‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय संच’चे सारे खंड गेल्या डिसेंबरात (२०२४) ‘लोकसत्ता’कडे अभिप्रायार्थ पाठवल्यानंतर संपादकांचा अनपेक्षित लघुसंदेश आला, मग फोनवर बोलणेही झाले, त्यात या कार्याबद्दलचा आनंद, अभिनंदन भाव होताच; पण अधिक महत्त्वाचे होते ते ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष (१९२५-२६)’च्या पूर्वसंध्येस या समग्र वाङ्मयाचे प्रकाशन! या वर्षाचे औचित्य साधत त्यांनी ‘तर्कतीर्थ-विचार’ रोज लिहाल का अशी विचारणा केली. मी पडत्या फळाची आज्ञा शिरसावंद्या मानली.
जी गोष्ट या सदर लेखनाची, तीच समग्र वाङ्मयाचीही. हे कार्य महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने करावे असे सुचवणारे एक पत्र मी करोनाच्या सुरुवातीच्या काळात लिहिले होते. सन २०१९च्या जानेवारीमध्ये जे नवे मंडळ अस्तित्वात आले, त्यात मी सदस्य होतो. मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरेंनी हे कार्य मी करावे, असे सुचवले नि मी ते निभावले.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मयाच्या संकलन, संपादन, प्रकाशनाचा हा उपक्रम शिळोप्याचा उद्योग नव्हता किंवा अनुदानाच्या हव्यासापोटी केलेली खटपट नव्हती. एका व्यासंगी विद्वानाचे संचित दुर्लक्षित राहू नये म्हणून केलेली ही धडपड होती. याचा उद्देशच मुळी तर्कतीर्थांच्या समग्र साहित्याचे नव्या पिढीचे वाचन, चिंतन, मनन, चिकित्सा, संशोधन करून नव्या भारताची उभारणी नैतिक मूल्याधिष्ठित जीवनाने करावी, अशा सुविचाराने केलेला हा प्रपंच होता.
तर्कतीर्थांचे वाङ्मय शोधणे हे मोठे जिकिरीचे कार्य होते. असे नव्हते की, हे सर्व साहित्य प्राज्ञपाठशाळा, विश्वकोश कार्यालयात तयार होते. ते घेऊन फक्त वर्गीकरण व मीमांसा करायची होती. पूर्वसुरी पंडित, हितचिंतक, नातलग, संस्था या सर्वांची क्षमा मागून मी म्हणेन की, याचे संकलन नव्हते, सूची नव्हती. सर्व एकत्र संग्रहित नव्हते. जे उपलब्ध संदर्भ होते, ते वाचायचे आणि प्रत्येक भाषण, लेख, मुलाखती, छायाचित्रे शोधायची. ती जगभर विखुरलेली होती. यातला मिळालेला प्रत्येक संदर्भ टिपून त्यांचा शोध घेतला आणि ते सारे संदर्भ मिळवले.
भारतभर तर्कतीर्थांप्रति असलेला आदर यातून स्पष्ट झाला. ‘नाम ही काफी’ की ‘खुल जा सिम सिम’ असा या शोधातील आनंद काय सांगू? हे सारे सहज मिळाले असते, तर इतका आनंद झाला नसता. महाराष्ट्र संस्कृतीत जतन साक्षरता नाही, हे या प्रकल्पाने पुनरपी लक्षात आले. महाराष्ट्रात मी अनेक वस्तुसंग्रहालये निर्माण केली. त्या वेळचा अनुभवही हाच नि असाच होता, हे खेदाने नमूद करावे लागते.
‘देर आयद, दुरुस्त आयद’ न्यायाने उशिरा का असेना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या जीवन, कार्य, विचारास या प्रयत्नांमुळे उजाळा देणे, पुनरुज्जीवित करणे शक्य झाले. समकालात जगणाऱ्या पिढीस हे संचित नवे होते. विशेषत: पहिल्यांदा समोर आलेले साहित्य नि विचार संचित. यामुळे तर्कतीर्थांचे समग्र जीवन आणि कार्यही प्रथमच समग्रत: व विविध नव्या संदर्भांसह!
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षाचे औचित्य साधून मुंबई, पुणे, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, मिरज, सातारा, कोल्हापूर, वाई येथे या समग्र वाङ्मयावर आधारित प्रकाशन समारंभ, चर्चासत्रे, व्याख्याने योजली गेली. त्यातील निबंध व लेखांचे दोन-तीन ग्रंथ आगामी वर्षात प्रसिद्ध होत आहेत. अनेक विद्यापीठांनी आपल्या संशोधन प्रकल्पार्थ विद्यार्थ्यांना तर्कतीर्थ, जीवन, कार्य, विचार आधारित विषय देऊन नवसंशोधनास, पुनर्वाचन व पुनर्मूल्यांकनास गती दिली. हे सारे प्रयत्न व पाठपुराव्यातील सातत्याने शक्य झाले. ‘साधना’ प्रकाशनची मुलाखत पुस्तिका, ‘शास्त्रीजी’ची नवी आवृत्ती, तर्कतीर्थ दिनदर्शिका हीदेखील याच वर्षाची फलश्रुती! महाराष्ट्र ज्ञानसमाज तर्कतीर्थांचे ऋण जाणून त्यांच्याप्रति कृतज्ञ असण्याची आलेली प्रचीती ही नवसंकल्पांची अनंत क्षितिजे, कवाडे उघडणारी ठरली. तर्कतीर्थांचे सचित्र, बृहद् वस्तुनिष्ठ चरित्र लवकरच वाचकांच्या हाती येईल. या सर्वांबद्दल हार्दिक कृतज्ञता!
drsklawate@gmail.com
