प्रा. रा. ग. जाधव मराठी साहित्य विश्वात समीक्षक म्हणून परिचित होते; पण ते ‘मराठी विश्वकोशा’चे मानवविद्या शाखा संपादक म्हणून २३ वर्षे कार्यरत होते. या काळात त्यांना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा निकट सहवास लाभला. ‘तर्कतीर्थ’, ‘शास्त्रीजी’, ‘लक्ष्मणशास्त्री’ ही त्यांची समाजप्रचलित ओळख. घरात ते ‘आबा’ होते. यांपैकी ‘शास्त्रीजी’ नाव प्रचलित केले ते मानवेंद्रनाथ रॉय यांनी. नंतर रॉयवादी गटाने ते स्वीकारले. ‘शास्त्रीजी’ शब्दात पांडित्याचा भाव आहे. या अंगाने प्रभावित होऊन रा. ग. जाधव यांनी तर्कतीर्थ मृत्यूनंतरच्या लगेचच्या दोन महिन्यांच्या काळात झपाटलेपणाने ‘शास्त्रीजी’ हे व्यक्तिचित्रात्मक चरित्र लिहिले. ते चरित्रापेक्षा भिन्न असे आंतरिक वृत्ती रेखांकित करणारे आहे. घरी लिहिण्याचे स्वास्थ्य नि सुविधा नसल्याच्या काळात पुण्यातील पेरूगेटजवळच्या भावे हायस्कूलच्या पायऱ्यांवर बसून प्रा. रा. ग. जाधव यांनी केलेले हे लेखन. यात श्रद्धांजलीपेक्षा आदरांजलीचा अधिक भाव आहे.
यातील निरीक्षण, नोंदी म्हणजे तर्कतीर्थांबद्दलच्या दीर्घ चिंतनाचे फळ होय. म्हणजे असे की, विसावे शतक मोठे विलक्षण आहे. पूर्वार्धात त्याने शास्त्रीजींना भारतीय प्रबोधनाचे सर्वोकृष्ट प्रतिनिधी म्हणून गौरविले आणि उत्तरार्धात त्या भारतीय प्रबोधनालाच संशयास्पद ठरवून शास्त्रीजींना एक साक्षीदार म्हणून उभे केले.’ शास्त्रीजींनी आंधळी परंपरा भक्ती व वेंधळी पश्चिमीपूजा यांचे धोके टाळून नव्या विचारकार्याचा वस्तुपाठ घालून दिला. तिला ‘लक्ष्मणशास्त्रीय परंपरा’ संबोधिता येते. एकप्रकारच्या गंभीर सारग्राही (इक्लेक्टिक) वृत्तीने त्यांनी सर्व विचारधारांचे सार तेवढे आत्मसात केले व त्याज्य वाटेल ते अव्हेरले. योग्यायोग्याचा साक्षेपी विवेक हे शास्त्रीजींच्या विचारकार्याचे खरे रहस्य होय. शास्त्रीजी गांधीयुगाचा आचारशुद्ध विचारवंताचा एक जागृत नमुना होता. नवीन विज्ञानमूल्ये व समाजमूल्ये यांना येथील मातीत रुजविता येण्यासाठी जी एक सांस्कृतिक संरचना (स्ट्रक्चर) हवी, तिचा अभिकल्प (डिझाइन) मांडू पाहणारा हा विद्वान होता. लोकशाही पद्धतीचे अध्यात्म (स्पिरिट) शास्त्रीजींनी आत्मसात केले होते.
शास्त्रीजींना लिहिण्यापेक्षा बोलणे अधिक प्रिय होते. ते जसे लिहीत तसेच बोलत. ओघवत्या मराठी प्रतिपादनात अधूनमधून हटकून येणारा एखादा अवघड संस्कृत शब्द, संज्ञा किंवा वाक्प्रचार त्यांच्या भाषणातही असे आणि लेखनातही; पण शास्त्रीजींची पुस्तके बोलकी नसत किंवा त्यांची बोलण्याची शैली पुस्तकी नसे. शास्त्रीमंडळींचे व्यासंगपूर्ण प्रवचन आणि पुराणिकाचे सुबोध, तत्त्वगर्भ आख्यान यांचा, आधुनिक प्रबोधनाच्या आशय व अभिव्यक्तिविषयक गरजांच्या अनुरोधाने साधलेला एक तर्कसंगत समन्वय हा त्यांच्या व्याख्यानांचा वैशिष्ट्यपूर्ण गुण होता.
‘सरकारी विद्वान’ म्हणून काही टीकाकार शास्त्रीजींकडे पाहात होते. त्याचे वास्तविक रूप विशद करीत रा. ग. जाधव यांनी या व्यक्तिचित्रात स्पष्ट केले आहे की, ‘सरकारी विद्वान’ हे आव्हान सांस्कृतिक बळावर पेलता येते, हे शास्त्रीजींनी दाखवून दिले. सांस्कृतिक दृष्टीने वादग्रस्त ठरतील असे कोणतेही प्रश्न शास्त्रीजींनी निर्माण केले नाहीत. मात्र, सांस्कृतिक दृष्टीने वादातीत कार्य सरकारी विद्वानाने कसे करीत राहावे, याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. ते ‘सरकारी विद्वान’ होते की ‘खरे पंडित’ हे त्यांनी आपल्या कार्यानेच सिद्ध केले आहे.
तरुणपिढीस शास्त्रीजी कितपत उपयुक्त? असा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करीत रा. ग. जाधव यांनी पारदर्शीपणे स्वीकार केले आहे की, वाचन, चिंतन, मनन या बाबींकडे लक्ष द्यावयास युवापिढीला उसंत नाही, आवडही नाही. आधुनिक गणित व विज्ञाने यांतील सूत्रांप्रमाणे, चिन्हांकित परिभाषेमाणे साकार होणारे ज्ञानच त्यांना ग्रहणीय वाटते. भाषेचा किमान व प्रतीकात्मक उपयोग करणारा ज्ञानाविष्कार त्यांना ग्राह्य वाटतो. सूत्रे, समीकरण आणि चिन्हे इत्यादी माध्यमांतून प्रकट होऊ शकणारे, संगणकीय ज्ञानच आज-उद्याच्या पिढीची गरज आहे. यादृष्टीने शास्त्रीजींचा त्यांना उपयोग नाही.
प्रस्तुत ‘शास्त्रीजी’ हा वैचारिक वृत्तीपट रा. ग. जाधव यांच्या निरक्षीर न्यायविवेकी लेखनशैलीचे उदाहरण होय. शास्त्रीजींची आंतरिक वृत्ती समजून घ्यायला, तद्वतच त्यांची व्यक्तिवैशिष्ट्ये रेखाटायला या ग्रंथासारखे दुसरे साधन नसणे, यांतच रा. ग. जाधवकृत हा ‘राग शास्त्रीजी’ आपले श्रेष्ठत्व सिद्ध करतो.
– डॉ. सुनीलकुमार लवटे
drsklawate@gmail.com
