‘लढाईची पद्धत बदलावीच लागेल’ हे प्रतिपादन त्या भाषणात होते. ही पद्धत कोणती आणि ती कशी बदलणार?
दिल्लीमध्ये विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल वगैरे काही घटक पक्षांच्या नेत्यांनी काँग्रेसच्या आणि प्रामुख्याने पक्षनेते राहुल गांधींच्या भूमिकांवर टीका केली. त्यानंतर ‘इंडिया’ आघाडीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह उभे केले गेले. ही बैठक गेल्या आठवड्यात होत असताना दिल्लीत तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी बंड केले. या बंडखोरांच्या गाठीभेटी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी झाल्याचे सांगितले गेले. त्यामुळे पश्चिम बंगालमध्येही शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीची पुनरावृत्ती होत असल्याचे दिसले. त्यातच पुन्हा शिवसेना ठाकरे गटातील खासदारांबाबत ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चा होऊ लागल्या.
भाजप आणि द्रमुक यांच्यातील संभाव्य सामंजस्यावरही बोलले जाऊ लागले. या सगळ्यातून चित्र असे निर्माण केले गेले की, आता विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीला काही अर्थ उरलेला नाही. अशी काही आघाडीच उरलेली नाही, भाजपला विरोध करणार्या राजकीय गटांचे अस्तित्व नगण्य झालेले आहे… या प्रकारच्या चर्चा घडवून आणणे भाजपला अत्यंत उपयुक्त असते; त्यामुळे प्रसारमाध्यमांमधून त्या घडवल्या जातात. अशा घडवलेल्या चर्चांमध्ये राहुल गांधी ‘इंडिया’ आघाडीतील भाषणात काय म्हणाले, त्यांनी विरोधकांसाठी आगामी काळासाठी कोणता रोडमॅप दिला याची माहिती दिली जात नाही. त्याबद्दल कोणी बोलत नाही. म्हणून असेल कदाचित, शनिवारी रात्री राहुल गांधींनी इंडिया आघाडीच्या बैठकीतील साडेनऊ मिनिटांचे भाषण सार्वजनिक केले. त्यातून विरोधकांना एकत्र येण्यासाठी आणि भाजपविरोधात लढण्यासाठी काय करता येऊ शकते हे समजू शकते. त्या भाषणाचा अर्थ समजून घेतला तर विरोधी पक्षांच्या फुटीला, वेगवेगळ्या ‘ऑपरेशन्स’ना काहीही अर्थ उरलेला नाही, हेही कळते. अशा सगळ्या फुटींवर प्रसारमाध्यमांनी चर्चा करावी, विरोधी पक्षांनी मात्र त्यापलीकडे जाऊन प्रतिकाराच्या चळवळीची बांधणी करावी, असा संदेश मिळू शकतो.
काँग्रेसने नेतृत्व करायचे आणि इतरांनी ते स्वीकारायचे, ही वर्चस्ववादी भूमिका चालणार नाही असे ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांचे म्हणणे असते. पण, समाजवादी पक्ष वगळता कोणत्या घटक पक्षाची ताकद त्याच्या राज्यामध्ये खरोखरच उरली आहे, हा प्रश्न विचारता येऊ शकतो. पण या वादात न पडता राहुल गांधींनी व्यापक विरोधाची, त्यासाठी आवश्यक बांधणीची मांडणी भाषणातून केली आहे. ‘माझ्यावर किंवा काँग्रेस पक्षावर जी काही टीका करायची असेल, ती आम्ही स्वीकारू… मला तुमच्याशी लढण्यात काहीही रस नाही. कारण तुम्ही आमचे मित्रपक्ष आहात’, असे राहुल गांधींनी स्पष्ट केलेले आहे. हे पाहिले तर काँग्रेसने वर्चस्ववादी भूमिकेपेक्षा सामंजस्याची भूमिका घेतल्याचे दिसते. ‘आपले आपापसांत मतभेद असू शकतात, पण जर तुम्ही मला केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांना जाऊन मिठी मारायला सांगत असाल, तर मी तसे करू शकत नाही. कारण त्यांच्याशी माझा राजकीय संघर्ष सुरू आहे. त्यामुळे आपण लवचीक राहिले पाहिजे आणि हे समजून घेतले पाहिजे की, विरोधी पक्ष कमकुवत आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न होत आहे. मला असे जाणवते की आपल्या चर्चांमध्ये अनेकदा निराशेची छटा असते. लोकांना वाटते: आपण भाजपचा पराभव कसा करणार? पण मी तुम्हाला सांगतो, आपण एकजुटीने उभे राहिलो आणि भाजपचा सामना केला, तर त्यांना हरवणे सोपे आहे’, असे राहुल गांधींचे म्हणणे होते. त्यातून ‘इंडिया’ आघाडी अजूनही महत्त्वाची असून त्यामध्ये काँग्रेसचे आणि इतरांचेही स्थान काय असेल हेही स्पष्ट होते.
लोक मोदी सरकारला मते देत असतील; पण ते या सरकारवर नाराज नाहीत असे नव्हे. नीट परीक्षेतील घोळ, भ्रष्टाचार, भाजपचा संधिसाधूपणा, धर्माच्या आधारे होणारी हिंसा, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची होणारी छी-थू अशा अनेक कारणांमुळे मोदी सरकारविरोधात नाराजी वाढू लागली आहे. देशातील ३५-३७ टक्के मतदार भाजप आघाडीला मते देतात, उर्वरित विरोधात आहेत, हे पाहिले तर विरोधकांना लढता येऊ शकते हे दिसते. पण ‘निवडणुकीच्या लढाईत समान संधी मिळेल अशी भाबडी आशा करण्यात अर्थ नाही… विरोधकांना लढाईची पद्धत बदलावी लागेल’ असे राहुल गांधींचे म्हणणे होते. ‘तुम्ही म्हणजे सप, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आदींना वाटत असेल की, आतापर्यंत वापरलेली राजकीय साधने पुढेही उपयोगी पडतील तर तसे होणार नाही. कारण लढण्यासाठी आत्ता समान संधी अस्तित्वात नाही. भाजपचे राजसत्तेच्या संस्थांवर, न्यायव्यवस्थेवर, नोकरशाहीवर, गुप्तचर संस्थांवर, अगदी निवडणूक आयोगावरही नियंत्रण आहे… तृणमूल काँग्रेसमधील माझ्या मित्रांना खात्री होती की ते निवडणुकीत प्रचंड विजय मिळवतील. पण, मी त्यांना सतत सांगत होतो की, तुम्ही स्वप्नवत जगात वावरत आहात… मी पाहिले आहे की काय घडते. मी ते गुजरातमध्ये, मध्य प्रदेशात, छत्तीसगडमध्ये, हरियाणा आणि महाराष्ट्रातही पाहिले आहे. आणि तरीही तुमच्यापैकी अनेकांना अजूनही याची खात्री पटलेली नाही… मी तुम्हाला सांगतो की नजीकच्या काळात, जी काही थोडीफार साधने किंवा यंत्रणा अजूनही काम करत आहेत, तीही काम करणे थांबवतील. कारण भाजप व संघ देशाच्या राजसत्तेवर पकड अधिक घट्ट करत आहेत!… हेही समजून घ्या की, समाजमाध्यमांवर आपली उपस्थिती निर्माण करण्यासाठी अनेक वर्षे लागतात. माझे एक कोटी यूट्यूब फॉलोअर्स आहेत, पण माझे खाते पूर्णपणे दाबून टाकले गेले आहे. जर तुम्हाला असे वाटत असेल की समाजमाध्यमे निष्पक्ष आहेत आणि विरोधी पक्षाला त्यांचा पाठिंबा मिळत आहे, तर तुम्ही वेगळ्याच वास्तवात जगत आहात. संपूर्ण यंत्रणा; प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे, न्यायव्यवस्था, नोकरशाही, गुप्तचर संस्था, या सरकारला सत्तेत टिकवून ठेवण्यासाठीच काम करत आहेत’!
रस्त्यावरचा ‘प्रतिकार’
भाजपविरोधात लढायचे असेल तर रस्त्यावर उतरून लढावे लागेल असा संदेश राहुल गांधींनी दिलेला आहे. ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांना आमदार-खासदार फुटण्याची तमा न बाळगता पुढील तीन वर्षांसाठीच नव्हे तर बराच काळ लढत राहावे लागेल. ‘समस्या अशी आहे की, जिंकण्यासाठी तुम्हाला मुक्त आणि निष्पक्ष निवडणूकच मिळणार नाही. म्हणूनच आपल्याला ‘प्रतिकारा’च्या भूमिकेत जावे लागेल. ‘सीबीएसई’, ‘नीट’ विरोधातील लढा हा प्रतिकार आहे. ग्रेट निकोबारमधील प्रकल्पाचा विरोध हा प्रतिकार आहे. ‘भारत जोडो यात्रा’ हा प्रतिकार आहे. तुम्ही केलेला प्रतिकारच यशस्वी ठरेल. संघर्ष यशस्वी होतो. त्यासाठी तुम्हाला राजकीय रचनेची, नोकरशाहीची, गुप्तचर संस्थांची गरज नसते. तुम्हाला गरज असते ती संघर्षाच्या कृतीची. म्हणजेच, मी विरोध करेन… आपल्याला ते आवडो वा न आवडो, आपल्याला याच दिशेने जावे लागेल. आपली मानसिकता बदलावी लागेल. आता आपली मानसिकता अशी असायला हवी की, आपण एकमेकांशी लढणार नाही. आपण प्रसारमाध्यमांना आपल्यावर टीका करण्याची संधी देणार नाही. आपण प्रतिकार करू… इराणमध्ये जे घडले, त्यानंतर होणार्या परिणामांवर कोणाचेही नियंत्रण नसेल. त्यातूनच आपल्याला जनतेला संघटित करण्याची संधी मिळेल. आपण समन्वयाने काम करत नाही किंवा एकत्र कृती करत नाही, हा समजही मनातून काढून टाका. मला शंभर टक्के खात्री आहे, मी आत्ताच द्रमुकबद्दल खात्री देऊ शकतो की, जेव्हा ‘भारताच्या मूळ संकल्पनेचे’ रक्षण करण्याची वेळ येईल, तेव्हा सर्व जण एकत्र असतील…’, या विधानांमधून राहुल गांधींनी घटक पक्षांना आवाहन केलेले आहे, संघर्षाची दिशाही दिलेली आहे. आगामी काळात काँग्रेस काय करेल याचीही दिशा राहुल गांधींनी दिली असे म्हणता येईल. ‘इतर सर्व राजकीय पक्षांप् ा्रमाणे, भारतीय राजसत्तेची साधनसामग्री आणि संरक्षण वापरून काँग्रेस पक्ष उभा राहिलेला नाही. काँग्रेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीच्या विरोधात आहे. भाजप वा संघाबरोबर उभे राहण्यापेक्षा वा त्यांच्याशी तडजोड करण्यापेक्षा आम्ही मरण पत्करू असे म्हणणारे लाखो काँग्रेस कार्यकर्ते आहेत. आम्ही संघासमोर झुकणार नाही. काँग्रेस पक्ष हा संघर्ष करणारा पक्ष आहे, त्याला राजसत्तेच्या किंवा सरकारी यंत्रणेच्या तटस्थतेची गरज नाही. उलट, राजसत्तेच्या संस्थांचा जितका अधिक गळा आवळला जाईल, तितक्याच आक्रमकपणे काँग्रेस पक्ष संविधानाच्या रक्षणासाठी लढा देईल’, असे राहुल गांधींचे ठाम मत आहे. प्रश्न इतकाच आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना ठाकरे गट, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल किंवा द्रमुकही खरोखर रस्त्यावर उतरून भाजपविरोधात संघर्ष करण्यास तयार आहेत का आणि त्यांची तेवढी ताकद आहे का? पण हा प्रश्न घटक पक्षांनी सोडवायचा आहे, असे राहुल गांधींचे भाषण सूचित करते.
इथे राहुल गांधींच्या भाषणातील मुद्दे सविस्तरपणे मांडण्याचे कारण म्हणजे ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत मतभेद झाले असले तरी, विरोधकांना पुढे जाण्यासाठी मार्ग मिळालेला आहे असे दिसते. निवडणुकीच्या राजकारणापायी राज्या-राज्यांत विरोधकांमध्ये विसंगतीही दिसेल पण, त्यातून समन्वयाचा धागा तुटू नये यासाठी विरोधकांना जाणीवपूर्वक काम करावे लागेल. खरेतर आता जाणारे निघून गेलेले आहेत. नितीशकुमार यांची ‘इंडिया’ आघाडीला गरज नाही. ज्या प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडली वा आणखी पडेल ती तशी पडली तरी मूळ भाजपविरोधी प्रादेशिक पक्ष उरतात, ते काँग्रेसच्या विचारांना पाठिंबा देणारे वा पूरक असू शकतात. राष्ट्रवादीमध्ये वा तृणमूलमध्ये काँग्रेस आहे. हे पक्ष काँग्रेस विचारांचेच आहेत. ज्यांना तडजोड करायची होती ते गेलेले आहेत, आणखीही जाऊ शकतील. नंतर उरलेल्यांना रस्त्यावर संघर्ष करावा लागेल. त्यासाठी ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांनी तयारी ठेवावी असे राहुल गांधी सांगत आहेत. एक प्रकारे कॉक्रोच जनता पार्टी वगैरे काही भाजपच्या ‘बफर जागां’नाही उत्तर असू शकते. राज्यसत्ता, त्यांच्या संस्था विरोधकांसाठी समान संधी देत नाहीत तर त्याची अपेक्षाही न बाळगता भाजपविरोधात काम करावे लागेल. ते कसे करायचे हे समजून घेण्यासाठी राहुल गांधींचे भाषण महत्त्वाचे असू शकते. त्याचा उपयोग कसा करायचा हे विरोधकांवर अवलंबून असेल.
