साहित्य अकादमी पुरस्कार १९५५ पासून सुरू झाले, तेव्हापासून किमान २२ – २४ भाषांमधल्या अनेक कवींनाही आपापल्या भाषेसाठी हा पुरस्कार मिळाला आहे. पण तमिळ कवी पूविअरसु यांचे वैशिष्ट्य असे की, आधी कवितांच्या अनुवादासाठी साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार त्यांनी  मिळवला आणि मग त्यांच्या स्वरचित काव्यसंग्रहालाही या केंद्रीय पुरस्काराने गौरवले गेले. बांगलादेशचे राष्ट्रकवी मानले जाणारे, पण ज्यांनी बंगालीत रचलेली ‘नझरुल गीती’  पश्चिम बंगाल आणि बांगलादेश या दोन्हीकडील बांगला भाषाप्रेमींना प्रिय असते असे काझी नझरुल इस्लाम यांच्या काव्याचा अनुवाद पूविअरसु यांनी केला, त्यास २००७ सालचा अनुवाद पुरस्कार साहित्य अकादमीने दिला. पण त्यांचे निधन ३० जून रोजी झाल्यानंतर त्यांना आदरांजली वाहण्यात आली ती केवळ ‘दोनदा अकादमी पुरस्कार विजेते’ म्हणून नव्हे किंवा सव्यसाचीपणे कविता आणि अनुवाद करणारे म्हणूनच फक्त नव्हे, तर तमिळ कवितेत मन्वंतर घडवणार्‍या  ‘वनमबड्डि’ चळवळीचे एक संस्थापक म्हणूनसुद्धा !

 ‘वनमबड्डि’ म्हणजे मुक्तपणे गाणारा बुलबुलसारखा पक्षी. ‘वनमबड्डि’ चळवळीने कवितेच्या रचनेपेक्षा आणि गेयतेपेक्षा आशयाला महत्त्व देऊन, तमिळ काव्यात मुक्तछंद रुजवला. मराठीत १९५० च्या दशकात स्थिरावलेला मुक्तछंद तमिळमध्ये येण्यासाठी १९७०-७१ साल उजाडावे लागले. हे ‘वनमबड्डि’ चळवळीचे सर्व संस्थापक कवी कोइम्बतूरचे होते. पूविअरसु हे याच जिल्ह्यातील उदमलपेटचे. त्यांनी वयाच्या चाळिशीत अन्य पाच कवींसह तमिळ मुक्तछंदाचा पुरस्कार जाहीरपणे केला. अर्थात त्याही आधीपासून ते कविता करत होतेच आणि त्या मुक्तछंदात होत्या.  हे सारेच कवी कट्टर तमिळप्रेमी, पण त्या वेळचे तमिळवादी राजकारण त्यांना पसंत नव्हते. पूविअरसु हे तर मार्क्सवादाने प्रभावित झाले होते.  त्यामुळेच बहुधा ते बंगाली शिकले;  पण याचा लाभ तमिळ भाषेला झाला, तो नझरुल आणि गुरुदेव रविन्द्रनाथ टागोर यांच्या कवितांची भाषांतरे त्यांनी केल्यामुळे.

 त्यांचे मूळचे नाव जगन्नाथन. पण हे संस्कृत नाव टाकून त्यांनी ‘भूमीचा स्वामी’ अशा अर्थाचे पूविअरसु हे नाव स्वीकारले.  आधीच्या कवितात अन्यायाविषयीची थेट चीड दिसे,  आणीबाणी घोषित झाली असतानाच्या काळात तर या लेखणीला राजकीय धारही आली. पण नंतरच्या काळात कविता प्रगल्भ झाली आणि चीड मागे पडून चिंतनशीलता दिसू लागली.  जीवनाचा ज्याला-त्याला आपापल्या वयात निरनिराळा जाणवणारा अर्थ,  भंगुर जीवनातही माणसाचा चांगले जगण्याचा प्रयत्न… असे विषय त्यांच्या कवितेत आले. निसर्गवर्णनेही त्यांच्या कवितेत होती पण मानवी मन:स्थिती त्यांनी महत्त्वाची मानली.  डोस्टोवस्कीच्या ‘ब्रदर्स कारमाझॉव्ह’चा, तसेच हॅम्लेट, ऑथेल्लो आणि रोमिओ ॲण्ड ज्यूलिएट या शेक्सपिअरियन नाटकांचे अनुवादही कवी पूविअरसु यांनी केले होते. उमर खय्याम, खलील जिब्रान,  टागोर अशा अनुवादांनी त्यांच्या लेखणीतला कवितेचा ओलावा टिकला होता.  ‘वनमबड्डि’ चळवळ पुढे मलेशियात गेली. तिथे १९७७ मध्ये त्याच नावाचे नियतकालिक निघाले आणि त्याचा प्रभाव लगतच्या सिंगापूरमध्येच नव्हे तर श्रीलंकेतही दिसला. त्या चळवळीच्या संस्थापकांपैकी या कवीला, तमिळनाडू सरकारने शासकीय इतमामात अखेरचा निरोप दिला.