दिवसभर प्रचार करून थकल्याने बिछान्यावर पडताक्षणी पृथ्वीराजबाबांना गाढ झोप लागली. पहाटे बंद डोळ्यांसमोर लख्ख प्रकाशझोत पडू लागला. क्षणकाळानंतर त्यातून काळा वेश धारण केलेली एक आकृती प्रकट झाली व संवाद साधू लागली. ‘मी बाबा वेंगा, माझ्या भविष्यवाणीविषयी तू वाचले असशीलच. माझ्या शरीराचे आत्म्यात रूपांतर होऊन २९ वर्षे झाली तरीही लोक मीच भविष्य वर्तवले असे आजही जगाला सांगत असतात. मग ती फुटबॉलची स्पर्धा असो, करोना वा यंदा होणारी जगबुडी. यामुळे मला मुक्तीच मिळेनाशी झाली आहे. यावर उपाय एकच- माझी विद्या हस्तांतरित करणे. त्यासाठी मी तुझी निवड केली. एक तर तुझ्या नावात बाबा आहे, दुसरे म्हणजे पृथ्वी हा शब्दही आहे, तिसरे, सध्या पराभूत असल्याने व पक्षात फारसे कुणी विचारत नसल्याने तुझ्याजवळ रिकामा वेळ आहे. चौथे तू अभ्यासू असून तंत्रज्ञान खाते सांभाळलेला नेता अशी तुझी ओळख आहे. तुझ्या भविष्य वर्तवण्यावर लोक चटकन विश्वास ठेवतील. पाचवे व महत्त्वाचे म्हणजे तुझे प्रतिपादन तर्कसंगत असते. अशी मांडणी केली की लोक सहज विश्वास ठेवतात. यामुळे मी तुझी निवड केली. आता तात्काळ हो म्हण व माझ्या आत्मामुक्तीला हातभार लाव.’
हे ऐकल्यावर बाबांच्या तोंडून अभावितपणे ‘हो’ निघून गेले, तशी ती आकृती अंतर्धान पावली. त्याबरोबर ते जागे झाले. उठून संगणक सुरू केला. वेंगाच्या भविष्यकथनाची उजळणी केली. या ज्योतिष क्षेत्रावर प्रतिगामी समजल्या जाणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व. त्यात घुसखोरी करायची असेल तर सुरुवात सॉलिड करायला हवी म्हणून ते डोके चालवू लागले. काहीच सुचेना म्हणून अस्वस्थ झालेल्या बाबांनी त्या दिवशीच्या प्रचारसभा रद्द केल्या. संगणकावर दिवसभर शोधाशोध केल्यावर सायंकाळी जेफ्री एपस्टीन या नावावर ते थबकलेच. मग भराभर त्यांनी त्याविषयीची माहिती वाचून काढली. पक्षशिस्तीच्या मर्यादेत राहून, महाराष्ट्रधर्माचे पालन करून देशात खळबळ उडवून द्यायची असेल तर लवकरच उघड होणाऱ्या एपस्टीनच्या फाइल्स हेच कथानक योग्य यावर त्यांनी शिक्कामोर्तब केले. या फाइल उघड होताच विश्वगुरू जाणार व नागपूरचा मराठी माणूस देशाचा प्रमुख होणार अशी ‘कॅचलाइन’ ठरल्यावर ते निश्चिंत झाले. नागपूर म्हटले की सध्या दुखावलेला परिवारही सुखावणार हे लक्षात येताच ते हसले.
एकीकडे भविष्यवाणी व दुसरीकडे सत्ताधाऱ्यांमध्ये भ्रम निर्माण करणे हे दोन्ही हेतू यातून सफल होतील, शिवाय या नव्या क्षेत्रात दमदार पदार्पणाचा आपला मार्गही मोकळा होईल असा विचार मनात येताच ते आनंदले. आपल्या राजकीय व्यक्तिमत्त्वाला अमेरिकेतील वास्तव्याची पार्श्वभूमी आहेच त्यामुळे लोकही विश्वास ठेवतील असे म्हणत त्यांनी मुहूर्त शोधायला सुरुवात केली. लगेच त्यांना काही डाव्या व पुरोगाम्यांनी दिलेले पुस्तक प्रकाशनाचे निमंत्रण आठवले. भविष्यकथनासाठी हेच व्यासपीठ योग्य असे ठरवत ते पिंपरी चिंचवडला निघाले. ठरल्याप्रमाणे सर्वकाही पार पडल्यावर चर्चेला पेव फुटले. समर्थन व टीकेने माध्यमे भरून राहू लागली. तेवढ्यात बाबांच्या डोक्यात विचार आला. १९ तारीख टळली तर काय? मग त्यांनी दिवसरात्र गाढ झोपून वेंगांची आळवणी केली पण ती दर्शन देईना! अखेर त्यांनी या दिवशी कृष्णेकाठच्या एखाद्या ‘सुरक्षित’ स्थळी जाऊन ध्यानसाधना करण्याचा निर्णय घेतला.
