खेळ कुठलाही असो, जेव्हा सर्व काही संपल्यासारखे वाटते, तिथूनच अनेकदा विजेत्याचा उदय होतो. भारताचा युवा बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने ग्रँड चेस टूर स्पर्धेतील विजेतेपदापर्यंत मारलेली मजल पाहिली, की याचा प्रत्यय येतो. या स्पर्धेच्या अंतिम लढतीत जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाविरुद्ध बुद्धिबळाच्या पारंपरिक प्रकारातील सहा गुणांची मोठी पिछाडी जलद आणि अतिजलद प्रकारात भरून काढून प्रज्ञानंदने विजेतेपदाचा मान मिळवला.

बुद्धिबळातही वेगवेगळ्या स्पर्धा बुद्धिबळपटूंच्या कौशल्याची कसोटी पाहतात. क्रिकेटमध्ये कसोटी, एकदिवसीय, टी-२० अशा वेगवेगळ्या प्रकारांत वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य लागते, तसे. त्यामुळे ‘ग्रँड चेस टूर’ स्पर्धेतील विजेतेपदही जवळपास जागतिक विजेतेपदाइतकेच मानाचे. या स्पर्धेत पारंपरिक पद्धतीबरोबरच बुद्धिबळपटूला जलद आणि अतिजलद प्रकारात स्वत:ला सिद्ध करावे लागते.

विजेतेपदासाठी या तिन्ही प्रकारांत तुम्हाला सरस कामगिरी करावी लागते. पण, येथे प्रज्ञानंदला पारंपरिक, म्हणजे पहिल्या प्रकारात तब्बल सहा गुणांच्या पिछाडीवर राहावे लागले होते. अनेकांनी कारुआनाचा विजय निश्चित मानला होता. प्रज्ञानंदच्या मनात मात्र काही वेगळेच डावपेच शिजत होते. तो मुळात जलद प्रकारात माहीर आहे. त्याने या वेळी त्या कौशल्याला आणखी धार लावली आणि त्यानंतर जे घडले, तो जागतिक बुद्धिबळाच्या इतिहासातील एक सुवर्णअध्याय ठरला.

प्रज्ञानंदने अफाट संयम आणि आक्रमकतेचा सुरेख मेळ घालून दोन्ही जलदगती सामने जिंकले आणि कारुआनाची आघाडी मोडीत काढली. अतिजलद (ब्लिट्झ) प्रकारात सुरुवातीला वेळेचे गणित साधण्यात तो चुकला खरा, पण वेळीच पटावरील नियंत्रण राखून कमालीच्या संयमाने त्याने विजेतेपदाचा मुकुट आपल्या डोक्यावर चढवला. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू.

सध्या बुद्धिबळातील जागतिक विजेतेपद भारताच्याच डी. गुकेशच्या नावावर आहे. आता पुढच्या जागतिक विजेतेपदाच्या लढतीची प्रतीक्षा असताना, या दुसर्‍या महत्त्वाच्या स्पर्धेतील भारतीय खेळाडूच्या कामगिरीने चौसष्ट घरांच्या खेळातील भारताचे वर्चस्व नव्याने जगासमोर आले. गुकेश आपले जागतिक विजेतेपद टिकविण्यासाठी उझबेकिस्तानचा युवा ग्रँडमास्टर जव्हाखिर सिंदारोव्ह याच्याशी खेळणार आहे. ही लढत याच वर्षी २२ नोव्हेंबरपासून जिनिव्हा येथे होईल.

पहिल्या जागतिक विजेतेपदानंतर गुकेशच्या कामगिरीत या वर्षी अनेक चढ-उतार झाले. पण, दुसरीकडे या संपूर्ण वर्षात प्रज्ञानंदने दाखवलेली सातत्यपूर्ण कामगिरी थक्क करणारी आहे. याच वर्षी नॉर्वे चेस स्पर्धेत जगातील अव्वल खेळाडू मॅग्नस कार्लसनला दोनदा पराभूत करण्याचा पराक्रम प्रज्ञानंदने केला. सिंकफिल्ड चषक स्पर्धेत तो उपविजेता ठरला आणि आता कारुआनाला त्याच्याच भूमीत नमवून त्याने २०२७ च्या टूरमधील आपले स्थानही निश्चित केले.

प्रज्ञानंदच्या २०२५ मधील कामगिरीच्या तुलनेत २०२६ मधील खेळात कमालीचा संयम आणि स्थिरता दिसून येते. प्रज्ञानंद आता केवळ आक्रमक खेळत नाही, तर प्रतिस्पध्र्याच्या चुकांची वाट पाहून अचूक डाव टाकण्यात पटाईत झाला आहे. एका बाजूला बुद्धीची कसोटी आणि दुसर्‍या बाजूला वेळेचे प्रचंड दडपण, अशा स्थितीत प्रज्ञानंदने पिछाडीवरून खेचून आणलेला विजय कोणत्याही क्षेत्रात संघर्ष करणार्‍या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. चेन्नईच्या गल्ल्यांमधून सुरू झालेला ‘प्रज्ञे’चा हा प्रवास आज जगाच्या पाठीवर मानाचा ठरत आहे.

प्रज्ञानंदचे हे विजेतेपद आगामी जागतिक ऑलिम्पियाड आणि कँडिडेट्स साखळी स्पर्धांसाठी भारतीय संघाला, तसेच जागतिक विजेतेपदाच्या लढतीसाठी डी. गुकेशला निश्चित प्रेरणादायी ठरेल. डी. गुकेश, अर्जुन एरिगसी आणि प्रज्ञानंद यांच्यात निकोप स्पर्धा असणे भारतीय बुद्धिबळासाठी महत्त्वाचे आहे. हा विजय केवळ प्रज्ञानंद नावाच्या २१ वर्षीय तरुणाचा नाही, तर भारतीय बुद्धिबळ क्षेत्रात आलेल्या नव्या क्रांतीचा आहे.

एके काळी जागतिक स्तरावर भारताची ओळख फक्त विश्वनाथन आनंद यांच्यापुरती मर्यादित होती. मात्र, गेल्या काही वर्षांत डी. गुकेश, अर्जुन एरिगसी, विदित गुजराती या पुरुष खेळाडूंबरोबर कोनेरु हम्पी, आर. वैशाली, दिव्या देशमुख अशी व्याप्ती वाढली आहे. गुकेशने आनंदप्रमाणे जागतिक विजेतेपद मिळविले आणि आता प्रज्ञानंदने ग्रँड चेस टूर जिंकून हे सिद्ध केले, की भारत आता एका खेळाडूवर अवलंबून नसून, तरुणांची एक संपूर्ण फळी जगावर राज्य करण्यास तयार आहे.