पानिपतच्या युद्धातील मराठ्यांच्या पराभवाची चिकित्सा अस्सल ऐतिहासिक साधनांच्या आधारे करण्याचा जो अभिनव उपक्रम वि. का. राजवाडे यांनी साधनग्रंथाच्या पहिल्या खंडाच्या त्या प्रस्तावनेच्या निमित्ताने सुरू केला होता, तो अधिक साधनांच्या अभावी प्रामाणिकपणे आवरता घेत असतानाही त्यांनी जाता जाता अबदालीबद्दल नोंदवलेला अभिप्राय त्रोटक असला, तरी महत्त्वाचा होता. त्यांनी लिहिले ‘१४ जानेवारी १७६१च्या युद्धात अबदालीने कोणते डावपेच केले, ते अस्सल पुराव्यांच्या अभावामुळे निर्देशिता येत नाहीत. परंतु अबदालीने आपण होऊन अमुक एक डावपेच केला व तो सदाशिवरावाला भोवला, असे क्वचितच उदाहरण सापडेल. अबदालीने अमुक एक डाव योजला व त्यामुळे सदाशिवराव फसला, असा प्रकार मुळीच झाला नाही. मराठ्यांच्या लष्करात दुही झाली, ती अबदालीच्या पथ्यावर पडली. त्या दुहीचा त्याने चांगला फायदा करून घेतला. मराठे आपल्यापेक्षा जोरदार आहेत, हे अबदाली जाणून होता. तेव्हा मराठे उपासमारीने अर्धमेले होऊन जाईस्तोपर्यंत त्यांच्याशी युद्ध करावयाचे नाही, हा जो ‘फेबियन’ डावपेच, तो अबदालीने चांगला उपयोजिला, यात शंका नाही.’
अबदालीच्या डावपेचांबाबत राजवाड्यांनी वापरलेले ‘फेबियन’ हे विशेषण त्यांचा इतिहासाचा, विशेषत: युद्धशास्त्राचा व्यासंग दर्शवणारे होते. हा शब्द एका रोमन सेनापतीशी जोडला गेलेला आहे. क्विंटस फेबियस मॅक्झिमस नावाच्या त्या सेनापतीने हॅनिबॉल या विख्यात योद्ध्याला हरवण्यासाठी वापरलेल्या वेळकाढू व संधिसाधू धोरणाला ‘फेबियन’ म्हटले जाते. अबदालीच्या धोरणाला अगदी चपखल बसणारे ते विशेषण राजवाड्यांनी वापरले खरे; पण ‘शत्रूच्या युक्ती (वा शक्ती)पेक्षा मराठे मोहीम हरले, ते गोविंदपंताच्या कुचराईमुळे, हा सिद्धांत मात्र सर्वत्र मान्य व्हावा, असा दिसतो’, हा त्यांचा निष्कर्ष अधोरेखित करायला त्यांनी मागेपुढे पाहिले नाही.
पराभवाची साधनांच्या आधारे चालवलेली चिकित्सा जरी राजवाड्यांनी आटोपती घेतली, तरी त्यांची प्रस्तावना मात्र तेथेच थांबली नाही. या निमित्ताने त्यांच्या अभ्यासादरम्यान लक्षात आलेल्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरचे साक्षेपी विवेचन त्यांनी पुढे चालूच ठेवले आणि काही रंजक ऐतिहासिक माहितीसुद्धा संकलित स्वरूपात वाचकांसमोर ठेवली. आज दि. १ मे आहे. आजच्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या ऐतिहासिक राजधानीविषयीची राजवाड्यांनी पुरवलेली काहीशी वेगळी माहिती जाणून घेऊया.
इतिहासाचे भूगोलाशी असणारे जवळचे नाते या ज्येष्ठ संशोधकांनी किती बारकाईने अभ्यासले होते, हे दाखवून देणारी ती नोंद अशी: ‘सतराव्या व अठराव्या शतकांत महाराष्ट्रातील लोकांच्या अंगी स्थितीपेक्षा गतीचेच विशेष प्राबल्य होते. पावसाळ्याचे चार महिने खेरीज करून बाकीचे आठ महिने मराठे पुण्याहून दाही दिशांना पसरत असत. अठराव्या शतकात मराठ्यांच्या गतीचे मुख्य केंद्र पुणे शहर होते. मुसलमानांच्या कारकीर्दीतही पुण्याचे ठिकाण मोहिमांची सुरुवात करण्यास सोयीचे समजले जात असे व त्याच्या या सोयीस्कर स्थानावरून त्यांनी त्याला ‘मोहिमाबाद’ असे अन्वर्थक नाव दिले होते. सातारा व सासवड ही स्थळे सोडून पेशव्यांनी आपले ठाणे पुण्यास दिले, त्याचेही मुख्य कारण हेच. हिंदुस्थानात, कोकणात, गुजराथेत, श्रीरंगपट्टणास व निजामाच्या राज्यात जाण्यास पुण्याच्या मैदानातून अनेक रस्ते फुटतात…’ आणि मग राजवाड्यांनी मुख्य १८ मार्गांचा व मुक्कामांचा तपशीलही जोडला. त्यातले काही निवडक येथे केवळ माहितीसाठी…
– पुणे ते नाशिक : पुणे- भांबरी- भोसरी- मोसे- चाकण- खेड- पेठ- लिंगदेव- भोगूर- गोवर्धन- त्रबिंक- नाशिक.
– पुणे ते वसई, ठाणे, पनवेल : पुणे- पुनावळे- तळेगाव- नाणे- माहू- कुसूरघाट-भिरुपुरी वैजनाथ- नसरापूर- दहिवली- बदलापूर- कल्याण- वसई- परशीत- ठाणे-तळेगाव- वडगाव- कार्ले- बोरघाट- खालापूर- चौक- पनवेल- मुंबई.
– पुणे ते रायगड : पुणे- खडकवासले- खामगाव- पाद्य्राचा घाट- येल्याची पेठ-बोचाघोळी- रायगड.
– पुणे ते श्रीरंगपट्टण : पुणे- पंढरपूर- आसंगी- कवतगी- गळतगे- बागलकोट- बदामी कुरुतकोटी- लक्ष्मेश्वर- सावनूरबंकापूर
– पुणे ते दिल्ली : पुणे- औरंगाबाद- अजंठा- बर्हाणपूर- हांडिया- सीहूर- सीरोंज- नरवर- ग्वाल्हेर- ढवळपूर- आग्रा- मथुरा- दिल्ली…
– पुणे ते नागपूर : पुणे- औरंगाबाद- दाभाडी- जाफराबाद- बाळापूर- अलजपूर- नागपूर.
– पुणे ते भागानगर : पुणे- सुपे- बारामती- तुळजापूर- कल्याण- बेदर- भालकी- उदगीर- गोवळकोंडा- भागानगर
पुण्याहून फुटणार्या मोठमोठ्या मार्गांपैकी काहींचा हा ठोकळ तपशील आहे’
