राजवाड्यांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये चंपूकाव्य म्हणजे काय, हे समजावून सांगितलेले नसले, तरी ‘राधामाधवविलासचंपू’ या पोथीवरचे त्यांचे भाष्य समजून घेण्यापूर्वी आपण आज थोडक्यात या भारतीय साहित्यप्रकाराची माहिती करून घेणे योग्य ठरेल. वर्णनात्मक प्रसंगांसाठी गद्याचा (कहाणी, कथा वगैरेचा) तर भावनात्मक प्रसंगांसाठी पद्याचा (छंद, श्लोक इत्यादींचा) उपयोग केलेल्या संमिश्र साहित्यकृतीला ‘चंपू’ म्हणतात. नलदमयंतीच्या प्रेमाख्यानावर आधारित, त्रिविक्रम भट्टद्वारा लिखित ‘नलचंपू’ किंवा रामकथेवर आधारित, राजा भोजरचित ‘चंपूरामायण’ या संस्कृतमधील चंपूकाव्यरचना पूर्वीपासून प्रसिद्ध होत्या; तर अलीकडच्या काळात मैथिलीशरण गुप्त यांची ‘यशोधरा’ ही बहुचर्चित हिंदी रचना चंपूकाव्याचा उत्तम नमुना मानली जाते.
हाती लागलेल्या चंपूकाव्याबद्दलची अधिक माहिती सांगण्यासाठी राजवाड्यांनी पुढे लिहिले, ‘हे काव्य शहाजी महाराजांच्या सांगण्यावरून त्यांच्या मनोरंजनाकरिता व कीर्तीचा पवाडा करण्याकरिता जयराम पिंड्येने रचिले. नायकाच्या समकालीनत्वामुळे पुराव्याच्या दृष्टीने या काव्याचे विशेष महत्त्व लक्षात घेतले पाहिजे.’ परंतु त्यातील मजकुराची विश्वासार्हता ठरवताना सावधगिरी का हवी, याचे स्पष्टीकरण देताना त्यांनी म्हटले, ‘कोणत्याहि ऐतिहासिक व्यक्तीसंबंधाने समकालीन लेख तीन प्रकारचे असतात.
त्या व्यक्तीच्या ओळखीच्या मनुष्याने त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय लिहिलेले लेख विशेष निस्पृह निपजण्याचा संभव असतो, तर त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष ओळख बिलकुल नसणार्या मनुष्याने त्याच्या संमतीशिवाय लिहिलेले लेख केवळ ऐकीव व कमजात अविश्वसनीय उतरण्याचा संभव असतो आणि त्या व्यक्तीच्या ओळखीच्या व विश्वासाच्या मनुष्याने त्या व्यक्तीच्या आज्ञेने, संमतीने लिहिलेले लेख आश्रयदात्याच्या बरेच स्तुतिपर असण्याचा संभव असतो. ह्या दृष्टींनी पाहता प्रस्तुत कवि द्रव्यादींच्या अपेक्षेने आश्रयदात्याच्या इच्छेवरून त्याचे स्तुतिस्तोत्र गाण्यास मुद्दाम सज्ज होणार्या भाडोत्री लेखकांच्या वर्गात पडतो, असे म्हटल्याशिवाय गत्यंतर नाही…’
असा परखड शेरा मारून झाल्यावरही जयराम पिंड्येचे काव्य सपशेल टाकाऊ ठरवणे योग्य होणार नाही, ही बाब राजवाड्यांनी स्पष्ट केली. त्यांनी लिहिले, ‘अशा भाडोत्री लेखकांच्या लेखांतूनहि ऐतिहासिक सत्य निवडून काढण्याच्या पद्धती आहेत. वर्ण्य व्यक्ती राष्ट्रीयदृष्ट्या अतिमोठी असेल व शौर्यादार्यादिगुणमंडित असेल, तर द्रव्यार्थी भाडोत्री लेखकाने केलेलीही निरर्गलशी (अनिर्बंध, मोकाट सुटलेली) दिसणारी प्रशंसासुद्धा मूळ गुणांची सर्वथैव मापक होण्याचा संभव असतो. प्रस्तुत कवीने केलेली शहाजी महाराजांची वर्णना या मासल्याची भासण्याचा संभव आहे.
शहाजी हा शिवाजीची पूर्वावृत्ति आहे आणि मोगलाई, निजामशाही, आदिलशाही व कुतुबशाही अशा पाचचार शाह्यांच्या वावटळीतून सनातनधर्माचे व स्वराज्याचे कर्नाटकात पुनरुज्जीवन करणारा वीराग्रणी व धोरणाग्रणी आहे. अशा असामान्य व्यक्तीचे वर्णन कोणी कितीही मिंधा असला किंवा निस्पृह असला, तरी प्रशंसेशिवाय कसा करू शकेल? फारतर प्रशंसेत कमीअधिक रागरंग चढेल किंवा घटेल इतकेच…’या विवेचनानंतर राजवाड्यांनी खुद्द जयरामाबद्दलचे अनुकूल मतही मांडले. त्यांनी लिहिले, ‘जयराम हा बोलूनचालून कवि आहे, नीरस इतिहासकार नाही. तेव्हा उत्प्रेक्षा, उषमादि अलंकारांनी त्याची वाणी नटली असल्यास त्यात काही नवल नाही. परंतु अलंकार घालावयाचे तेहि कवीने बातबेतानेच घातले आहेत.
जयरामाची मुख्य दृष्टि अलंकार चढवण्याकडे असूनहि त्याने नायकाचे पराक्रमवर्णन थोडेबहुत केले आहे आणि येथेच इतिहासाभ्यासकांना खाद्य मिळण्यासारखे आहे, अलंकारांचे अवगुंठन एकीकडे सारून ऐतिहासिक सत्य सापडण्याची खात्री आहे.’ मग राजवाड्यांनी अगदी थोडक्यात त्या काव्याचे रूपवर्णन वाचकांसमोर ठेवतात- ‘ह्य चंपूचे वेगवेगळे दहा उल्लास आणि शेवटी एक परिशिष्ट मिळून एकंदर अकरा भाग आहेत. ग्रंथारंभी शेषपुत्र रंग नावाच्या आलंकारिकाने एक छोटीशी प्रस्तावना लिहिली आहे. पहिल्या पाच उल्लासांमध्ये राधाकृष्णांच्या विलासाचे रीतसर संस्कृतमधील वर्णन आहे, उर्वरित ग्रंथात त्यांचे नावही नाही; पुढील दोनतृतीयांश भागात येथून तेथून शहाजी महाराजांची प्रशंसा भरली आहे.’
anand47.hardikar@gmail.com
