जुन्या-नव्याच्या सौंदर्य-संगमात एक  जागा शोधत या शहरात हिंडत होतो.  गूगल,  स्थानिक मार्गदर्शक सांगत हे काय… इथंच तर आहे? पण तरी ती जागा सापडत नव्हती. सापडली तेव्हा तो ‘अरेच्चा’ क्षण सुखावून गेला.

शहराचं सौदर्य कशाकशात असतं? चकचकीत इमारती? गुळगुळीत रस्ते? आपल्याकडे ज्याला पायाभूत सुविधा म्हणतात त्या?

हा प्रश्न अनेक शहरांना विचारता येईल. आपल्याकडे तर सगळ्याच. दगडामध्ये ग्रॅनाईट काय घुसवतात… त्याला ऑइलपेंट काय फासतात… मुख्य चौकात कोणाचा तरी पुतळा… गावाच्या वेशीवर तर बघायलाच नको… भिकार कमानी… माना टाकलेल्या दिव्यांच्या दीपमाळा आणि आता वर ‘आय लव्ह अमुकतमुक’चे फलक. शेजारी हे ज्याने कोणी बसवलंय त्या कोणा कार्यसम्राट नगरसेवक वा आमदाराचा फोटो वगैरे वगैरे. (बाकी आपल्याकडे गावोगाव इतके कार्यसम्राट असताना आपली ही अशी अवस्था का, हा प्रश्न काही कोणाला पडत नाही. असो) कुठे सौंदर्यवृत्तीच नाही.

ती सामुदायिकरीत्या कशी असते?  ते पाहायचं असेल तर प्राग हे शहर हा उत्तम नमुना. हे शहर पण नशीबवान. कारण एक तर जवळपास ११००-१२०० वर्षांचा इतिहास. राजघराणं. किल्ला वगैरे. मग रोमन साम्राज्य. त्यात चार्ल्स ब्रिज वगैरेची उभारणी. मग धर्मसंघर्ष. पहिलं महायुद्ध. ऑस्ट्रियन-हंगेरी साम्राज्याच्या पाडावानंतर झेकोस्लोवाकिया या देशाचा जन्म आणि मग राजधानीचा दर्जा. दुसरं महायुद्ध. हिटलरची घुसखोरी. कम्युनिस्टांकडून सुटका. आणि नव्वदच्या दशकात साम्यवादाच्या पाडावानंतर त्यांच्याविरोधात बंड आणि झेक प्रजासत्ताकाचा जन्म.

असा भव्य इतिहास अनेक शहरांस असू शकतो. पण प्राग नशीबवान अशासाठी की यातल्या कोणाही राजवटीनं प्रागच्या सौंदर्याला बाधा आणली नाही. शहराची हेळसांड केली नाही. त्यामुळे प्राचीन आणि आजचं प्राग एकमेकांत बिनबोभाट मिसळून गेलंय. जुना भाग नव्याइतकाच गोजिरवाणा आहे आणि नवा भाग तर जुन्याचाच सौंदर्य-विस्तार वाटावा असा. हेवा वाटतो प्राग-करांचा!

तर पायानं गोंजारायच्या या शहरात जुन्या-नव्याच्या सौंदर्य-संगमात आम्ही एक जागा शोधत हिंडत होतो. गूगल, स्थानिक मार्गदर्शक विचारलं की सांगत हे काय… इथं तर आहे? पण तरी ती जागा सापडत नव्हती. आणि सापडली तेव्हा तो ‘अरेच्चा’ क्षण सुखावून गेला. तो होता एक कॅफे. कॅफे लुव्र नावाचा. समोर दिसला… त्यातल्या त्या काहीशा अरुंद दरवाजातनं लोक सहज ये-जा करत होती. गंमत वाटली. प्रश्न पडला… यांना माहितीये का या जागेचं महत्त्व? पोटात बागबुग झाली.

मला लंडनमधले शिकतानाचे दिवस आठवले. जिथं राहत होतो तिथं समोर लंडन युनिव्हर्सिटीचं प्रवेशद्वार. आत गेलं की एक पब. एकदा मी तिथं ठरवून गेलो. काहीही ‘प्यायचं’ नव्हतं तरी. तिथल्या एका कोपर्‍यातली खुर्ची बघायची होती. लंडनमधल्या वास्तव्यात कार्ल मार्क्सची आवडती जागा ती. जवळ जाताना तिच्या धडधडलं होतं. कॅफे लुव्रत शिरताना तीच, तशीच धडधड लंडनची आठवण जागी करून गेली.

आईन्स्टाईन आणि फ्रान्झ काफ्का यांची आवडती जागा म्हणजे हा कॅफे लुव्र. प्रागमधल्या जर्मन विद्यापीठात आईन्स्टाईन शिकवायला होते. त्याच्याआधी दशकभर, म्हणजे साधारण १९०२, हे कॅफे लुव्र सुरू झालेलं. प्रागमधले अभिजन- लेखक, चित्रकार, गायक, तत्त्वज्ञ- यांचा अड्डा असायचा या कॅफेत. विद्वानांच्या शिळोप्याच्या गप्पांतनंही कॉलेजमधल्या एका पीरियडपेक्षाही अधिक काही हाताला लागतं. याच लुव्रमध्ये काफ्काचं लिखाण आणि आजूबाजूच्या मुद्द्यांवर चर्चा करता करता जर्मन फिलॉसॉफिकल सोसायटी अशी संस्थाच आकाराला आली.

मुंबईत एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात बाळशास्त्री जांभेकर, न्या. तेलंग, तर्खडकर बंधू, कधी कधी दादाभाई नवरोजी वगैरेंच्या दर रविवारच्या गप्पागप्पांतनं एक अख्खा शोषण सिद्धांत उभा राहिला. तसंच काहीसं इथं प्रागमध्ये झालं असणार. आणि या ता्त्विवक वादात आईन्स्टाईन. काय वातावरण असेल ते! त्या वेळी महिलांना कॅफेबिफेत जाणं वर्ज्य होतं. त्या आपल्या मैत्रिणींना घरी बोलवत. पुरुष वर्ग कॅफेत आणि महिला घरी. ही वाटणी या कॅफेनं मोडली. प्रागमधली स्त्रीमुक्तीची चळवळही इथंच आकाराला आली.

तर या विद्वानांत फ्रान्झ बेंटानो नावाचा एक होता. तत्त्वज्ञ. त्याच्या काही सिद्धांतांची बरीच चर्चा होत होती त्या वेळी. पण झालं असं की कॅफे लुव्रमधल्या अभिजनांतल्या मॅक्स ब्रॉड यानं आपल्या लिखाणातनं बेंटानो यांच्यावर सडकून टीका केली. त्याच्या मांडणीतले कच्चे दुवे वगैरेवर मॅक्सनं खरपूसपणे लिहिलं. खूपच वादळ उठलं ब्रॉडच्या लिखाणामुळे. बाहेर तर चर्चा झालीच. पण खळबळ उडाली ती कॅफे लुव्रमधल्या तत्त्वज्ञांच्या गटांत. अनेकांना ‘आपल्यातल्या’ एकाला ‘आपल्यातल्या’च दुसर्‍यानं उघडं पाडणं आवडलं नाही. म्हणजे कला क्षेत्रातल्या मूलभूत तत्त्वालाच तिलांजली दिली ब्रॉड यानं. ‘आपल्या’ गटातल्यांना सांभाळून घ्यायचं असतं आपण हे साधं तत्त्व तो विसरला. त्याची शिक्षा त्याला मिळाली.

तिथल्या ‘बहुमता’तल्या अभिजनांनी मॅक्स ब्रॉड याची कॅफे लुव्रमधनं हकालपट्टी करायचा निर्णय घेतला. ते कळल्यावर काफ्कानं या क्लबवर मग बहिष्कार जाहीर केला. ब्रॉड याला प्रवेश नसेल तर मग मीही कॅफे लुव्रमध्ये येणार नाही, असं त्यानं जाहीर केलं. या वादात ऑईन्स्टाईन यांनी काय भूमिका घेतली याची नोंद सापडत नाही. पण नंतर आईन्स्टाईन यांचंही इथं येणं कमी झालं असावं.

पलीकडे जुन्या प्रागच्या मुख्य चौकात एक इमारत आहे. बर्टा फँटा यांचं ते घर. त्याही ज्युईश. त्यांच्या घराच्या मुख्य बैठकीच्या खोलीत बर्टाबाई एक मंडळ चालवत. पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धाच्या मधल्या काळात हे मंडळ नियमितपणे भरत होतं. आज ही जागा ‘बर्टा फँटा इंटलेक्चुअल सलो(न)’ या नावानं ओळखली जाते. मॅक्स ब्रॉड, काफ्का आणि आईन्स्टाईन हे बर्टाबाईंच्या घरच्या मंडळाचे नियमित सदस्य. आईन्स्टाईन यांनी इथं व्हायोलीनवादन केल्याचीही नोंद आहे. म्हणजे हा बहुधा कॅफे लुव्रनंतरचा विद्वानांचा अड्डा. या तिघांतले आईन्स्टाईन सर्वांनाच माहीत. काफ्काविषयीही अनेकांना काही ना काही ओळखीचं वाटेल. पण ब्रॉडविषयी मात्र अनेकांना माहिती असण्याची शक्यता कमीच.

काफ्का आयुष्यभर विमनस्क मन:स्थितीत राहिला. आपण लिहितोय ते चांगलं नसावंच बहुधा, याची त्याला खात्री होती. त्यात आजारपण. आणखीनच नैराश्य. मग त्याला आपल्या अस्तित्वाचाच कंटाळा आला. त्याच अवस्थेत मरण दिसू लागल्यावर त्यानं लिहून ठेवलं… मी गेल्यानंतर माझं हे सगळं लिखाण जाळून टाका…!

ते ज्याच्याकडे होतं आणि ज्यानं काफ्काच्या शेवटच्या इच्छेसमोर मान तुकवली नाही; उलट काफ्काचं लिखाण प्रकाशित होईल याची व्यवस्था केली ती व्यक्ती म्हणजे मॅक्स ब्रॉड. स्वत: उत्तम लेखक, संगीतप्रेमी असलेला ब्रॉड हा काफ्काचा आधार होता. काफ्का जिवंत होता तेव्हा आणि गेल्यानंतरही. ब्रॉडसारख्यांचं असणं हे समस्त साहित्यप्रेमींसाठीही आधार देणारंच… कारण त्यानं मनावर घेतलं नसतं तर काफ्का आपल्यापर्यंत आलाच नसता.

तो प्राचीन दगडी रस्ता… कॅफे लुव्रमधलं ते जुनं आणि तरीही तसंच्या तसं ठेवलं गेलेलं क्लासी फर्निचर, त्यावरचे पांढरे शुभ्र टेबलक्लॉथ, कॉफी-केकचा दरवळ, साहेबी वातावरण… असं सगळं मिळून इतिहास तयार होतो शहराचा. असा इतिहास असेल तर तो जपायचीही संस्कृती असावी लागते.

त्यासाठी रिडेव्हलपमेंट कशाची करायची नाही, याची अक्कल लागतेच! आणि इतिहासाचं पुनर्लेखन करता येतं, त्याची रिडेव्हलपमेंट नाही होत हे सत्य आहेच! (उत्तरार्ध)

girish.kuber@expressindia.com

@girishkuber