ब्रिटिश राजघराण्यात काय घडतंय याकडे सार्या जगाचं लक्ष लागलेलं असतं. आज त्यांना असलेल्या खाशा दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागली असली आणि लोकशाहीत नावापुरत्या राजांना एवढं महत्त्व कशासाठी असा प्रश्न केला जात असला तरीही त्यांचा इतिहास, ऐश्वर्य, ब्रिटनमधील राज्यकर्त्यांशी असलेले संबंध, तिथले शिष्टाचार, कुटुंबांतर्गत राजकारण याविषयीचं कुतूहल आजही कमी झालेलं नाही. कुतूहल या भावनेचं एक वैशिष्ट्य असतं. एखादी गोष्ट जगासमोर येऊ नये म्हणून जेवढे अधिक प्रयत्न केले जातात, तेवढंच त्या गोष्टीविषयीचं कुतूहल वाढत जातं. बकिंगहॅम पॅलेसच्या भिंतींआड अशी अनेक रहस्य दडलेली आहेत, पण त्यातलं जगाला सर्वाधिक कुतूहल असलेलं गूढ म्हणजे प्रिन्सेस डायना. जगभरातल्या चाहत्यांसाठी धक्कादायक ठरलेल्या तिच्या अपघाती मृत्यूला यंदा ३० वर्षं होत आहेत. या पार्श्वभूमीवर तिचा लहान भाऊ अर्ल चार्ल्स स्पेंसर याचं ‘स्वॉन साँग: डायना, माय सिस्टर’ हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. या भावंडांच्या बालपणापासून तिच्या निधनापर्यंतच्या अनेक आठवणी यात मांडण्यात येणार असून पुस्तकात अर्ल काय खुलासे करणार याविषयी वाचकवर्गात उत्सुकता असणं स्वाभाविक आहे.
‘३१ ऑगस्ट १९९७ रोजी डायनाचं निधन झालं. दरवर्षी तिचा स्मृतिदिन जवळ आला की तिच्यासंदर्भातल्या माझ्या आठवणी जाणून घेण्यासाठी मुलाखतकार, माध्यमं संपर्क साधू लागतात. तिच्याविषयी अनेक मतमतांतरं आहेत आणि त्यातल्या बहुतेक मतांना वास्तवाचा आधारच नाही. पण वारंवार सांगितली गेल्यामुळे जगाला तीच खरी वाटू लागली आहेत. अशी निराधार मतं वाचताना-ऐकताना मला त्रास होतो, त्यामुळेच डायनाविषयीचे विचार आणि आठवणी लिहून काढण्याचा निर्णय मी घेतला. मला काय वाटतं हे सांगण्याचा प्रयत्न मी तिच्या अंत्यविधीच्या वेळीही केला होता. या पुस्तकाचा उद्देश माझ्या बहिणीची प्रतिमा माझ्या दृष्टिकोनातून जगापुढे मांडणं हा आहे,’ असं स्पेंसर यांनी या पुस्तकाविषयी माध्यमांना सांगितलं.
‘मला तिची सकारात्मक बाजू जगापुढे मांडायची आहे. तिच्या आयुष्यातील सुवर्णकाळ ज्यांनी पाहिलेला नाही, अशा तरुण पिढीला माझं पुस्तक वाचल्यानंतर ती नक्की कशी होती हे समजले. डायना हे चैतन्य होतं. तिचं व्यक्तिमत्त्व अद्वितीय आणि प्रभाशाली होतं, पण त्याच वेळी तिला स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाबद्दल काही शंकाही होत्या. आयुष्याचा समरसून आनंद घेणारी ती तरुणी होती. अगदी तरुण वयातच तिने जगाचा निरोप घेतला. म्हणूनच मला तिच्या वतीने बोलायचं आहे,’ असं स्पेंसर यांचं म्हणणं आहे. स्पेंसर हे पेशाने पत्रकार आणि लेखक आहेत. ‘पेंग्विन प्रकाशना’चं हे पुस्तक २२ सप्टेंबरला प्रकाशित होणार आहे.
डायनाचे अंत्यसंस्कार जगभरात लाखो चाहत्यांनी पाहिले होते. त्या वेळी स्पेंसर यांनी तिला श्रद्धांजली वाहताना म्हटलं होतं की, ‘डायना करुणा, कर्तव्यनिष्ठा आणि सौंदर्य यांचं मूर्तिमंत रूप होती. खोडकर विनोद आणि मनमोकळं हास्य हा तिच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा होता. तिच्या स्मृतींना देवत्व बहाल करण्याची काहीच गरज नाही. अशा कोणत्याही चौकटीत तिला अडकवणं हे तिच्या अस्तित्वाचा मूळ गाभाच हिरावून घेण्यासारखं ठरेल.’
डायनाविषयी आजवर अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत, चित्रपट- माहितीपट-वेबमालिकांचीही निर्मिती करण्यात आली आहे, मात्र तरीही ‘यात काही नवं मिळतं का पाहू,’ या उत्सुकतेने प्रत्येक साहित्यकृती, कलाकृती नजरेखालून घालणारा मोठा चाहतावर्ग आजही कायम आहे. खुल्या जगातून आलेल्या, कोणतीही ‘रॉयल’ पार्श्वभूमी नसलेल्या या राजकन्येच्या सौंदर्याची आणि कर्मठ राजशिष्टाचार बाजूला सारून व्यक्त होण्याच्या तिच्या वृत्तीची भुरळ अनेकांना पडली होती. त्यामुळेच राजकुमारी होण्यापूर्वीचं तिचं आयुष्य कसं होतं हे तिच्या भावाच्या शब्दांतून जाणून घेणं विशेष ठरणार आहे. बकिंगहॅम पॅलेसच्या बंदिस्त जगात तिची घुसमट झाली का, त्याकाळी राजकुमार असलेले चार्ल्स आणि त्यांच्या या पत्नीमध्ये दुरावा नेमका कधी आणि का निर्माण झाला, डायनाच्या तिच्या अपत्यांविषयीच्या भावना, त्यांच्या आणि स्वत:च्याही हक्कांसाठी तिने दिलेला लढा, तिची प्रचंड लोकप्रियता, विभक्त होणं, घटस्फोट, त्यानंतरचं आयुष्य, त्या आयुष्यातल्या व्यक्ती, तिचं सामाजिक भान, पापाराझींचा ससेमिरा आणि अनेक प्रश्न मागे सोडून झालेला तिचा करुण अंत यातील काही प्रश्नांची उत्तरं हे पुस्तक देऊ शकेल का, याबद्दल वाचकांत निश्चितच उत्सुकता असेल. अर्थातच त्यावर मतांतरही मांडली जातीलच. सध्या तरी या डायनाविषयीच्या आणखी एका नव्या पुस्तकातून काय उलगडणार आणि ते कोणत्या नव्या वादांना तोंड फोडणार याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. रॉयल्समध्ये एकट्या पडलेल्या या ‘राजहंसा’च्या आयुष्यात डोकावण्याची आणखी एक संधी चाहते, पत्रकार आणि ब्रिटिश राजघराण्याच्या अभ्यासकांना या नव्या पुस्तकाच्या निमित्ताने मिळणार आहे.
