसभा कशी मिळवायची ते साहेब तुम्हाला सांगतीलच. तेवढ्यात बाहेर गलका सुरू झाला. युवा स्वाभिमानचे हजारो कार्यकर्ते नारे देत होते. ते विचार करणे सोडा व आपल्याच मूळ पक्षात परत या. कमळापेक्षा पानाच बरा. बघा कसे ते भाजपवाले वठणीवर येतात ते. हे वाक्य ऐकून भाभींनी क्षणात मूळ पक्षात परतण्याचा निर्णय जाहीर केला. हा सारा खेळ बघत असलेल्या बुद्धिवंतांच्या गटाने हळूच तिथून काढता पाय घेतला. त्यातले काही दुपारची झोपमोड केली म्हणून एकमेकांना शिव्या घालत होते.