‘चला, झाले सारे मनासारखे, मिळाली उमेदवारी. आता पुढची दहा-पंधरा वर्षे तरी घरात सत्ता राहील’ असे मनाशी म्हणत प्राजक्तदादा शयनकक्षात आले. गुलालाने माखलेले कपडे बदलल्यावर त्यांना आणखी ताजेतवाने वाटू लागले. गेली चार वर्षे सत्तेविना जीव कसा कासावीस झाला होता. पण उघडपणे बोलायची सोय नव्हती. अस्वस्थता माझी नाही तर कार्यकर्त्यांची असे जाहीर केले तेही एका दृष्टीने बरेच झाले. सत्तेचा फायदा मला नाही तर कार्यकर्त्यांना हवा हेच यातून ध्वनित झाले असे म्हणत ते पलंगावर आडवे झाले. दीर्घकाळानंतर त्यांना गाढ झोप लागली. कमळ, भगवा दुपट्टा, सत्तेच्या दालनातल्या खुर्च्या अशा वस्तू त्यांच्या मिटलेल्या डोळ्यासमोरून येत-जात असताना अचानक कार्यकर्त्यांचा एक घोळका समोर आला. त्यातला पहिला तावातावाने म्हणाला.
‘दादा, तुम्ही तुतारी सोडून कमळ हाती धरले त्यावर आमचे काहीच म्हणणे नाही. गेली चार वर्षे तुमच्या घरातल्या बंद पडलेल्या तानपुर्यातून आता पुन्हा स्वर गुंजू लागतील. आक्षेप एवढाच की कार्यकर्त्यांची इच्छा म्हणत पक्षप्रवेशाची पावती तुम्ही आमच्या नावाने का फाडली, हे छातीवर हात ठेवून सांगा. आम्ही तुम्हाला हे कधी म्हटले? सत्ता नसल्याने आमची कोंडी होते असे आमच्या तोंडून कधी निघाले का? अवघी चार वर्षे वगळली तर तुमचे घराणे गेल्या कैक वर्षांपासून सत्तेतच. तेव्हा व आताही आम्ही जिथे होतो तिथेच. तुमची प्रगती हीच आमची प्रगती असे समजून.’ मग दुसरा ज्येष्ठ म्हणाला, ‘दादा तुम्हाला शुभेच्छाच. तुम्ही जिकडे जाल तिकडे आम्ही असू, पण सत्तेचा आम्हाला काय फायदा झाला यावर कधी विचार केला का? नसेल तर आमच्याआड लपायचे कारण काय? सत्यभामा व रुक्मिणीने एकदा कृष्णाकडे आग्रह धरला.
प्राजक्ताचे झाड हवे म्हणून. चाणाक्ष कृष्णाने आक्रमक असलेल्या सत्यभामेच्या अंगणात झाड लावले व त्याची फुले रुक्मिणीच्या अंगणात पडतील अशी व्यवस्था केली. तुम्ही कधी असा चाणाक्षपणा दाखवला काय? आमच्या नशिबी ना झाड, ना फुले! सत्ता नेत्यांना मिळते, कार्यकर्त्यांना नाही. हे सत्य आम्ही कधीचेच स्वीकारलेले. मग आमच्या भरलेल्या जखमेवरची खपली कशाला काढता? आमचे काम सतरंज्या उचलण्याचे व टाळ्या वाजवण्याचे. ते आम्ही आजवर प्रामाणिकपणे करत आलो.’ मग तिसरा समोर आला. ‘तुम्ही इतकी वर्षे सत्तेत होता.
आम्हाला काय मिळाले हे तुम्हाला सांगता येईल का? नाही ना! मग उगीच आमची साक्ष कशाला? कार्यकर्त्यांना काहीच मिळत नसते. मिळते ते एकनिष्ठ असल्याचे समाधान. तानपुर्याला चार तारा. मात्र त्यातून निघणारा स्वर एकच. तो पिढ्यानपिढ्या तुमच्यासाठीच निघत राहिला. तुम्ही म्हणालात, या निर्णयामुळे आता साहेब व मामांसमोर जाण्याची हिंमत नाही. म्हणजे गोची तुमची झाली आणि दोषी आम्ही. असे बोलून त्या दोघांच्या नजरेत आमची इज्जत कशाला घालवता? तुम्ही कुठेही गेलात तरी आम्ही जिथे आहोत तिथेच राहणार.
आमच्या जगण्यात काही फरक पडत नाही. सत्ता असली वा नसली तरी. त्यामुळे किमान यापुढे तरी तुमच्या तानपुर्यावर आमचा स्वर छेडू नका.’ अचानक दादांना जाग आली. त्यांना पडलेले स्वप्न जसेच्या तसे आठवत होते. अस्वस्थ होत त्यांनी मामांना फोन केला पण त्यांनी कट केला. भाच्याने कुरघोडी केली. लवकर तिकडे पळाला म्हणून कदाचित तेही रागावले असतील असे दादाला वाटून गेले. मग सकाळपर्यंत त्यांना सुखाची झोप लागलीच नाही.
