अध्यापन हे ज्ञानाचे हस्तांतर असते, तर अनुवाद हा भाषांमधील दुवा असतो. प्रा. राजेंद्र डेंगळे यांनी दोन्ही बाबतींत केलेले काम अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रा. डेंगळे यांनी दीर्घ काळ अध्यापन व जर्मन साहित्याचा मराठीत, मराठी साहित्यकृतींचा जर्मनमध्ये अनुवाद केला. मराठी आणि जर्मन भाषांतील ते महत्त्वाचा दुवा होते.

प्रा. डेंगळे यांनी तत्कालीन पुणे विद्यापीठातून (आताचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) तत्त्वज्ञान आणि जर्मन भाषेचे शिक्षण घेतले. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) जर्मन साहित्य विषयातील पदव्युत्तर पदवी (एम.ए.) १९७९ मध्ये मिळवून १९९० मध्ये त्याच विद्यापीठातून पीएच.डी.ही पूर्ण केली. त्यानंतर जेएनयूमध्येच त्यांनी चार दशकांहून अधिक काळ अध्यापन केले. या दरम्यान त्यांनी जेएनयूमधील भाषा, साहित्य व संस्कृती अध्ययन संस्थेचे अधिष्ठाता म्हणूनही जबाबदारी निभावली. अलीकडेच २०२१मध्ये ते जेएनयूमधून निवृत्त झाले. साहित्य सिद्धान्त, जर्मन साहित्याचा इतिहास, आधुनिक जर्मन साहित्य आणि सांस्कृतिक अध्ययन हा त्यांचा अध्यापन, अभ्यासाचा विषय होता.

जर्मन ॲकॅडेमिक एक्स्चेंज स्व्हिहसकडून (डाड) मिळालेल्या डॉक्टरेट व पदव्युत्तर शिष्यवृत्तींमुळे त्यांना बीलेफेल्ड, बॉन, हायडेलबर्ग, बायरॉईथ, व्हुपर्टाल आणि फ्रायबर्ग अशा विद्यापीठांत अभ्यास आणि संशोधनाची संधी मिळाली. या विद्यापीठांतील प्राध्यापकांसह त्यांना काम करता आले. त्या अनुभवातून त्यांना युरोपीय साहित्य परंपरेचा अधिक सखोलपणे अभ्यास करता आला. इतकेच नाही, तर त्यांनी तो अभ्यास भारतीय संदर्भात मांडण्याचा प्रयत्न केला. २००४ ते २०१० या काळात त्यांनी गोएथे सोसायटी ऑफ इंडियाचे सचिव म्हणून काम केले. तसेच संस्थेच्या वार्षिक नियतकालिकाच्या प्रकाशनाची जबाबदारी सांभाळली. या माध्यमातून भारत-जर्मनी यांच्यातील साहित्यिक संवाद अधिक अर्थपूर्ण होण्यावर त्यांनी भर दिला.

डॉ. डेंगळे यांनी मराठीतून जर्मनमध्ये, तसेच जर्मनमधून मराठीमध्ये अनेक ग्रंथ आणि साहित्यकृतींचा अनुवाद केला आहे. एडन फोन होर्वाथ आणि फ्रीडरिश शिलर अशा लेखकांवरील त्यांचे कार्य विशेष मानले जाते. अनुवादक म्हणून त्यांनी नोबेलविजेत्या हर्टा म्युलर, पॉल क्ली, विश्राम बेडेकर, प्रभाकर बर्वे, रोन्या ओथमन यांच्यासह अनेकांच्या जर्मन साहित्यकृतींचे मराठी आणि हिंदीत अनुवाद केले. अत्यंत अभ्यासू, चिकित्सक पद्धतीने काम करण्यावर त्यांचा भर होता.

साहित्यशास्त्र आणि तत्त्वज्ञान याबाबत त्यांनी सदैव चिंतन केले. त्यांचा अभ्यास, चिंतनाचा फायदा त्यांच्या विद्यार्थ्यांना झाला. विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या त्यांनी घडवल्या. कडक शिस्तीचे असले, तरी विद्यार्थिप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. विद्यार्थ्यांच्या संशोधनाला त्यांनी प्रोत्साहन दिले. दिशा दिली. वैचारिक, साहित्यिक बैठकही दिली.

प्रा. डेंगळे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. अध्यापन, अनुवादासह त्यांना अभिनय, शास्त्रीय संगीतामध्ये विशेष रस होता. त्यांनी घाशीराम कोतवाल या नाटकासह काही नाटके, चित्रपटांत अभिनयही केला होता. त्यांना दृश्यकलेचे विशेष भान होते. ते शिल्पकारही होते. त्यांच्या निधनामुळे साहित्य, तत्त्वज्ञानाच्या वाटेवरचा ज्ञानमार्गी हरपला आहे.