राजवाड्यांनी गणपती या देवतेचा काळ कोणता, या मुद्द्याच्या अनुरोधाने तीन साहित्यिक पुरावे देत केलेले विवेचन बहुतेकांना समाधानकारक वाटले, तरी नागपूरच्या घुलेशास्त्री यांनी ‘विविधज्ञानविस्तार’च्या जानेवारी १९०५ च्या अंकात त्याबद्दलच्या शंका उपस्थित केल्या. त्यांची दखल घेत मग राजवाड्यांनी ‘सरस्वती मंदिर’च्या अंकात चांगला सहा पानी लेख लिहिला. त्यात घुलेशास्त्र्यांच्या शंकांचा सारसंक्षेप स्पष्ट करीत प्रारंभी त्यांनी लिहिले, ‘गाथासप्तशतीच्या पाचव्या शतकातील ज्या तिसर्‍या गाथेत गणपतीचा उल्लेख आहे, त्या गाथेचा काल घुलेशास्त्र्यांच्या दृष्टीने निश्चित नाही, त्यामुळे तेराशे वर्षांपलीकडे गणपतीला हुडकू जाणे अशक्य आहे आणि सदर गाथा केवळ सुभाषित असल्यामुळे तिच्या जोरावर कालनिर्णयासारखे जोखमीचे काम करणे निव्वळ धाडस आहे. शिवाय एकाच सुभाषित श्लोकाच्या आधारावर निर्णय करू पाहणेहि ठीक नाही…’

शास्त्रीबोवांचे त्रिविध मत मांडून त्यांना प्रतिप्रश्न विचारीत नंतर राजवाड्यांनी साधनांच्या प्रामाण्याबाबत विवेचन केले. त्यांनी शास्त्रीबुवांना विचारले, ‘बिचार्‍या सुभाषित श्लोकांनी कोणाचे काय घोडे मारले आहे की कालनिर्णयाच्या कामी त्यांची साक्ष प्रमाण समजावयाची नाही? डोेळे, बोटे, खुणा, वाकुल्या वगैरेंच्या द्वारा अप्रीती (disaffection) निर्माण होऊन राजद्रोहाचा (sedition) महागुन्हा सिद्ध होण्यास जर पुरेसा आधार तयार होतो, तर साक्षात कागदावर लिहिलेला व तोंडाने उच्चारलेला सुभाषित श्लोक कालनिर्णयासारख्या कामात प्रमाण समजावयाला शास्त्रीबुवांसारख्या तर्कज्ञांनी हरकत घ्यावी, हे मोठे आश्चर्य आहे!… कालनिर्णयाच्या कोर्टात, शालजोडीचा फर्द खांद्यावर टाकून राजसभेत येणार्‍या या प्रतिष्ठित कालिदासाच्या काव्यांची आणि कमरेला रगटे लावून ग्रामजनसभेत उत्तान हावभाव करणार्‍या शाहिराच्या लावण्यांची मातब्बरी एकसारखी आहे, हे शास्त्रीबुवांनी पक्के लक्षात धरले पाहिजे. भल्याबुर्‍या, चांगल्यावाईट अशा सर्व प्रकारच्या लेखांची जानपछान कालनिर्णयाच्या सदर अदालतीत समदृष्टीनेच होत असते…’

घुलेशास्त्र्यांच्या आणखी एका आक्षेपाचे खंडन करण्यासाठी राजवाड्यांनी लिहिले, ‘श्लोक एकटादुकटा असल्यास कालनिर्णयाच्या कामी त्याचे प्रामाण्य शून्य होते, असा शास्त्रीबुवांचा हट्टच असेल, तर मग त्यांचे हे कौतुक सहज पुरवता येण्याजोगे आहे. गाथासप्तशतीच्या चवथ्या शतकाच्या बहात्तराव्या गाथेत गणपतीचा उल्लेख आहे. ती गाथा अशी-

(प्राकृत)

जो सीसम्मि विशण्णो मज्झ जुआणेहिँ गणवई आसी ।

तं व्विअ एहिण पणमामि हअ जरे होहि संतुठ्ठा ॥७२॥

(संस्कृत)

य: शिरसि वितीर्णो मम युवभिर्गणपतिरासीत।

तमेवेदानीं प्रणमामि हत जरे भव संतुष्टा ॥७२॥

(मराठी) तारुण्यात तरुणांनी माझ्या उशाशी ज्या उच्छिष्ट गणपतीला ठेविले, त्याच गणपतीला आता प्रणाम करिते. रे दुष्टा म्हातारपणा! आतातरी तुला संतोष झाला ना?

ह्या गाथेत केवळ साधाच गणपति उल्लेखिलेला नाही, तर वाममार्गी गाणपत्य ज्या उच्छिष्ट गणपतीची पूजा करितात, त्या सकलमनकामना पुरविणार्‍या देवतेचा उल्लेख केला आहे. शास्त्रीबुवांना हवी होती, ती (श्लोकांची) सोबत आता मिळवून दिली आहे!…
आनंद हर्डीकर
anand47.hardikar@gmail.com