काय दामले तुम्ही? अहो, इतकी वर्षे रंगभूमीवर काम करून विनोद आणि थट्टेतला फरक कळला नाही का तुम्हाला? म्हणे, नीटचा ‘फुलफार्म’ माहिती नसलेले तरुण आंदोलनात सहभागी झालेत. ही क्रूर थट्टा हे तुम्हाला कळत नसेल व किती मस्त विनोद केला असे वाटत असेल तर तुमच्या विनोदाचा दर्जा फारच खुळचट म्हणायला हवा. तुमची नाटके बघून खी खी हसणारे प्रेक्षक हे सहन करतील पण शिक्षण व्यवस्थेवरून सध्या आक्रमक झालेल्या तरुणांनी का म्हणून हे सहन करायचे? नाटकात विनोद ‘पाडणे’ व वृत्तवाहिन्यांच्या व्यासपीठावर तो करण्याचा प्रयत्न करणे यातला फरक कळतो का तुम्हाला! विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेले प्रश्न तुम्हाला ‘गेला माधव’मधल्या तीन बायकांकडे फिरणार्या दादल्यासारखे वाटले काय? कलावंतांनी सरकारची तळी उचलावी या धोरणाचे असाल तुम्ही खंदे समर्थक, म्हणून तळव्यापर्यंत खाली याल का? गंभीर प्रश्नावर विनोद करायला उच्चदर्जाची तयारी लागते. तुमच्यातील या तयारीच्या अभावावर न बोललेलेच बरे! अहो, तुम्हाला पद्मश्री मिळवायची असेल तर खुशाल करा सरकारची खुशामतगिरी. आमचे काही म्हणणे नाही, पण विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ कशाला चोळता?
या आंदोलनावर वाट्टेल ते बोलणे रंगमंचाच्या मागे इतरांकडून तंबाखू घेऊन चघळण्याइतके सोपे वाटले का तुम्हाला? तुमच्यापेक्षा तर त्या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी फलकांच्या माध्यमातून केलेले विनोद कितीतरी श्रेष्ठ होते हो! काय तेच तेच लेखक घेऊन बसलात, या नव्या पिढीच्या प्रतिभेचाही वापर करायला शिका जरा! ‘अरे, हाय काय अन् नाय काय’ असे नेहमीच्या पठडीतले वाक्य म्हणत हा ‘नीट’चा प्रश्न माझ्या आवाक्यातला नाही असे जरी तुम्ही म्हटले असते तरी चालले असते की! उगीच ‘पचकायची’ काय गरज होती? तुमच्या रंगमंचावरच्या विनोदाने प्रेक्षकांना आनंद (?) होतो तसा या वाक्याने सरकारलाही होईल असे वाटले का तुम्हाला? आधी ‘एका लग्नाची गोष्ट’, मग ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’. हे आंदोलन म्हणजे तेच तेच कथानक फिरवून फिरवून पैसे मिळवण्याचे साधन वाटले काय तुम्हाला?
अहो, या विद्यार्थ्यांनी उभा केलेला मंच वास्तव मांडणारा, तुमच्यासारखे फुटकळ विनोद सांगणारा नाही. आधीच आपल्याकडे विनोदी नटाला कुणी गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे असेल कदाचित, सरकारने तुमच्या पद्मश्रीच्या तुणतुण्याकडे आजवर दुर्लक्ष केले असेल. असे काही बोललो तर हेसुद्धा गांभीर्याने विचार करणारे आहेत अशी जाणीव सरकारला होईल असे वाटले काय तुम्हाला? नको तिथे कडमडायला हा माधव वाटला काय तुम्हाला? अहो, तुमची भूमिका फक्त ‘काम-ले, दाम-ले’ एवढीच ठेवा ना! नको तिथे तोंड कशाला खुपसता? उद्या हेच विद्यार्थी तुमच्यावर तुटून पडले तर ‘गेले दामले कुणीकडे’ अशी अवस्था होईल तुमची.
माझ्या नाटकातल्या विनोदावर जे हसणार नाहीत त्यांनी ते बघायला येऊ नये असे तुम्ही म्हणू शकता काय? आहे हिंमत? समजा तुम्ही ती दाखवली व अर्धे नाट्यगृह खाली झाले तर मग काय कराल? स्वत:ला तंबाखू मळत बसावे लागेल ना! तेव्हा दुसर्यांची चेष्टा करताना जरा जपून प्रशांतभौ! देशातल्या तरुणांचे दु:ख तुम्हाला समजून घेता येत नसेल तर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या भसाड्या आवाजातल्या गाण्याला अर्थ काय? नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहात तर जरा शिका थोरल्या साहेबांकडून, सार्वजनिक स्थळी कसे बोलायचे ते!
