गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे समस्त भारतीयांच्या मनात आदराचं स्थान असलेलं व्यक्तिमत्त्व… जागतिक स्तरावरचे साहित्यिक, संगीतकार, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार आणि हळवे कवी… त्यांच्या जीवनात, साहित्यात ठळकपणे जाणवणारा स्त्रीप्रेमाचा पैलू अनेकांसाठी अभ्यासाचा, वाचनाचा, सखोल चिंतनाचा विषय… लेखक प्रसून रॉय आणि अभिनेते व रंगकर्मी जॉय सेनगुप्ता या दोन बंगाली टागोरप्रेमींना त्यांच्या आयुष्याच्या या पैलूविषयी कुतूहल न वाटते, तरच नवल. या कुतूहलातूनच ‘द बार्ड इन लव : टागोर अँड हिज टाइमलेस लेडीज’ हे अल्पचरित्रात्मक पुस्तक आकारास आलं आहे. पुस्तक केवळ टागोरांच्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांशी ओळख करून देण्यापुरतं सीमित नाही, तर ते त्या स्त्रियांनी रवींद्रनाथांचे आयुष्य आणि साहित्य घडवण्यात कळत-नकळत कसा हातभार लावला, याचेही वर्णन करते.

त्यांच्या साहित्यात असलेले निरलस भाव, मानवतावाद, निसर्गप्रेम, अध्यात्म, विश्वबंधुत्व यामागे या स्त्रियांच्या सहवासाचा मोठा वाटा आहे आणि नेमके हेच या पुस्तकातून उलगडून दाखवण्यात आले आहे. रवींद्रनाथांची वहिनी कादंबरी देवी, पत्नी मृणालिनी देवी, नलिनी, रानू अधिकारी, इंदिरा देवी, अर्जेंटिनास्थित लेखिका व्हिक्टोरिया ओकाम्पो या पुस्तकात भेटतात आणि त्यातूनच ‘द बार्ड इन लव्ह’ या शीर्षकाची प्रचीती येत राहते. पुस्तकाची भाषा केवळ गद्य मांडणी नसून त्यात काव्यात्मकतेचा स्पर्श जाणवत राहतो; जागोजागी टागोर भेटत राहतात. त्यामुळे हे पुस्तक अधिक वाचनीय होतं. अर्थात हे सारं लेखकद्वयींनी आपल्या लेखनशैलीतून साधलं आहे आणि अशा स्वरूपाच्या लेखनात त्यांचा हातखंडा असल्याचं जाणवतं.

एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजही भारतातील अनेकांचा स्त्री-पुरुष नात्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन फारसा प्रगल्भ नाही. कोणत्याही स्त्री-पुरुषातील स्नेह एका विशिष्ट नात्याच्या चौकटीत बसवल्याशिवाय समाजाला चैन पडत नाही. एकदा तसे ते बसवले, की मग त्या विशिष्ट नात्याच्या कोनातूनच आपण त्याकडे पाहात राहतो. अशी मानसिकता असलेल्या समाजाला त्या चौकटीत न बसणार्‍या भावना उलगडून दाखवणे तसे जिकिरीचेच काम. परंतु लेखकद्वयीने हे आव्हान पेलत स्त्री-पुरुषातील स्नेहाकडे पाहण्याचा स्वच्छ दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे आणि त्याला बर्‍यापैकी यश आल्याचं दिसतं. दोन व्यक्तींमधील निरागस, निखळ भाव, प्रगल्भता त्याला लाभलेला बौद्धिक-वैचारिक पाया यातून अधोरेखित होतो. कुठेही सनसनाटी नाही, ठोकळेबाज दृष्टिकोन नाही.

रवींद्रनाथांचं त्यांच्या वहिनी कादंबरी देवींशी जिव्हाळ्याचं नातं होतं. कादंबरी देवी या त्यांच्या मोठ्या भावाच्या पत्नी. त्यांच्याहून फक्त दोन वर्षांनी मोठ्या. त्यामुळे त्यांचे विचार जुळले असावेत. त्यांच्या येण्याने रवींद्रनाथांचं आयुष्य उजळून गेलं. त्यांना वहिनींच्या रूपाने एक हक्काची मैत्रीण मिळाली. अगदी छोट्या-छोट्या प्रसंगांमधून या दोघांचं नातं त्यांच्याही नकळत कसं विणलं गेलं हे त्यांच्या संवादांतून जाणवत राहतं. रवींद्रनाथांमध्ये निसर्गप्रेमाचं बीज त्यांच्या वहिनींनी कसं रुजवलं याचे दाखले मिळतात. त्या दोघांमधील संभाषणातून कादंबरी देवींची बुद्धिमत्ता, निरागसता, प्रेमभाव दिसून येतो. वहिनीच्या आत्महत्येनंतर त्यांची झालेली अवस्था त्यांच्या निखळ प्रेमबंधाची जाणीव करून देणारी आहे.

रवींद्रनाथ आणि नलिनी अर्थात अन्नपूर्णा तर्खड यांच्याविषयीचं एक प्रकरण पुस्तकात आहे. रवींद्रनाथांनीच तिला नलिनी हे नाव बहाल केलं. त्यांच्या कवितांमध्येही हे नाव येतं. नलिनी आणि रवींद्रनाथ यांच्यातला समान दुवा म्हणजे साहित्य… नलिनीची साहित्यिक जाण उत्तम होती. तिच्या कुटुंबात असलेला मोकळेपणा, त्यातून तिची झालेली जडणघडण, त्या काळीही स्त्री म्हणून तिच्या वागण्यातला मोकळेपणा वाचकाला जाणवतो. रवींद्रनाथ आणि नलिनी यांच्यातील छोटे छोटे प्रसंगही तत्कालीन स्त्री-पुुरुष नात्यांचे भेद दूर सारतात. त्यांच्यातील मोकळेपणा वाढत राहतो. या प्रकरणातून नलिनीच्या कुटुंबाचीही मानवी संबंधांकडे प्रगल्भ दृष्टीने पाहण्याची वृत्ती दिसून येते. उत्तम इंग्रजी येणारी, साहित्याची जाण असणारी, त्यावर रवींद्रनाथांशी चर्चा करणारी अशी नलिनी… वार्‍याची एक झुळूक यावी आणि आयुष्यात सुवास दरवळावा असंच या दोघांचं नातं होतं जणू… नलिनीच्या प्रगल्भ सहवासात रवींद्रनाथांना बौद्धिक समृद्धी लाभली.

रवींद्रनाथ आणि पत्नी मृणालिनी यांच्यातलं हळवं नातं उलगडत जातं ते छोट्या छोट्या प्रसंगांतून. मृणालिनी यांनी रवींद्रनाथ त्यांचं त्यांचं साहित्य आणि कुटुंब यांचा उत्तम सांभाळ केला. रवींद्रनाथांच्या सहवासात त्यांनी स्वत:त कसे अनुरूप बदल केले आणि त्यांना मोलाची भाविनक साथ दिली हे या पुस्तकातून ठळकपणे दिसून येतं.

रानू अधिकारी आणि रवींद्रनाथांच्या पत्रसंवादात त्यांच्या साहित्याविषयीची सखोल चर्चा वर्णन करण्यात आली आहे. या विश्लेषणातून रानू यांची साहित्याविषयक प्रगल्भ जाण दिसून येते. या दोघांतली साहित्य चर्चा रवींद्रनाथांना लेखक म्हणून अधिक सकस करणारी आहे. व्हिक्टोरिया ओकाम्पो यांच्या प्रेमादराने, सेवेने टागोरांना जगव्यापी मानवीप्रेमाचं दर्शन झालं. रवींद्रनाथ ओकाम्पो यांचे गुरू झाले. पुढे तिचं नामकरण त्यांनी विजया असं केलं. या स्नेहबंधाविषयी वाचताना वाचकाला विश्वबंधुत्वाची जाणीव होते.

रवींद्रनाथांच्या आयुष्यात आलेल्या या स्त्रियांच्या प्रेमळ परिसस्पर्शाने केवळ त्यांचं आयुष्यच समृद्ध झालं नाही, तर त्यांच्या साहित्यातही तो अंश झिरपत गेला आणि वाचकांनाही त्याची अनुभूती घेता आली.

द बार्ड इन लव्ह : टागोर अँड हिज टाइमलेस लेडीज
लेखक : प्रसून रॉय, जॉय सेनगुप्ता
प्रकाशक : रूपा प्रकाशन
पृष्ठे : २७९, किंमत : ३९५ रु.