एल. के. कुलकर्णी

भारतीयांसाठी मान्सून आणि पर्जन्य हा केवळ हवामानाचा एक आविष्कार नाही. तर आपल्या दैनंदिन व दीर्घकालीन सुखदु:खाशी त्याचे नाते आहे.

जगात सर्वत्र हिवाळा आणि उन्हाळा हे दोन ऋतू असतात. आपल्याकडे मात्र पावसाळा हा एक जास्तीचा ऋतू असतो आणि ८० टक्के पाऊस या चार महिन्यांत पडतो. आपली शेती ही मुख्यत: त्यावरच अवलंबून असल्याने पावसाळा हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय. रामायणापासून ते कालिदासाच्या मेघदूतापर्यंत असंख्य ठिकाणी पावसाच्या आगमनाच्या अप्रतिम काव्यमय नोंदी आढळतात. पण त्यातही कालौघात बदल होत गेले. वाल्मीकी रामायणात वर्षा, हेमंत, इ. ऋतूंच्या वर्णनाचे स्वतंत्र सर्ग आहेत. यावरून रामायण रचनाकाळी वसंत, ग्रीष्म, इ. सहा ऋतू प्रचलित होते. श्रावण आणि भाद्रपद हे दोन महिने वर्षा ऋतूचे. पुढे चौथ्या-पाचव्या शतकात कालिदासाने मेघदूतात ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या प्रसिद्ध श्लोकातून आषाढाचे महत्त्व अधोरेखित केले. अर्थात त्यापूर्वी दोन महिने मानला जाणारा पावसाळा कालिदासाच्या काळात तीन महिने – आषाढ, श्रावण, भाद्रपद – असल्याचीच ही नोंद आहे. पुढे अधिक व्यापक व अचूक निरीक्षणे होऊन आषाढाच्या पहिल्या दिवसाची जागा मृग नक्षत्राने घेतली. पहिल्या पावसाच्या स्वागताचा सन्मान मृगशीर्ष नक्षत्राला मिळाला आणि लोक आतुरतेने त्याची वाट पाहू लागले. मृग आणि पावसाळा यांची सांगड नेमकी केव्हा घातली गेली हे ज्ञात नाही. पण विशेषत: महाराष्ट्र, तेलंगण, इ.पुरती तरी ती भौगोलिकदृष्ट्या अचूक आहे. सूर्य एका वर्षात अश्विनी, भरणी, इ. २७ नक्षत्रांतून एक फेरी पूर्ण करताना दिसतो. म्हणजे तो एका नक्षत्रात सुमारे साडेतेरा दिवस असतो. प्रत्येक नक्षत्रात सूर्याच्या प्रवेशाचा दिवस निश्चित असतो. उदा. २५ मे रोजी तो रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो. मृग नक्षत्र सामान्यत: ज्येष्ठ महिन्यात लागते. म्हणजे मृगाला महत्त्व आले, तेव्हा पावसाळा चार महिन्यांचा (ज्येष्ठ, आषाढ, श्रावण व भाद्रपद) असतो हे आता सर्वज्ञात झाले होते.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : ‘काफला’ ते भस्म

भारतातील पावसाळा हा र्नैऋत्य मान्सून वाऱ्यांचा आविष्कार आहे. पण आपल्याला हजारो वर्षे या वाऱ्यांबद्दल माहिती नव्हती. इसवी सनाच्या पहिल्या शतकात हिप्पालस नावाच्या ग्रीक व्यापारी व नाविकाने या वाऱ्यांचा शोध लावला. पुढे हजारहून अधिक वर्षे उलटल्यावर १५व्या शतकात व त्यानंतर अरब व्यापाऱ्यांनी त्यांची दिशा वगैरेंच्या नोंदी केल्या. पण खुद्द भारतीय उपखंडाच्या आत मान्सून कुठे व केव्हा पोहोचतो, हे कळण्यासाठी १९ वे शतक उजाडावे लागले. १८७५ मध्ये भारतीय हवामान खात्याची स्थापना झाली. त्यानंतर भारतभर हवामान केंद्रांचे जाळे उभारले गेले. या केंद्रावरील वर्षानुवर्षाच्या नोंदींच्या संकलनातून पूर्ण भारताच्या हवामानाचे व पर्जन्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले. तोपर्यंत भारताचे नकाशेही तयार होऊ लागले होते. त्यात हवामान नोंदवले जाऊ लागले. या सर्व प्रयत्नांतून भारतात मान्सूनची रहस्ये उलगडत गेली.

सोबतच्या नकाशात भारतीय उपखंडात र्नैऋत्य मान्सून कुठे व केव्हा पोहोचतो याचे वेळापत्रक दिले आहे. त्यावरून स्पष्ट होते की, भारतात र्नैऋत्य मान्सून वाऱ्यांचे आगमन जूनच्या सुरुवातीला होते. त्यांची एक शाखा अरबी समुद्रावरून तर एक शाखा बंगालच्या उपसागरावरून भारतात प्रवेश करते. त्यानंतर दोन ते तीन आठवड्यांत हे वारे भारतात सर्वत्र पोहोचतात. या नकाशानुसार मे महिन्याच्या शेवटी मान्सून वारे अंदमानात पोहोचतात. जूनच्या अगदी सुरुवातीला १-२ तारखेच्या सुमारास मान्सूनचे केरळात आगमन होते. यानंतर क्रमाने उत्तरेकडे वाटचाल करीत ते जूनच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरीस (६ ते १० जूनच्या दरम्यान) आंध्र, तेलंगणा व महाराष्ट्रात पोहोचतात. त्याच सुमारास सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतो. शेकडो वर्षांच्या निरीक्षणातून लोकांच्या हे लक्षात आले, की सूर्य जेव्हा मृग नक्षत्रात प्रवेश करतो, सामान्यत: त्याच सुमारास आपल्याकडे पावसाचे आगमन होते. यातूनच मृग नक्षत्र व पावसाचे आगमन याची सांगड घातली गेली. पुढे आपल्याकडे व्यवहारात ग्रेगेरियन कॅलेंडर रूढ झाले. या कॅलेंडरनुसार मृग नक्षत्र ७ किंवा ८ तारखेस लागते. त्यावरून मग ७ जून, मृग नक्षत्र व मान्सूनचे आगमन यांची सांगड घातली गेली. हे निरीक्षण सरासरी बरोबर असल्याने ही सांगड जनमानसात दृढ झाली.

पण याबाबत काही समजही प्रचलित आहेत. बऱ्याच लोकांचा असा समज आहे की मृग लागतो त्या दिवशी, म्हणजे ७ जूनला थोडा तरी पाऊस पडतोच. पण हा समज पूर्णत: बरोबर नाही. कारण सोबत दिलेले वेळापत्रक स्थूल मानाने बरोबर असले, तरी ते दरवर्षी एवढे अचूकपणे पाळले जाणे अशक्य आहे. कारण मान्सून वारे दक्षिण गोलार्धातून मकरवृत्तावरून येतात. ते हजारो किलोमीटरचा प्रवास समुद्रावरून करतात. त्यामुळेच ते भरपूर बाष्प घेऊन येतात. पण त्यांचा हा प्रदीर्घ प्रवास मुक्त समुद्रावरून असतो. वाटेत ठिकठिकाणच्या वातावरणीय घटकांचा प्रभाव, समुद्रात तयार होणारी कमी अधिक दाबाची क्षेत्रे, चक्रीवादळे, इ.मुळे त्यांची दिशा व वेग यात किरकोळ फरक पडत जातो. परिणामी हे वारे दरवर्षी त्या त्या ठिकाणी त्याच तारखेला अचूक पोहोचतील याची शाश्वती नसते. म्हणूनच मान्सून पर्जन्याचे वेळापत्रक स्थूलमानाने ठरलेले असले, तरी त्याचे आगमन व परतीच्या तारखा, पर्जन्याचे प्रमाण इ. यात अनिश्चितता व अनियमितता असते. जेमतेम हजार-दोन हजार किलोमीटर प्रवास करणारी, निश्चित रुळावरून धावणारी, जिचे नियंत्रण करणारी स्वतंत्र यंत्रणा आहे, अशी रेल्वेही अनेकदा निर्दिष्ट वेळेच्या मागेपुढे पोहोचते. या पार्श्वभूमीवर हजारो किलोमीटर अंतरावरून येणारे स्वैर वारे दरवर्षी अगदी त्याच तारखेला त्या त्या ठिकाणी पोहोचतील आणि पाऊस पडेल हे तत्त्वत:देखील अशक्य आहे. त्याचमुळे मृग नक्षत्र लागते त्या दिवशी पाऊस न पडणे हे अघटिक किंवा दुश्चिन्ह असते, असे नाही.

भारतीयांसाठी मान्सून आणि पर्जन्य हा केवळ हवामानाचा एक आविष्कार नाही. तर आपल्या दैनंदिन व दीर्घकालीन सुखदु:खाशी त्याचे नाते आहे. बादशहा व बिरबल यांची एक दंतकथा आहे. एकदा बादशहाच्या दरबारात येऊन एका विद्वानाने कोडे टाकले. २७ मधून नऊ गेले तर उरले किती? दरबारातील प्रत्येकाचे १८ हे उत्तर ऐकताच तो हसू लागला. अर्थात एकट्या बिरबलाने कोड्याचे अचूक उत्तर दिले. २७ उणे नऊ बरोबर शून्य. त्याचे स्पष्टीकरण असे. नक्षत्रे २७ आहेत. त्यापैकी मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी आणि हस्त – ही नऊ नक्षत्रे पावसाची. ती कोरडी गेली तर शेतकऱ्यांच्या आणि इतरांच्याही हातात शून्यच राहते.

मान्सून पावसावर आपले अवलंबून असणे आणि त्यासंदर्भात पिढ्यानपिढ्या आपण स्वीकारलेली दैवाधीनता या सर्वांचे प्रतिबिंब या दंतकथेत दिसते. युगानुयुगे चाललेले हे दैवचक्र भेदण्याचा एकच मार्ग आहे. तो म्हणजे मान्सूनचा सखोल, व्यापक व शास्त्रशुद्ध अभ्यास आणि त्यानुसार कृषी तंत्रात परिवर्तन. त्यासाठी एका व्यापक राष्ट्रीय अभियानाची गरज आहे. जूनमधील गडगडणाऱ्या ढगांच्या मार्फत हा संदेश तर मृग नक्षत्र देत नसेल ना?

लेखक भूगोलाचे अभ्यासक आणि निवृत्त शिक्षक आहेत.

lkkulkarni@gmail.com