पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकार्यासह अन्य पाच अधिकार्यांच्या विरोधात कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यात कारवाई करण्यास सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) मनाई केल्याने मुख्यमंत्री मान आणि आम आदमी पार्टीला काहीसा दिलासा मिळाला आहे. पंजाबमध्ये पुढील सहा महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार असल्याने तेथील राजकीय वातावरण आधीच तापू लागले आहे. त्यातच पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने थेट पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकार्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारल्याने त्याला स्वाभाविकच राजकीय रंग आला.
बदल्यांमधील भ्रष्टाचार, सरकारी कामांच्या वाटपात गैरव्यवहार, वशिलेबाजी आदी कारणांवरून मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्यकारी अधिकार्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होताच सीबीआयने विविध ठिकाणी छापे घातले. यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या एका कार्यालयाचा (कॅम्प ऑफिस) समावेश होता. सीबीआय थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पोहोचल्याने पंजाब सरकारने लगेच गुन्हा दाखल करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
दिल्लीप्रमाणेच पंजाबमध्येही निवडणूकपूर्व तयारी म्हणून केंद्रीय यंत्रणांमार्फत मुख्यमंत्र्यांना ‘हात’ लावला जाईल, अशी ‘आप’ला वाटणारी भीती निरर्थक नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा दाखल झालेल्या अधिकार्यांवरील दंडात्मक, सक्तीच्या कारवाईस मनाई केली. पण दाखल झालेल्या गुन्ह्याला स्थगिती देण्यास नकार दिला. म्हणजेच या अधिकार्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय अटक करता येणार नसली तरी सीबीआय चौकशीत मुख्यमंत्र्यांना व ‘आप’ला अडचणीत आणण्याची खेळी खेळली जाण्याची शक्यता अधिक. वास्तविक पंजाब सरकारने दिल्ली पोलीस कायद्यानुसार सीबीआयला राज्यात चौकशीसाठी असलेली परवानगी २०२० मध्येच रद्द केली होती; परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकार्यांच्या विरोधात सीबीआयने हा गुन्हा दाखल केला.
विधानसभा निवडणुकीच्या वर्षभर आधी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्षाने पंजाबच्या शहरी तसेच ग्रामीण भागांत चांगले यश संपादन केले. यातूनच पंजाबमध्ये सत्ता कायम राखण्याचा ‘आप’ला विश्वास वाटतो. परंतु पंजाबात सरकारपुढे आव्हान मोठे आहे. राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. राज्याच्या सकल उत्पन्नाच्या तुलनेत राज्य सरकारच्या कर्जांचे प्रमाण हे ४५ टक्क्यांवर गेले. खरे तर हे प्रमाण २५ टक्क्यांच्या आत असणे अपेक्षित असते.
लोकप्रिय घोषणांची अंमलबजावणी करताना राज्यावरील कर्जाचा बोजा वाढला व आर्थिक परिस्थिती आणखी बिघडली. त्यामुळे अनेक आश्वासनांची पूर्तता ‘आप’ सरकारला करता आलेली नाही. सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. त्यातच मुख्यमंत्री कार्यालयावरच भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप व त्यातून सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याने विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले. दिल्लीत ‘आप’ची सत्ता असताना ईडीने तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह अन्य वरिष्ठ नेत्यांना चांगलेच जेरीस आणले होते.
भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांच्या निव्वळ आरोपांमुळे दिल्लीची सत्ता आम आदमी पार्टीला गमवावी लागली. या आरोपांतून केजरीवाल यांना विशेष सत्र न्यायालयाने फेब्रुवारी २०२६ मध्ये मुक्त केले, तोवर निवडणूक होऊन गेली होती. पंजाबमध्ये ‘आप’ला अडचणीत आणण्याची आयतीच संधी उच्च न्यायालयाच्या आदेशाने केंद्रातील सत्ताधारी भाजपला मिळाली. पंजाबचे मुख्यमंत्री मान निवडणुकीच्या तोंडावर अडचणीत येणे भाजपला हवेच आहे. ‘गुन्हे दाखल झालेल्या अधिकार्यांना केंद्रीय यंत्रणेकडून धमकावले जात आहे’, असा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयात पंजाब सरकारच्या वतीने करण्यात आला तो यामुळेच.
आजवर पंजाबमध्येही हिंदू नेत्यालाच प्रदेशाध्यक्षपदी प्राधान्य देणार्या भाजपने प्रथमच पक्षाची सूत्रे जाट शीख समाजाच्या नेत्याकडे सोपवली आहेत. अकाली दलाशी पुन्हा युती करण्याच्या दिशेने पावले पडत आहेत. दिल्लीत केजरीवाल व ‘आप’चे पहिल्या फळीतील अन्य नेते बदनाम झाल्याचा भाजपला फायदा झाला होता. हाच प्रयोग पंजाबमध्ये करण्याची योजना असावी. पण दिल्लीप्रमाणे पंजाबमध्ये लगेच कारवाई होणार नाही, हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने स्पष्ट झाले.
