पारशी कुटुंबात जन्मलेल्या, मुंबईच्या वातावरणात वाढलेल्या, साठ-सत्तरच्या दशकात पुरातत्त्वशास्त्राचे उच्च शिक्षण घेऊन थेट लंडनच्या ‘इ्स्टिटट्यूट ऑफ आर्किओलॉजी’मधून मेसोपोटेमिया संस्कृतीचा कसून अभ्यास करणार्या प्राध्यापक शिरीन रत्नागर या प्राचीन समाजाचे, माणसांचे व त्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सहजासहजी न दिसणारे आतले पापुद्रे पाहणार्या आणि प्रसंगी प्रस्थापित सिद्धांतांना आव्हान देणार्या होत्या. त्या केवळ शैक्षणिक वर्तुळापुरत्याच मर्यादित राहिल्या नाहीत. ‘अंडरस्टँडिंग हडप्पा: सिव्हिलायझेशन इन द ग्रेटर इंडस व्हॅली’, ‘ट्रेडिंग एन्काऊंटर्स- फ्रॉम द युफ्रेटस टू द इंडस इन ब्राँझ एज’ यांसारखे जागतिक कीर्तीचे ग्रंथ, अनेक शोधनिबंध आणि हडप्पा संस्कृतीतील स्त्री-मृण्मूर्ती आणि मातृदेवतांच्या स्थानाचा वेध घेणारा त्यांचा संशोधनग्रंथ, यांमुळेच पुरातत्त्वविश्वातील त्यांची उणीव कायम जाणवत राहील.
नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) इतिहास व पुरातत्त्वविषयक अध्यापन-संशोधनात महत्त्वाचे योगदान देणार्या आणि हडप्पा संस्कृतीला जागतिक पटलावर नवी ओळख देणार्या ही झाली त्यांची ढोबळ ओळख. पण इतिहास आणि पुरातत्त्वशास्त्राकडे केवळ कोरडी माहिती म्हणून न पाहता, प्राचीन मानवी समाजाच्या अर्थकारणातून आणि संस्कृतीतून भूतकाळ जिवंत करणार्या महान विदुषी हा त्यांचा कर्तृत्वशाली परिचय! विद्यार्थ्यांना घडवताना त्यांनी बौद्धिक प्रामाणिकपणाचे धडे दिले. प्रसिद्धीच्या झोतात राहणे किंवा उथळ लोकप्रियता मिळवणे हा त्यांचा पिंड कधीच नव्हता.
हडप्पा संस्कृतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सत्तर आणि ऐंशीच्या दशकामध्ये बदलून रत्नागर यांनी ‘सैद्धांतिक पुरातत्त्वशास्त्र’ (थिओरेटिकल आर्किऑलॉजी) ही शाखा भारतात रुजवली. तत्कालीन जगातल्या व्यापारी संघर्षांची जाणीव आपल्या लेखणीतून त्यांनी सूचकपणे मांडली. प्राचीन अवशेषांकडे केवळ सुंदर वस्तू म्हणून न पाहता, त्या वस्तूंच्या निर्मितीमागे असणारे मानवी श्रम, तंत्रज्ञानाचा विकास आणि तत्कालीन सामाजिक विषमता यांचे थेट आणि तर्कशुद्ध विश्लेषण त्यांनी जगासमोर मांडले.
एखादा वैचारिक निष्कर्ष मनात धरून इतिहास शोधण्यापेक्षा, भौतिक पुराव्यांनीच सत्याची दिशा ठरवली पाहिजे, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांच्या या वैचारिक प्रामाणिकतेमुळे आणि सडेतोड स्वभावामुळे त्यांनी अनेक प्रस्थापित मिथकांना आणि ब्रिटिशकालीन निष्कर्षांना थेट आव्हान दिले. अलीकडच्या काळात इतिहासाचे राजकीय हेतूंसाठी होणारे बाजारीकरण आणि मिथकांना इतिहास करण्याचे प्रयत्न याला रत्नागर यांनी कडवा विरोध केला. पुराव्यांच्या आधारे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून सत्य मांडता येते, असा विश्वास त्यांना होता.
अयोध्येच्या वादात त्यांनी घेतलेली तटस्थ आणि पुराव्यांवर आधारित भूमिका त्यांच्या याच शहाणिवेची साक्ष देणारी होती. एकाच विचारसरणीचा परिपोष वगैरे संकेत झुगारणारे त्यांचे संशोधन आशावाद, तर्क आणि मानवी प्रगती या सार्या अवस्थांना ओलांडून शहाणिवेकडे जाण्याचा रस्ता शोधणारे होते. प्राचीन मानवाचा संघर्ष आणि त्याचे कर्तृत्व यांच्या अंतर्भागातून वाहणारा सत्यशोधनाचा द्रव हाच जणू शिरीन रत्नागर यांच्या वैचारिक हक्कांचा जाहीरनामा होता. मातीचे थर सोसूनही जिवंत राहणार्या ऐतिहासिक सत्याचा वेध घेणार्या रत्नागर यांच्या जाण्याने, आता भारतीय इतिहास संशोधनाला आपल्या शहाणिवेची नवी घरे शोधावी लागतील.
