रॉड लेव्हरबियाँ बोर्ग, गुलेर्मो विलास, जिमी कॉनर्स, जॉन मॅकेन्रो या महान टेनिसपटूंच्या ऐन उमेदीच्या काळात विजय अमृतराज हे भारतीय नावही गाजले याचे श्रेय अमृतराज यांच्या टेनिस कोर्टवरील प्रतिभेला तर द्यावे लागेलच. पण टेनिस कोर्टवरील आणि कोर्टबाहेरील त्यांचा वावर, निवृत्तीपश्चात समालोचक, विश्लेषक आणि संवादक म्हणून त्यांनी केलेले कार्यही दखलपात्र ठरते. विविध मंचांवर ते भारताचे अघोषित प्रतिमादूत म्हणून वावरले. पाश्चिमात्यांच्या मनातील भारत व भारतीयांविषयीची साचेबद्ध प्रतिमा बदलवण्यास त्यांनी हातभार लावला. त्यांची कारकीर्द फळली, फुलली सत्तरच्या दशकात. त्या काळी क्रिकेट आणि हॉकी वगळता इतर खेळांमध्ये भारताचा आंतरराष्ट्रीय ठसा जवळपास नव्हताच. विजय अमृतराज यांनी टेनिस कोर्टवर रसिक आणि दर्दींचे, तसेच प्रतिस्पर्धी मातबरांचे लक्ष वेधून घेतले.

लहान वयात झालेल्या एका फुप्फुसविकारामुळे डॉक्टरकडून, विजयला मैदानी खेळांकडे वळवण्याचा सल्ला अमृतराज दाम्पत्याने पाळला. त्या काळी दुर्लभ अशा टेनिसकडे जाण्यास मुलांना प्रोत्साहित करण्याचे श्रेय पालकांना द्यावेच लागेल. भारतात कोणत्याही सुविधा नसताना विजय आणि त्यांचे बंधू आनंद पैसे जमवून इंग्लंडला जायचे. तिथे गुजराण करायची तर टेनिस स्पर्धा जिंकायच्या किंवा आनंद अमृतराजच्या बुद्धिबळ कौशल्यावर त्या खेळातील स्पर्धा जिंकून पैशाची तजवीज केली जायची. या कसरतींमुळे विजय अमृतराज यांच्याकडे मानसिक कणखरपणा आला. इंग्लंडमध्ये खेळल्यामुळे टेनिसमधील तंत्र घोटवता आले.

सत्तरच्या दशकात टेनिस विश्वामध्ये विजय अमृतराज यांनी अल्पावधीतच नाव कमावले. आंतरराष्ट्रीय एटीपी क्रमवारीत त्यांनी १८व्या स्थानावर मजल मारली होती. विम्बल्डन (१९७३, १९७४) आणि अमेरिकन ओपन (१९७३-१९७४) या दोन्ही वर्षी त्यांनी उपान्त्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. १५ एटीपी अजिंक्यपदे पटकावली, पण ग्रँड स्लॅम अजिंक्यपदाने मात्र सतत हुलकावणी दिली. तो काळ रॉड लेव्हर, केन रोझवाल या विख्यात टेनिसपटूंच्या अस्ताचा नि बोर्ग-कॉनर्स-विलास-मॅकेन्रो या महान चौकडीच्या उदयाचा होता.

विजय अमृतराज यांनी यांपैकी बहुतेकांना अनेकदा ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये हरवून दाखवले. सव्वासहा फूट उंची लाभलेले अमृतराज टेनिस कोर्टवर चापल्याने वावरत. त्यांच्या खेळात नजाकत होती, पण ताकदवान सर्व्हिस त्यांच्या भात्यात नव्हती. पण भारतातून (पूर्वेकडून!) आलेला हा लोभसवाणा टेनिसपटू टेनिसच्या कोर्टवर भल्याभल्यांची झोप उडवतो हा संदेश पाश्चिमात्य टेनिसविश्वात पुरेसा झिरपला. त्यातून अमृतराज यांची रसिकप्रियता वाढली नि भारताविषयी अनेक समज-गैरसमजही विरून गेले.

कारकीर्दीचा बहुतेक काळ विजय अमृतराज अमेरिकेत राहिले, पण डेव्हिस चषक ही सांघिक स्पर्धा खेळण्यासाठी ते भारतात किंवा जगात कुठेही केव्हाही तयार असायचे. १९७४ आणि १९८७ मध्ये भारताला डेव्हिस चषकाच्या अंतिम फेरीपर्यंत नेण्यात त्यांचे योगदान अमूल्य होते. विजय अमृतराज उत्तम संवादक आहेत. निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या समालोचनालाही रसिकांची आणि आजी-माजी टेनिसपटूंची दाद मिळायची.

मार्टिना नव्हरातिलोवा, बियाँ बोर्ग, बोरिस बेकर अशा अनेक टेनिसपटूंशी त्यांची घनिष्ठ मैत्री आजही आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांचा समावेश ‘टेनिस हॉल ऑफ फेम’मध्ये करण्यात आला. असा सन्मान मिळवणारे ते पहिलेच आशियाई टेनिसपटू होते. गतशतकात त्यांना पद्माश्री आणि अर्जुन पुरस्कार मिळाले होते. यंदा त्यांना पद्माभूषण देऊन सरकारने एका प्रदीर्घ कारकीर्दीला कुर्निसात केला.