‘तलवारीच्या जोरावर व मुत्सद्द्यांच्या युक्तीवर भिस्त ठेवून पेशव्यांना (उत्तर) हिंदुस्थानातील आपली सत्ता चालवावी लागे… महाराष्ट्रीयेतर लोकांच्या मनात मुसुलमानांप्रमाणे पेशवेही परकीय आहेत, असाच दुजाभाव कायम राही व परशत्रू आला असता पेशव्यांचे जू झुगारून देण्यास त्या प्रांतांतील लोक तयार असत. या स्थितीची समज येऊनही पेशव्यांनी तिचा उपशम करण्याची काही खटपट केली नाही, हे कबूल केल्याशिवाय गत्यंतर नाही… जिंकलेल्या लोकांची मने आकर्षून घेण्याचे व नवीन जाणिवा त्यांना करून देण्याचे पेशव्यांनी व्यवस्थित प्रयत्न केले नाहीत, हा त्यांचा मोठा दोष होता…’ असे राजवाड्यांनी नमूद केले; पण लगेच त्यांनी ‘हा दोष दुसर्‍या एका दोषाच्या मानाने केवळ क्षुद्र आहे, असे दिसून येईल’, ही पुस्तीही जोडली.

आणि तो अधिक गंभीर, अधिक मोठा दोष कोणता, तर ‘कपटी, कुचर व स्वामिद्रोही सरदारांना ताळ्यावर, वठणीवर आणण्यासाठी पेशव्यांनी काहीच व्यवस्था केली नाही’ हा! त्यांना उपलब्ध झालेल्या व त्यांनी त्या पहिल्या खंडात संपादकीय संस्कारांसह समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहाराआधारे गंभीर उणीव निदर्शनास आणली. गोविंदपंताच्या आक्षेपार्ह वर्तनाचा तपशील उघड करणारी सर्व पत्रे येरंड्यांजवळ राहिली.

सदाशिवरावभाऊने किंवा नारो शंकराने अबदालीविरुद्धची मोहीम चाललेली असताना गोविंदपंताला पाठवलेली पत्रे १६ जानेवारी १७६१पर्यंत किंवा नंतरही बाळाजी बाजीरावाच्या नजरेस पडली नाहीत. परिणामी पानिपतच्या मोहिमेत पूर्वीपासून सतत कुचराई केल्याबद्दल गोविंदपंताला काहीएक प्रायश्चित्त मिळाले नाही, शासन झाले नाही. ‘योग्य चाकरी न केल्यास पुढे फार कठीण जाईल’, अशी धमकीची पत्रे सदाशिवभाऊने गोविंदपंताला पाठवली होती, याची काडीमात्र कल्पना नसल्यामुळे बाळाजी बाजीरावाने १६ जानेवारी १७६१ला म्हणजे पानिपतची लढाई हरल्यावर तीन दिवसांनी व गोविंदपंत अताईखान नावाच्या शत्रुपक्षाच्या सरदाराकडून मारला गेल्यानंतर पंचवीस दिवसांनी गंगाधरपंताला पाठवलेल्या पत्रात चक्क गोविंदपंताची तारीफ केलेली आढळते.

‘ती ऐतिहासिक महत्त्वाची पत्रे येरंड्यांच्या हातात येण्याचे कारण नक्की काय असावे, ते कळत नाही’, असे राजवाड्यांनी म्हटले खरे; परंतु परिस्थितीजन्य पुरावा लक्षात घेऊन काय काय झाले असावे, याचा तर्क मांडण्याचे कामही पार पाडले. त्यांनी लिहिले, ‘गोविंदपंताविरुद्ध पुरावा म्हणून येरंड्यांनी त्या पत्रांचा ताबा घेतला असावा, असा तर्क करणे साहजिक आहे. पानिपतची मोहीम झाल्यावर, खरे म्हटले असता, गोविंदपंत बुंदेल्याचे कृष्ण कारस्थान बाहेर पडावयाचे. परंतु येरंड्यांची गोविंदपंताच्या चिरंजीवांनी मूठ दाबिली म्हणा वा अंतस्थ मसलतीने म्हणा, गोविंदपंताचे हे बंड बाहेर पडले नाही.’

त्यानंतर त्यांनी एक दावा व खुलासा केला. ‘गोविंदपंताच्या विरुद्ध पुराव्याची ही पत्रे येरंड्याने जी दडवून, लपवून वाई येथे आपल्या वाड्यात ठेवली, ती या कालपर्यंत कोणाच्याही दृष्टीस पडली नाहीत. पेशव्यांच्याही नाहीत व ग्रांट डफच्याही दृष्टीस पडली नाहीत, त्यामुळे गोविंदपंताचा संशय कोणालाच आला नाही. अर्थात पानिपतच्या मोहिमेचे मुख्य सूत्र कोठे होते व खरे स्वरूप काय होते, तेही आजपर्यंत कळले नव्हते.

सध्या या ग्रंथात छापलेल्या पत्रांच्या द्वारे या स्वरूपाच्या काही भागाचा उलगडा झाला आहे’, हा दावा कुणीही अमान्य करण्याची शक्यताच नव्हती. राहिलेल्या भागांचा उलगडा अधिक पत्रव्यवहार सापडेपर्यंत व्हायचा नाही, मल्हाररावाचा व इतर सरदारांचा पत्रव्यवहार अभ्यासला जाईपर्यंत ठाम निष्कर्ष काढता येणार नाही, असा खुलासाही राजवाड्यांनी केला. अशा रीतीने राजवाड्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची मूळ संदर्भसाधने शोधून, त्यांच्यावर संपादकीय संस्कार करून, ती प्रकाशित करण्याचा व त्यांचा अभ्यासपूर्वक अन्वयार्थ लावण्याचा खटाटोप सिद्धीस नेला…

anand47.hardikar@gmail.com