ऐतिहासिक साधनांचा पाचवा खंड राजवाड्यांनी १९०२ साली कोल्हापूरमधून प्रकाशित केला. २९८ पानी त्या खंडामध्ये खड्र्याच्या लढाईनंतर मराठे व निजाम यांच्यात झालेल्या तहाच्या बोलण्यांसंबंधीचा वृत्तांत समाविष्ट होता, तशीच गोविंदराव कृष्ण काळे यांच्याकडून सवाई माधवराव, नाना फडणवीस यांना आलेली निवडक २४२ पत्रेही समाविष्ट होती.
ती पत्रे होती तब्बल दहा-बारा हजार पत्रांमधून निवडलेली. पंतप्रधान नारायणराव यांचे हैदराबाद येथील वकील गोविंदराव कृष्ण काळे यांनी पाठवलेली १७८६ ते १७९८ पर्यंतच्या अवधीतली ती हजारो पत्रे त्यांचे वंशज बापूसाहेब काळे यांनी आपल्या बारामती येथील दफ्तरातून काढून राजवाडे यांच्या हवाली केली होती. मूळ पत्रे पाठवणार्याने पत्रांचे जावक यथोचित पद्धतीने नोंदवले होते आणि ती पत्रे सेक्शन बाइंडिंगने बांधून सुरेख, वळणदार व टपोर्या अक्षरांनी लिहून अतिसुरक्षित अशा आपल्या दफ्तरखान्यात ठेवण्याची खबरदारी घेतली होती.
तथापि पुढे काय काय झाले, त्याचे वर्णन करताना राजवाड्यांनी संयम पाळून लिहिले, ‘गोविंदराव कृष्ण यांच्या मृत्यूनंतर ८० वर्षांपर्यंत ही जावके अंधारात लोळत पडून सुमारे दोन वर्षांपूर्वी श्रीमंत बापूसाहेब यांच्या हस्ते त्यांची झाडपूस झाली. उंदीर, घुशी, वाळवी, कोळी, पाऊस, वारा आणि आळशी व अज्ञ कारकून यांच्या तडाख्याखाली या जावकपत्रांच्या पुस्तकांच्या निव्वळ भाकर्या बनून गेल्या होत्या. कित्येक जावके आरपार पोखरून गेली होती व कित्येकांचा तर भुगा होऊन गेला होता… आरपार पोखरून हैराण झालेली पुस्तके थंड पाण्याच्या घड्यांच्या नाजूक उपचाराने पुन्हा थोडी बहुत बोलू लागली व पहिल्या वर्गातील भाकर्यांवरील चिकटा आधणाच्या वाफार्याने धुऊन काढल्यावर आतील पत्रे पुन्हा ताजीतवानी झाली. अशा मोठ्या दुर्धर प्रसंगातून ही पत्रे सोडवलेली आहेत.’
हे राजवाड्यांचे तक्रारवजा निवेदन मुद्दामच इथे उद्धृत केले आहे. साधने हाती लागावीत म्हणून एखाद्या परिचारिकेसारखी त्यांनी हजारो कागदपत्रांची अगदी मनोभावे शुश्रूषा केली; कुणाच्या कपाळावर थंड पाण्याच्या घड्या ठेवून किंवा कुणाला गरम पाण्याचा वाफारा देऊन त्यांनी अगणित कागदपत्रांना ‘बरे केले, आजारपणातून बाहेर काढले.’ आणि एवढी सारी तपश्चर्या केल्यानंतर फळ म्हणून हाती काय लागले? तर बारामती दफ्तरातल्या त्या मूळच्या दहा-बारा हजार जावक पत्रांपैकी जेमतेम २४२ पत्रे. हजारो पत्रे धुंडाळल्यानंतर जर एवढ्या क्षुल्लक प्रमाणातच ‘ऐवज’ हाती लागत असेल, तर सामान्य माणूस सगळा उत्साह गमावून बसल्याशिवाय राहणार नाही. पण राजवाड्यांची हाती घेतलेल्या कामावरची निष्ठा एवढी दुर्दम्य होती की, त्यांनी आपल्या त्याच छोटेखानी प्रस्तावनेमध्ये पुढे इच्छा प्रदर्शित केली, ‘सध्या तर कोठे चार खंड साधने छापून झाली आहेत, मला तर अद्यापि शंभर- दीडशे खंड छापावयाचे आहेत.’
आपली इच्छा व्यक्त करतानाच राजवाड्यांनी हेसुद्धा स्पष्ट केले की, ही कागदपत्रे प्रकाशित झाली आणि ती स्वदेशप्रीतीने प्रेरित झालेल्या काहीजणांनी वाचली म्हणजे सगळा कार्यभाग साध्य झाला, असे होणार नाही. त्या कागदपत्रांतून ज्या इतिहासाचे दर्शन घडते, तो इतिहास समजून घेणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी तसा वाचकवर्ग तयार हवा. त्यांनी लिहिले, ‘शेवटपर्यंत तग धरणारा, स्तुतिनिंदेला न जुमानणारा, (सर्वसामान्य) लोकांच्या औदासीन्याला भीक न घालणारा, मत्सरभावनेने दूषित न होणारा असा वाचकसमूह जवळ केल्याशिवाय तरणोपाय नाही, अशी पक्की खात्री झाल्यामुळे मी या पत्रांचा सत्कार (नीट अभ्यास) करण्याची विनंती महाराष्ट्रातील इतिहासज्ञांना करीत आहे’… आणि अशा साधनांच्या छपाईखर्चाबाबत सहकार्याचे आवाहन करीत राजवाड्यांनी म्हटले, ‘मराठी दफ्तरे छापण्याचा खर्च देण्यास आपल्या देशातील सार्वभौम किंवा मांडलिक सरकारे कोणी तयार होतील, असा अद्याप तरी रंग दिसत नाही, तेव्हा हे काम आपले आपणच केले पाहिजे.’
– आनंद हर्डीकर
anand47.hardikar@gmail.com
