जंगल हे आदिवासींचे घर आहे आणि तिथे शहरी नियम लागू केले, तर ना जंगले राहतील ना आदिवासी, हे जाणून आदिवासींना स्वयंशासनाचा अधिकार असावा, त्यासाठी स्वतंत्र कायदा असावा, अशी मागणी करण्यात आघाडीवर होते प्रदीप प्रभू. ‘पेसा’ कायदा १९९६ साली संमत झाला तो त्यांनीच केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून. आज याच कायद्यातले ‘केवळ काही’ शब्द बदलून देशातील अनेक समृद्ध वनजमिनी उद्योगपतींना आंदण दिल्या जात असताना, आदिवासींच्या लाडक्या ‘प्रदीपभाऊं’चे जाणे अधिकच क्लेशकारक.
प्रभू मूळचे पीटर डिमेलो. मुंबईतील सधन कुटुंबात वाढले. धर्मशास्त्र, तत्त्वज्ञानाचा व ‘टाटा इ्स्टिटट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’मध्ये व्यवस्थापनाचा अभ्यास केला आणि पुढे सामाजिक क्षेत्राकडे वळले. दीर्घकाळ डहाणूतील आदिवासी भागांत राहिले. १९७८ साली त्यांनी ‘कष्टकरी संघटने’ची स्थापना केली. घर बांधण्यासाठी जंगलातली झाडे तोडली वगैरे कारणे देऊन आदिवासींवर आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांवर सतत कुठले ना कुठले खटले भरले जात. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभूंनी स्वत:च कायद्याचा अभ्यास केला आणि कार्यकर्त्यांसाठी मोफत वकिली करू लागले. सहकारी वकिलांनी त्यांना चेष्टेने ‘मोफतलाल’ ही ‘उपाधी’ बहाल केली होती.
प्रभू पेशाने नसले तरी वृत्तीने पक्के शिक्षक! हक्क दिले जात नाहीत, ते मिळवावे लागतात, हे त्यांनी आदिवासींच्या मनावर बिंबवले. सधन वर्ग सर्व संसाधने स्वत:च्याच खिशात ठेवण्याची सोय कशी करतो हे त्यांनी अशिक्षित वा अल्पशिक्षितांना पत्त्यांसारख्या अगदी नित्याच्या खेळांतून समजावून सांगितले. ‘पंचायत (अनुसूचित क्षेत्रांमधील विस्तार) कायदा (पेसा), १९९६’ आणि ‘वन हक्क कायदा (२००५)’ – यांच्या निर्मितीत त्यांचे योगदान अनन्यसाधारण होते. या कायद्यांनी आदिवासींना वहिवाटीचा हक्क आणि उपजीविकेसाठी आवश्यक वनहक्क मिळवून दिले. पाचव्या अनुसूचीत समाविष्ट क्षेत्रांमधील ग्रामसभांना स्वशासनाचे अधिकार दिले.
प्रभूंचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नाही. मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, केरळ आणि उत्तर प्रदेशातील आदिवासींसाठीही त्यांनी काम केले. ‘नॅशनल फ्रंट फॉर ट्रायबल सेल्फ रूल’चे ते राष्ट्रीय निमंत्रक होते. ‘शोषित जन आंदोलन’ आणि ‘भारत जन आंदोलना’चेही त्यांनी नेतृत्व केले. सनदी अधिकार्यांपासून न्यायाधीशांपर्यंत अनेकांना आदिवासींच्या प्रश्नांसंदर्भात प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही त्यांनी समर्थपणे पार पाडली. विधवा, विस्थापित, स्थलांतरितांच्या हक्कांसाठीही प्रभूंनी लढे दिले. अनेकांच्या हितसंबंधांसाठी बाधा ठरलेल्या या नेत्यावर विविध खटले भरले गेले. ‘हे धर्मांतर करतात’, ‘नक्षलवादी आहेत’, ‘सीआयएचे हस्तक आहेत’ वगैरे आरोप त्यांच्यासाठी आणि त्यांच्या संघटनेसाठी नित्याचेच होते. त्यांना अटक झाली, तुरुंगवास भोगावा लागला, ‘टाडा’सारख्या गंभीर कायद्याची टांगती तलवारही होती, मात्र मार्क्सवादाचा पाईक असलेला हा नेता बधला नाही.
मुंबईसारख्या शहरातील एका संपन्न कुटुंबात जन्मलेल्या या उच्चशिक्षित नेत्याने आपले पूर्ण आयुष्य अतिशय साधेपणाने व्यतीत केले. अखेरच्या क्षणापर्यंत ते आदिवासी आणि कष्टकर्यांसाठी कार्यरत राहिले. प्रभूंचे निधन झाले असले, तरीही त्यांची कॉम्रेड पत्नी- शिराज बुलसरा आणि त्यांच्या सहवासात घडलेल्या अनेक कार्यकर्त्यांच्या रूपाने त्यांचे कार्य यापुढेही सुरूच राहील.
