संसदेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेचे तीन दिवस म्हणजे अँटी-क्लायमॅक्स होता. राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना एकप्रकारे आव्हान दिले होते. त्यांनी असे आव्हान अनेकदा दिलेले होते आणि अशी आव्हाने मोदींनी संसदेच्या सभागृहांमध्ये परतवून लावली होती. ‘मी एकटा सगळ्या विरोधकांना पुरून उरेन’, असे मोदी लोकसभा निवडणुकीच्या आधी लोकसभेत म्हणाले होते. राहुल गांधी मोदींना आव्हान देतात मग मोदी विरोधकांवर शाब्दिक हल्लाबोल करून त्यांच्यावर मात करतात हा अनुभव नेहमीचा. त्यामुळेच राहुल गांधींनी आता मोदींना आव्हान देऊच नये असे म्हटले जात असे. राहुल गांधी मोदींच्या हातात विनाकारण कोलीत देतात अशी चर्चा नेहमीच होत असते. पण, या वेळी राहुल गांधींचे आव्हान मोदींनी स्वीकारले नाही. एकप्रकारे मोदींनी स्वत:चा अपमान करून घेतला असे पाहायला मिळाले.

संसदेतील हे तीन दिवस म्हणजे मोदींची आत्म-दया (सेल्फ पिटी) होती. अशी नामुष्की मोदींवर पंजाबमध्ये आली होती. त्या वेळी भाजपचे कार्यकर्ते पुलावर मोदींची वाट पाहात होते, त्यांना बघून मोदी मागे फिरले आणि सांगा तुमच्या मुख्यमंत्र्यांना, मोदींचा जीव वाचला म्हणून, असे मोदी म्हणाले होते. तेव्हा पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार होते. तिथेही त्यांना कोणी तरी हल्ला करेल अशी भीती वाटली होती. वास्तविक ते कार्यकर्ते भाजपचे होते आणि ते मोदींच्या स्वागतासाठी आले होते. आताही लोकसभेत मोदींना जिवाची भीती वाटली. मोदी लोकसभेत सुरक्षित नसतील ते भारतात कुठे असणार?

माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकाला केंद्र सरकारने परवानगी दिली नाही, कारण त्यामध्ये चिनी घुसखोरीवेळी मोदी व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अमेरिकेमध्ये ९/११च्या हल्ल्यात न्यूयॉर्कमधील ट्विन-टॉवर उद्ध्वस्त केले गेले. तेव्हा तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांची केविलवाणी अवस्था झाली होती. खरे तर मोदींबाबत तितके काही झालेले नाही. पण जे योग्य वाटेल ते करा, असा मोदींचा संदेश होता. निर्णायक क्षणी देशाच्या नेतृत्वाला निर्णयच घेता येत नसेल तर काय करणार, असा हतबल करणारा सवाल जनरल नरवणे यांनी ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’मध्ये उपस्थित केला आहे. हा मजकूर राहुल गांधी लोकसभेत वाचून दाखवण्याचा प्रयत्न करत असताना राजनाथ आणि अमित शहा वगैरे मंत्र्यांनी त्यांना रोखले. त्या वेळी मोदीही लोकसभेत होते. मोदींसमोर त्यांची पाठराखण केली नाही तर काही खरे नाही हा विचार करून या वरिष्ठ मंत्र्यांनी राहुल गांधींना विरोध केला. सर्वात मोठी कोंडी तर राजनाथ यांची झाली. ते मोदीविरोधक जरूर असतील, पण त्यांच्याही विरोधात नरवणेंनी लिहिले असल्याने मोदींचे हे मंत्री लोकसभेत हतबल झाले. मग त्यांनी राहुल गांधींना बोलू दिले नाही. राहुल गांधींनी हेका न सोडल्याने मोदींचे वरिष्ठ मंत्री एक-एक पाऊल मागे जाताना दिसले. त्यांच्या आक्रमकपणाची लक्तरे लोकसभेत निघाली. त्यावर कडी म्हणजे मोदींनी आपल्याच मंत्र्यांना आणि सदस्यांना वार्‍यावर सोडले. मोदी लोकसभेत उत्तर देण्यासाठी आले असते तर कदाचित भाजपच्या सदस्यांना लढण्यासाठी बळ मिळाले असते, पण काँग्रेसच्या महिला खासदारांना दोष देऊन मोदींनी येणे टाळले. ही भाजपच्या सदस्यांसाठी धक्कादायक बाब ठरली. एरवी हेच सदस्य मोदींचा सभागृहात जयघोष करत असतात. मोदींनी लोकसभेकडे पाठ फिरवण्यापूर्वी भाजपच्या सदस्यांनी ‘मोदी-मोदी’चा जयघोष केला होता.
मोदींची लोकसभेमध्ये न येण्याची कृती ‘एनडीए’च्या घटक पक्षांतील खासदारांमध्ये चुकीचा संदेश देऊन गेली. ‘आम्ही असतो तर मोदींचे भाषण करून दाखवले असते’, ही ‘एनडीए’मधील घटक पक्षांच्या खासदारांची प्रतिक्रिया बोलकी म्हणता येईल. लोकसभेत मोदींच्या जिवाला धोका होता, असे लोकसभाध्यक्ष ओम बिर्लांनी सभागृहात म्हणणे म्हणजे केंद्र सरकारचा पराभव ठरतो. संसदेमध्ये आत्ताच्या घडीला इतकी प्रचंड सुरक्षाव्यवस्था तैनात आहे की, मोदींच्या जिवाला धोका असे म्हणणे निव्वळ हास्यास्पद आहे. सभागृहामध्ये कुठल्याही सदस्याच्या हातात काठी-लाठी, हत्यार काहीही नसते. काँग्रेसच्या महिला खासदारांनी मोठा फलक आणला होता हे खरे आणि त्या मोदींच्या आसनाभोवती गोळा झाल्या होत्या हेही खरे, पण महिला खासदारांनी मोदींचा जीव घेतला असता, असे सूचितदेखील करणे हा मूर्खपणा ठरतो. मोदी सभागृहात आले असते तर त्यांच्या सुरक्षेसाठी मार्शल आले असते. त्यांनी काँग्रेसच्या महिला खासदारांना रोखले असते. आक्रमक झालेल्या महिला खासदारांना सभागृहाबाहेर काढता आले असते. शिवाय, महिला खासदारांकडे खरेच इतकी ताकद होती की, त्यांनी मोदींचे बरे-वाईट केले असते, हा प्रश्न बिर्लांनी स्वत:ला विचाराला हवा होता. मोदी सभागृहात असते तर त्यांना भाषण करण्यापासून कोणीही रोखले नसते. मोदींना मागच्या बाकांवरून भाषण करता आले असते. मोदींच्या मंत्र्यांनीच हा पर्याय शोधून काढलेला आहे. अनेकदा विरोधक गोंधळ करतात तेव्हा मंत्री मागच्या बाकांवरून भाषण करतात. ‘रामजी’ विधेयक संमत करताना केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी हाच मार्ग काढला होता. मोदींनाही तसे करता आले असते. अशा वेळी त्यांच्याभोवती हट्टेकट्टे भाजपचे खासदार बसले असते तरी मोदी सुरक्षित राहिले असते. तिथेपर्यंत तरी काँग्रेसच्या महिला खासदारांना पोहोचता आले नसते. शिवाय, शिस्तभंगाची कारवाई तातडीने करून त्यांना सभागृहाबाहेर काढता आले असते. मग, निर्धास्तपणे मोदींना आपल्या भाषणात राहुल गांधींच्या आरोपांच्या चिंधड्या उडवता आल्या असत्या. हे मोदींनी केले नाही. त्यामुळे जनरल नरवणे चिनी घुसखोरीनंतर मोदींच्या निर्णयक्षमतेवर शंका घेत असतील तर त्यामध्ये काही चुकीचे नाही असे दिसते. जनरल नरवणेंचे मोदींबद्दलचे निरीक्षण अचूक असल्यानेच त्यांच्या पुस्तकाला केंद्र सरकारने परवानगी दिली नसावी!

राज्यसभेत मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या चर्चेला उत्तर दिले खरे, पण बूँद से गई, वो हौद से नही आती, असे म्हणतात तसा हा प्रकार होता. मोदींनी राज्यसभेत ‘मी एकटा पुरेसा आहे’, असे कितीही वेळा म्हटले तरी त्यांच्या भाषणातील आवेश कधीच निघून गेला होता. मोदींनी काँग्रेसला, पं. नेहरूंना लाखोल्या वाहिल्या. तसे ते नेहमीच करतात, त्यामुळे त्या आरोपांमध्ये काही नावीन्य नव्हते. मोदींचे समर्थक आणि भाजपचे पाठीराखे यांनाही मोदींची काँग्रेसविरोधी भाषा पाठ झाली आहे. राज्यसभेत मोदींनी राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देण्याचे धाडस केले नाही. त्यांनी ना चीनचा उल्लेख केला, ना नरवणेंच्या पुस्तकाचा. आताशा मोदींच्या भाषणांमध्ये वा केंद्रीयमंत्र्यांकडून देखील चीनचा उल्लेख होत नाही. राज्यसभेतही तो झाला नाही, हे पराभूत मनोवृत्तीचे लक्षण मानायचे काय? चीन सोडून मोदींनी नाहक आदिवासी महिला, दलित आणि शीख असे सगळे मुद्दे उपस्थित करून काँग्रेस कसा या समूहांच्या विरोधात आहे असे ठसवण्याचा प्रयत्न केला, पण हा मुद्दादेखील फारसा उचलला गेला नाही. केंद्रीय मंत्री रवनीतसिंग बिट्टू हे काँग्रेसचे नेते होते, त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. ही गद्दारी असल्याचे राहुल गांधींचे म्हणणे होते. त्याचा बिट्टू शीख असल्याशी काहीही संबंध नव्हता. शिवाय, राहुल गांधींनी राष्ट्रपतींबद्दल कोणतेही अपशब्द काढले नाहीत. ना दलित सदस्यांबद्दल कुठल्या काँग्रेसच्या सदस्यांनी टिप्पणी केली. असे विनाकारण आरोप करणे म्हणजे मोदींनी यावेळचा लोकसभेतील डाव हरल्याची कबुली होती. पं. नेहरूंबद्दल बीभत्स बोलत राहणे हा भाजपच्या सदस्यांचा पॅटर्न झालेला आहे. निशिकांत दुबेंना पं. नेहरूंवर टीका करण्याचा आदेश दिला गेला असेल. त्यामुळे ते बोलले. पण त्यांची लोकसभेतच काँग्रेसच्या महिला खासदारांनी पळता भुई थोडी कशी केली हे पत्रकार कक्षात उपस्थित तमाम पत्रकारांनी पाहिले. लोकसभेत लॉबीतूनही दुबेंना पळून जावे लागले हेही पाहिले. जनरल नरवणेंच्या पुस्तकावरून मोदी-राजनाथ यांनी विनाकारण वाद ओढवून घेतला आणि त्यात ते स्वत: पडले. त्यातून त्यांना बाहेर कसे पडावे हे कळलेच नाही. राज्यसभेतील भाषणातून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न मोदींनी जरूर केला, पण त्यातून काहीच साध्य झाले नाही. संसदेच्या आवारात राहुल गांधी मात्र जनरल नरवणेंच्या पुस्तकाची प्रत घेऊन फिरत होते, त्यातून राहुल गांधी मोदींविरोधातील आरोप अधोरेखित करत होते. हे सगळे उघडपणे सुरू असताना भाजपला फक्त हात चोळत बसण्याशिवाय काहीही करता आले नाही हेच खरे.

mahesh.sarlashkar@expressindia.com