नॉर्वे, फ्रान्स आणि मुख्य म्हणजे इंग्लंडमधले काही मंत्री/सनदी अधिकारी, खासगी कंपन्यांतले वरिष्ठ अशा अनेकांना राजीनामे द्यावे लागले वा त्यांना ते देण्यास सांगितलं गेलं. यातल्या अनेकांबाबत ईमेलपेक्षा अधिक काही पुरावा नाही हे खरं, पण तरी त्यांना शिक्षा झाली. आपल्याकडेही या एपस्टीनचा पाहुणचार स्वत: घेतलेले वा कोणासाठी तरी त्याची व्यवस्था करणारे सापडलेत. पण आहे चर्चा त्याबाबत काही?

खरं तर चार्ल्स हा काही सम्राटपदाच्या रांगेत नव्हता. हा सहाव्या जेम्सचा मुलगा. या सहाव्या जेम्सचं राज्यारोहण झालं आणि मग चार्ल्स वडिलांबरोबर राजधानीच्या शहरात आला. एकदम आयुष्य बदललं त्याचं. पण तरी चार्ल्स हा काही जेम्स यांचा थोरला मुलगा नव्हता. चार्ल्सला मोठा भाऊ होता. हेन्री फ्रेडरिक असं नाव त्याचं. सज्जन होता. आणि पुढचा राजा म्हणून लहानपणापासूनच त्याच्यावर राजमुकुटाचे संस्कार केले जात असल्यानं त्याला भावी आयुष्य तसं अंगवळणी पडू लागलं होतं.

 हेन्रीला संगीत प्रिय होतं. त्यासाठी खास एक शिक्षक नेमलेला होता. भोजनानंतर हेन्री बिलियर्ड्स खेळायचा. सकाळी टेनिस. मधल्या वेळात नृत्यासाठी एक शिक्षक यायचे. अभिजात वाङ्मयाची ओळख व्हावी म्हणून एक जण त्याला पुस्तकं वाचून दाखवायला यायचा. घोड्यावरनं रपेट वगैरे शाही हौस त्याची सहज पुरवली जायची. बघता बघता हेन्री १८ वर्षांचा झाला. लग्नाची चर्चा आणि मुली पाहाणं सुरू झालं. वेगवेगळ्या देशांतल्या राजघराण्यांतनं सोयरिकी येऊ लागल्या. लग्नाचा बार उडणार तर हा आजारी पडला. विषमज्वर. तितकी काही औषध नव्हती त्यावेळी. त्यातच त्याचं निधन झालं.

आणि मग चार्ल्सला अचानक महत्त्व आलं. इतके दिवस धाकटा होता. थोरल्याच्या मृत्युयोगानं याच्या नशिबातला राजयोग जागा झाला. आता सगळे याची बडदास्त ठेवायला लागले. पण चार्ल्स जन्मत:च उद्धट. हेन्रीसारखा मनमिळाऊ स्वभाव नव्हता त्याचा. मी म्हणेन ती पूर्व असं त्याचं वागणं. आपला जन्मच झाला आहे मुळी जगावर राज्य करण्यासाठी असं त्याला वाटायचं. त्यामुळे आकाशातला परमेश्वर सोडला तर आपण कोणालाच उत्तरदायी नाही, असा त्याचा ठाम समज. वयात आल्यावर तर जास्तच शेफारला. शेजारच्या राज्यातली एक तरुणी मनात भरली. तीही राजघराण्यातली. पण आपल्याला कोण नाही म्हणणार असा त्याचा भ्रम. गेला तिच्याकडे तिचा हात मागायला. तिनं साफ तो झिडकारला. हात दाखवून अवलक्षण करून घेतलं त्यानं. आला परत.

नंतर वडिलांच्या निधनानंतर गादीवर बसला. आता तर बघायलाच नको. अडवायला कोणीच नाही. वाटेल तसे बेफाम निर्णय घेऊ लागला. राजा झाला म्हणून काय झालं? कायद्यानुसार त्याला मनमानी करण्याचा अधिकार नव्हता. आताही नाही. पण हे काही याला पटायचं नाही. राजा असून आपल्याला कर द्यावा लागतो यावरनंही संतापायचा. साक्षात परमेश्वरानं ज्याची नियुक्ती केलीये त्याला कसा काय कोण कर आकारेल… असं विचारायचा. हे झालं उत्पन्नाचं.  त्याच्या खर्चाबाबतही असंच व्हायचं. कसला धरबंध म्हणून नाही. वाटेल तशी उधळपट्टी करायचा. लग्न झालेलं. पण बाहेरख्यालीपणात रमायचा. मद्याचं प्रेम होतंच. त्याचं व्यसनात रूपांतर कधी झालं ते कळलंच नाही. राजा म्हणजे धर्मसंस्थेचा प्रमुख. तेही त्याला पटायचं नाही. स्वत: ज्या पंथाचा होता त्याचाच आग्रह करायचा सगळ्यांवर. अन्यांची कसली फिकीर म्हणून नाही. वास्तविक धर्मसंस्था प्रभावी होती त्यावेळी. पण चार्ल्स कोणालाच भीक घालेनासा झाला. बघता बघता त्याच्या शत्रूंची संख्या वाढत गेली.

पार्लमेंटशी खटके उडू लागले होतेच. त्यांचं प्रमाण वाढलं. मी सम्राट आहे… मला अडवणारे तुम्ही कोण असं जाहीर विचारू लागला तो आपल्याच अधिकृत राज्यकर्त्यांना. प्रकरण इथेच थांबलं नाही. खासगी सैन्य तयार केलं या पठ्ठ्यानं. असं करायला मनाई होती. पण हा कोणाला ऐकतोय? लवकरच त्याच्या खासगी सैन्याचे खटके उडू लागले सरकारी सैन्याशी. चकमकी व्हायला लागल्या. चार्ल्सच्या बेजबाबदारपणाचं पाणी डोक्यावरनं वाहायला लागलं. सरकारी सैन्यानं अखेर युद्ध डागलं चार्ल्सच्या सैन्यावर. चार्ल्स पळून गेला. सरकारी सैन्यानं त्याचा पाठलाग केला. त्याला पकडलं. मुसक्या बांधून राजधानीत आणलं. त्याच्यावर खटला भरला. देशद्रोहाचे आरोप लावले गेले. रीतसर सुनावणी झाली. मधल्या मधे तुरुंगातून पळून पुन्हा एकदा सरकारला आव्हान द्यायचा प्रयत्न केला त्यानं. तोही अंगाशी आला. चार्ल्स स्वत:ला निर्दोष सिद्ध करू शकला नाही. आरोप सिद्ध झाले. त्याला शिक्षा ठोठावली गेली. देहांत प्रायश्चित्त. ‘‘पृथ्वीवरची कोणतीही ताकद मला शिक्षा करू शकत नाही’’, हे त्याचं न्यायालयातलं वक्तव्य. कोणी ऐकलं नाही.

लंडनच्या सेंट जेम्स पॅलेसमधून वेस्टमिन्स्टरमधल्या व्हाइट हॉल इथं त्याला आणलं गेलं. कडाक्याची थंडी होती. त्यानं सुरक्षारक्षकांकडे दोन जास्तीचे अंगरखे मागून घेतले. ‘‘थंडीनं कुडकुडलो तर लोकांना मी घाबरलो असं वाटू नये म्हणून’’, हे त्याचं समर्थन. सगळं लंडन लोटलं होतं आज काय होणार हे पहायला. चार्ल्सची दोन मुलंही होती. त्यांचा निरोप घेऊन तो निघाला होता. मरणवेदीवरही त्यानं भाषण ठोकलं. तितक्याच मस्तीत. परिणाम काही होणार नव्हता. शिक्षा अटळ होती. तो क्षण अखेर आला. आणि  ३० जानेवारी १६४९ या दिवशी दुपारी दोन वाजता एका घावात चार्ल्सचं शिर धडावेगळं केलं गेलं. न्यायालयात सुनावणीत उभं राहावं लागलेला… पोलिसांनी अटक केलेला आणि शिक्षा ठोठावला गेलेला चार्ल्स (पहिला) हा इंग्लंडच्या राजघराण्यातला पहिला.  त्यानंतर तब्बल ३६७ वर्षांनी १९ फेब्रुवारी २०२६ या दिवशी ब्रिटिश राजघराण्यातला दुसरा पुरुष अँड्र्यू माऊंटबॅटन विंडसर यानं तुरुंग अनुभवला. सध्या जगातल्या अनेक देशांना हलवून सोडणार्‍या जेफ्री एपस्टीन याच्या पापात प्रिन्स अँड्र्यूंचा हात असल्याचा आरोप आहे. पण ब्रिटननं सम्राट चार्ल्सच्या वेळी ३६७ वर्षांपूर्वी दाखवलेला ‘कायद्यासमोर सर्व समान’ हा बाणा २०२६ सालीही दाखवला. अँड्र्यूवर कारवाई झाली.

हा एपस्टीन अमेरिकेतला. त्या अमेरिकेवरही ब्रिटनचं राज्य होतं १७८३ पर्यंत. म्हणजे राजे चार्ल्सला झालेली शिक्षा त्याच राष्ट्रकुलाचा सदस्य असलेल्या अमेरिकेनंही पाहिली. आज त्या अमेरिकेत एपस्टीन-पापात सहभागी असलेल्या अनेकांना आपापल्या पदावरनं जावं लागलंय. कोण कोण आहेत यात? बलाढ्य हयात हॉटेल मालिकेचे थॉमस प्रिट्झकर (हे एपस्टीनसाठी हयातमध्ये जास्तीच्या बेडरूम्सची व्यवस्था करायचे), लॉस एंजेलिस ऑलिम्पिकचे कॅसे वाईझरमन, डॉ. पीटर ॲटिआ, अपोलो ग्लोबल मॅनेजमेंटचे लिऑन ब्लॅक, कोलंबिया विद्यापीठाच्या डॉ. लेट्टी मॉस सॅलेंटिज, याच विद्यापीठाचे डॉ. थॉमस मॅग्नानी, म्युझियमचे क्युरेटर डेव्हिड रॉस, व्हाइट हाउसमधले लॅरी समर्स, ‘पीबीएस’ वाहिनीच्या एलिझा न्यू या पत्रकार, एमआयटी लॅबचे जोईची इटो, गोल्डमॅन सॅकच्या मुख्य विधिज्ञ कॅथरीन रूम्लर, नामांकित वकील ब्रॅड कार्प, सरकारी वकील अलेझांड्रा कॉस्टा, झालंच तर नॉर्वे, फ्रान्स आणि मुख्य म्हणजे इंग्लंडमधले काही मंत्री/सनदी अधिकारी, खासगी कंपन्यांतले वरिष्ठ अशा अनेकांना राजीनामे द्यावे लागले वा त्यांना ते देण्यास सांगितलं गेलं. या सगळ्यांचा अपराध एकच.  एपस्टीनशी संपर्क ठेवला. त्याचे ईमेल्स सापडलेत. पण हेही खरं की त्यापेक्षा अधिक काही पुरावा नाही यातल्या अनेकांबाबत.

पण तरी त्यांना शिक्षा झाली. आपल्याकडेही या एपस्टीनचा पाहुणचार स्वत: घेतलेले वा कोणासाठी तरी त्याची व्यवस्था करणारे सापडलेत. पण आहे चर्चा त्याबाबत काही?  आपल्याला पुसून टाकायचाय त्या ‘कलोनियल हँगओव्हर’चाच भाग असणार बहुधा नैतिकताही…