ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा राजकीय हत्यांचा विषय चर्चेत आला आहे. या हत्या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या व माजी महापौर मीनाक्षी शिंदे तसेच त्यांच्या पतीचा सहभाग असल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबीय तसेच ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडल्यानंतर मग ठाणे पोलिसांनी पुरवणी जबाबात शिंदे गटाच्या माजी महापौरांचे नाव समाविष्ट केले. त्याआधी ठाणे पोलीस हे शिंदे गटाच्या नेत्यांच्या कथित सहभागाबाबत मौन बाळगून होते. आता तर हत्येचा कट रचल्याचा आरोप असलेल्या माजी महापौर शिंदे यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुसंस्कृत मानल्या जाणार्या ठाणे शहरात गेल्या काही दिवसांत कायदा व सुव्यवस्थेचे पार धिंडवडे निघाले आहेत, हेच या आणि अशा काही घटनांमधून दिसून येते.
दोनच दिवसांपूर्वी खंडणी आणि हप्तेखोरीमुळे संतप्त झालेल्या महिला विक्रेत्यांनी शिंदे गटाचा पदाधिकारी असलेल्या अभंगे नावाच्या गुंडाला भर पोलीस ठाण्यात चोप दिला होता. या महिलांच्या सहनशीलतेचा अंत झाल्यामुळेच त्यांनी हे कृत्य केले होते. तो होण्याचे कारण पोलीस या गुंडाच्या विरोधात कारवाई टाळत होते. त्याआधी एका गुंडाचा पाठलाग करताना त्याने भिरकावलेली वीट लागून पोलीस उपनिरीक्षक किसन भोईर यांचा मृत्यू झाला. याच कालावधीत आणखी दोघांच्या हत्या झाल्या. वागळे इस्टेट परिसरात कारखान्यांच्या जागा ताब्यात घेण्याकरिता गुंड टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. ठाण्यातील भाजप आमदार संजय केळकर यांनी अंमली पदार्थांच्या अड्ड्यांचे पुरावे सादर करूनही पोलिसांनी त्याकडे कानाडोळा केला. याच ठाण्यात रात्रभर डान्सबार सुरू असतात, पण पोलिसांना ते दिसत नाही. ठाण्यात पोलिसांचा धाकच राहिलेला नाही. वादग्रस्त ठरलेल्या किंवा बदलून गेलेल्या पोलीस अधिकार्यांची ठाण्यात पुन्हा नियुक्ती करण्यात आली. हे अधिकारी नेत्यांची हांजीहांजी करण्यापलीकडे काही करीत नाहीत.
तसाही श्रीधर खोपकर ते पूर्णेकर असा राजकीय हत्यांचा इतिहास ठाण्याला आहे. खोपकर यांच्या हत्येप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यांना गुरूस्थानी मानतात त्या आनंद दिघे यांना ‘टाडा’ अन्वये अटक झाली होती. रिक्षा चालकांच्या संघटनेचे नेते विजू नाटेकर यांच्या हत्येत शिवसेना नेत्यांवरच आरोप झाले होते. राज्यात गाजलेल्या मुंबईतील कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या हत्येतही शिवसेना कार्यकर्त्यांना अटक झाली होती. केवळ समाज माध्यमातून काही आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याबद्दल अनंत करमुसे या अभियंत्याला तत्कालीन मंत्री व राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी बेदम मारहाण करण्यात आली होती. ठाणे काय पुणे काय आणि बीड काय, अशा सगळ्याच शहरांमध्ये गुंड टोळ्यांची हिम्मत वाढली आहे. पुण्यात तर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीच गुंडांना राजाश्रय दिल्याचे आरोप झाले होते.
निवडणुका जिंकण्यासाठी राजकारण्यांकडून गुंड टोळ्यांना आश्रय दिला जातो. तसेच निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता लक्षात घेता गुंडांना उमेदवारी दिली जाते. राजकारणातील वाढत्या गुन्हेगारीकरणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी राजकीय पक्ष तसेच लोकप्रतिनिधींचे कान उपटले आहेत. गुन्हेगारांना निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवण्यासाठी कायदा करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने सरकारला यापू्र्वी केली होती. पण कोणताही राजकीय पक्ष असो, त्याला निवडणूक जिंकण्यासाठी गुन्हेगारी टोळ्या, गुंड यांची मदत घ्यावीच लागते. मग या गुन्हेगारी टोळ्या केलेल्या मदतीचा पुरेपूर फायदा उठवितात.
हत्या, मारहाण, सरकारी अधिकार्यांवर हल्ले अशा विविध प्रकरणांमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी वा कार्यकर्त्यांची नावे जोडली जात असल्याने उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. ठाण्यातील हत्येत शिंदे गटाच्या पदाधिकार्यावर आरोप झाले. आमदार निवासातील मारहाणीत शिंदे गटाच्या आमदाराचा सहभाग होता. असेच काही एकाहून एक नग शिंदे गटात आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नेते व कार्यकर्त्यांवर वचक होता. तसा शिंदे यांचा वचक निर्माण झाला नसावा. सत्तेची उब असल्याने आपल्याला सारे माफ या आविर्भावात ही नेतेमंडळी वावरत असतात. गृह खाते सांभाळणार्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हेगारी कृत्य करणारा कोणत्याही पक्षाचा असो, कायद्यासमोर सारे समान आहेत, हा संदेश देणे खरे तर आवश्यक आहे. तरच खर्या अर्थाने कायद्याचे राज्य प्रस्थापित होईल.
