‘काय गरज होती त्या निलाच्या विजयावर प्रतिक्रिया द्यायची? आपण भाजपत गेलो म्हणजे सगळ्या जगावर भाष्य करण्याचा अधिकार मिळाला असे समजण्याचे कारणच काय? आपटलो ना तोंडावर. आता स्पष्टीकरणे देत फिरावे लागतेय सर्वत्र. यांच्या भावकीत भांडणे आहेत हा संदेश सर्वदूर गेला तो वेगळाच.’ रागाने फणफणत असलेले वडील ताडताड बोलत होते व मुलगा मान खाली घालून गपगुमान ऐकत होता. ‘घराण्याचे नाव झाले म्हणून मी फक्त तिचे अभिनंदन केले. तेवढा तर अधिकार आहे ना मला.’ हे ऐकतात ते आणखी खवळले. ‘अरे, नुसते अभिनंदन करून तू थांबला थोडीच. इकडे पराभव झाला तरी तिकडे विजय झाला असे म्हणायची काय गरज होती? जणू काही तूच गेला होता तिच्या प्रचाराला. शेवटी मारला ना तिने टोला, तुमच्यासारखी पक्षबदलू नाही म्हणून. काय इज्जत राहिली आपली? त्या काँग्रेसवाल्यांनी म्हटले तर एक वेळ सहन करून घेता येईल पण आपल्याच घरातली एक मुलगी म्हणते, यासारखा दुसरा अपमान नाही.
अरे, जगात कुठे होत नाही असे राजकारण केवळ भारतात होते. त्यात टिकून राहत आपले साम्राज्य सांभाळायचे असेल तर सत्तेच्या वळचणीशिवाय पर्याय नाही. इथे ज्याच्या हाती सत्ता तोच यशस्वी. हे सूत्र राबवायचे असेल तर तत्त्वांना मुरड घालावीच लागते. स्वीडनसारख्या विकसित देशातले राजकारण तत्त्वावर चालणारे. हे ठाऊक असूनही तिच्या विजयाच्या बातमीत नाक खुपसायची गरज काय होती? तिच्या टोमण्यामुळे आपल्या घराण्यातली एक पाती अजून तत्त्वनिष्ठ आहे असा प्रचार झाला ना नाहक. यातून आपली तत्त्वहीनता उघडी पडली त्याचे काय? तिच्या प्रत्युत्तरानंतर ‘आम्ही फलक लावले काय? सत्कार घेतला काय?’ असे बोलायची गरज नव्हती. तू असाच वाद वाढवत नेला तर ती घरातला कलह आणखी चव्हाट्यावर आणेल हेही तुझ्या लक्षात आले नाही काय?’ बोलता बोलता धाप लागल्याने ते थांबले.
संधी साधून तो बोलता झाला. ‘चुकले माझे. मी नंतरची प्रतिक्रिया द्यायला नको होती. पण तिनेही मोठे मन दाखवून शुभेच्छांचा स्वीकार केला असता तर मूठ झाकली राहिली असती. शेवटी घराण्याची प्रतिष्ठा सांभाळण्याची जबाबदारी सर्वांचीच असते की!’ ऐकून ते पुन्हा चिडले. ‘अरे, ते आधीच दुखावलेले. वार करण्याची संधी कशाला सोडतील. हे साधे आकलन तुला होत नाही म्हणजे कमालच झाली. किमान आता तरी पराभवाच्या गर्तेतून बाहेर ये. जगाची चिंता सोड व मतदारसंघाकडे लक्ष दे. प्रतिक्रिया देण्याची एवढीच हौस असेल तर देशातल्या घडामोडींवर बोलत जा. आपण हाती घेतलेला हिंदुत्ववादाचा वसा कसा पुढे नेता येईल त्यावर विचार कर व पाहिजे तेवढे आक्रमक बोल. तो संग्राम बघ किती पुढे निघून गेलाय. तू आपला लंके लंकेच करत बसलायस. भविष्यात सत्तेच्या राजकारणात टिकायचे असेल तर आक्रमक धर्मवादी अशी प्रतिमा निर्माण कर. तो स्वीडन काय, इवलासा देश. करू दे तिला तिथे तत्त्वावर काम. तू निवडून आलास की तुझ्या तोंडचे काहीही खपून जाईल. हीच रीत आपल्या देशाची. आता तिचा विषय बंद.’ एवढे बोलून ते दुष्काळी दौर्यावर निघाले. नंतर सहज म्हणून त्याने समाजमाध्यम उघडले तर त्यावर एक कॉमेंट होती. ‘जे न देखे सुजय विखे, ते देखे निला विखे.’ वाचून त्याने रागारागाने फोनच बंद केला.
