‘राधामाधवविलासचंपू’ हे काव्य नक्की केव्हा निर्माण झाले, हे स्थूलमानाने अनुमानण्यास ग्रंथातच पुरावा आहे’, असे सांगून राजवाड्यांनी चार ओळींचे पद्य उद्धृत केले. ‘जगदीश विरंचिकु पुछत है कहो शिष्टि रची रखे कोन कहां। कर जेरि कही जयराम विरंच्ये तिरिलोक जहां के तहां। ससि वो रवि पूरब पश्चिम लों तुम सोय रहो सिरसिंधु महा। अरु उत्तर दछन रखन को इत साहजु है उत साहिनहां ।।१।।’

या पद्याचा अर्थ स्पष्ट करताना त्यांनी पुढे लिहिले, ‘परमेश्वर ब्रह्मदेवाला विचारतो की तू सृष्टि रचिलीस, तीत राखण कोण कोठे ठेविलेस ते सांग. तेव्हा ब्रह्मदेव सांगतो की पूर्वेस रक्षक रवि व पश्चिमेचा रक्षक चंद्र केला आहे; तसेच उत्तरदिशेचा लोकपाल शहाजहान पातशहा केला आहे व दक्षिणदेशचा रक्षक शाहजीमहाराज केले आहेत… पद्यातील शहाजहानाच्या उल्लेखावरून उघड आहे की त्याची राज्यच्युति होण्यापूर्वी म्हणजे शक १५८० पूर्वी या काव्याची रचना झाली असली पाहिजे. तसेच या पत्रात शहाजी महाराजांना दक्षिणदेशाचा लोकपाल म्हणून गौरवले आहे. हा गौरव सार्थ व्हावयाचा म्हणजे तो शक १५७५ नंतर विजापुराहून शहाजीची सुटका होऊन कर्नाटकात त्याचा अंमल ठाकठीक झाल्यानंतरच्या काळात सार्थ होणे शक्य आहे. कवीची व शहाजीमहाराजांची प्रथम भेट झाल्यापासून दोघांच्या ज्या अनेक बैठकी झाल्या व दरबार्‍यांबरोबरही ज्या मुलाखती झाल्या, त्या बैठकींत व मुलाखतींत जे जे उद्गार प्रस्तुत कवीच्या व इतर कवींच्या मुखांतून निघाले त्यांचा संग्रह करून कवीने हे काव्य गुंफिलेले आहे. हे काव्यगुंफन शक १५७५त सुरू होऊन शक १५८०च्या सुमारास संपूर्ण झाले असावे, असे विधान शंका न बाळगिता, करता येण्यासारखे दिसते’…

या पोथीचा कर्ता कोण, या स्वाभाविक प्रश्नाचे उत्तर देताना राजवाड्यांनी पुरवलेला तपशील अत्यंत रंजक व उद्बोधकही आहे. त्यांनी लिहिले, ‘कर्त्याचे नाव जयराम, आडनाव पिंड्ये, गोत्र जामदग्निवत्स. सप्तश्ृंगीसमोरच्या मार्कंड्याच्या डोंगराखाली याचे गाव होते. गावाचे नाव मात्र कवीने दिलेले नाही. आईचे नाव गंगाबा आणि बापाचे नाव गंभीरराव. मार्कंडेयपर्वतापासून अहिवंतपर्वतापर्यंत जे सात किल्ले आहेत, त्यांचे अध्यक्षत्व म्हणजे किल्लेदारी या गंभीररावाकडे होती. अहमदनगरच्या बहिरीनिजामशाहाच्या राज्याचे पुनरुज्जीवन शाहाजी आपल्या पूर्ववयात करीत असता या गंभीररावाशी त्याचा सहजच परिचय झालेला होता… नाशिकप्रांतातील हे पिंड्यांचे घराणे भोसल्यांच्या ऐकून माहितीचे, परिचयाचे असल्यामुळे, शहाजीराजांनी कर्नाटकात बेंगळूरप्रांती राज्यस्थापना केल्यावर आश्रयार्थ हा मार्कंडेयपर्वतनिवासी जयरामकवि त्या प्रांती गेला, कारण कर्नाटकातून भाट लोक रजपुतस्थानात जाण्यास परतत, त्यांच्या मुखांतून शहाजीचे औदार्य ऐकून जयरामाच्या हृदयात शहाजीराजांच्या दर्शनाची लालसा उत्पन्न झाली. नानादेशीचे लोक, शेकडो पंडित व कवि शहाजीच्या दर्शनास जातात व परिपूर्णमनोरथ होऊन स्वदेशी सुखाने आयु:क्रमण करतात अशी महाराजांची कीर्ति सर्वत्र भरतखंडभर पसरली होती. त्या कीर्तीची प्रतीती पाहण्याची उत्कंठा जयराम या सरस्वतीपुत्राच्या मनात अंकुरली’…‘जयराम एखाद्या भाषेतच रचना करणारा तुटपुंजा भाषाकोविद नव्हता, तर भरतखंडातील तब्बल बारा भाषांचा परामर्श घेणारा बहुभाषाधुरंधर होता.’

– आनंद हर्डीकर